एफ.जी.नाईक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुरबाड येथे श्रमदान

कोपरखैरणे  एफ. जी. नाईक महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना'चे सात दिवसीय रहिवाशी शिबीर मुरबाड येथील शिवळे गावात  संपन्न

नवी मुंबई ः कोपरखैरणे येथील एफ. जी. नाईक महाविद्यालयातील ‘राष्ट्रीय सेवा योजना'चे (एन.एस.एस.)सात दिवसीय रहिवाशी शिबीर मुरबाड येथील शिवळे गावात पार पडले. या शिबिरात ‘एनएसएस'च्या स्वयंसेवकांनी शिवळे गावात विविध समाजोपयोगी कार्यक्रमांतर्गत श्रमदान केले.

सदर शिबिराचे उद्‌घाटन ‘श्रमिक शिक्षण मंडळ'चे संस्थापक-अध्यक्ष आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘मुरबाड'चे माजी आमदार गोटीराम पवार, ‘श्रमिक शिक्षण मंडळ'चे प्रशासक नरेंद्र म्हात्रे, माजी मुख्याध्यापक सुधीर थळे, रा.फ.नाईक विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रताप महाडिक, वरिष्ठ प्राध्यापक दत्तात्रय घोडके, प्रा. शरद जगताप, ‘राष्ट्रीय सेवा योजना'चे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद साळुंखे, प्रा. डॉ. कविता पवार यांच्यासह विद्यार्थी स्वयंसेवक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सदर शिबिराच्या माध्यमातून ‘एनएसएस'च्या स्वयंसेवकांनी बंधारे बांधणे, संपूर्ण गांव प्लास्टिक मुक्त करणे, गावातील आणि परिसरातील शाळांची स्वच्छता करणे असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले. या शिबिरात स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्त्री शिक्षण, स्वच्छता अभियान, रक्तदान अशा विविध विषयांवर पथनाट्य सादर करुन जनजागृती केली.  
शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी स्वयंसेवकांसाठी स्पर्धा परीक्षा, आयुष्य कसे जगावे, आदर्श नागरिकांचे कर्तव्य, आदि विषयांवर विविध मान्यवरांच्या आणि तज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली.

दरम्यान, यावेळी विद्यार्थ्यांच्या मेहनतीची, कामाची आणि श्रमदानाची दखल घेत शिवळे ग्रामपंचायत कडून एफ.जी. नाईक महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना' युनिटला सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 दिव्यांग मुलांनी लुटला ‘वार्षिक क्रीडा दिन'चा आनंद