दिव्यांग मुलांनी लुटला ‘वार्षिक क्रीडा दिन'चा आनंद

ईटीसी केंद्रातील शिक्षक-कर्मचाऱ्यांचे नियोजन; दिव्यांगांचा आनंददायी उपक्रम यशस्वी

नवी मुंबई ः एकाच छताखाली सर्व प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणारे देशातील एकमेव अपंग शिक्षण प्रशिक्षण-सेवा सुविधा केंद्र म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या इटीसी केंद्राचा नावलौकिक आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समर्थपणे उभे करण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून मनापासून काम केले जात आहे. यामध्ये दिव्यांगांच्या अंगभूत कला आणि क्रीडा गुणांना उत्तेजन मिळावे या दृष्टीने विविध स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. याचाच एक भाग म्हणून दिव्यांग मुलांना सामान्य मुलांप्रमाणेच खेळाचा आनंद घेता यावा यादृष्टीने महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर याच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग मुलांच्या ‘वार्षिक क्रीडा दिन'चे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या सीबीडी-बेलापूर येथील राजीव गांधी क्रीडा संकुल येथे दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यामध्ये धावणे, सॅक रेस, ससा उडी, बेडूक उडी, सॉपट थ्रो बॉल, गोळा फेक अशा दिव्यांगांना सहजपणे खेळता येतील, अशा विविध खेळांचा समावेश होता. या स्पर्धात्मक खेळामध्ये विजयी झालेल्या दिव्यांग खेळाडुंना ईटीसी केंद्राचे विभागप्रमुख तथा उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार तसेच परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक तथा शिक्षण विभागाचे उपायुक्त योगेश कडुसकर, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव यांच्या हस्ते पदकांसह प्रशस्तीपत्र स्वरुपात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

 दिव्यांग ‘वार्षिक क्रीडा दिन'मध्ये ईटीसी केंद्रातील कर्णबधीर, मतीमंद, अंध, बहुविकलांग विद्यार्थ्यांप्रमाणेच बाह्य रुग्ण विभागातील २ ते १८ वर्ष वयाच्या दिव्यांगांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला. दिव्यंगत्वामुळे येणाऱ्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांना सहजपणे खेळता येईल आणि खेळाचा आनंद घेता येईल अशा विविध क्रीडा प्रकारांच्या स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेपेक्षा सहभाग महत्वाचा असल्याचे लक्षात घेऊन दिव्यांग विद्यार्थ्यांप्रमाणेच त्यांच्या पालकांनीही आपल्या पाल्याप्रमाणेच इतरांनाही प्रोत्साहन देत खिलाडुवृत्तीचे दर्शन घडविले. दिव्यांगांकरिता प्रेरणादायी असणाऱ्या या क्रीडा प्रकारांचे नियोजन ईटीसी केंद्रातील शैक्षणिक व्यवस्थापक दीपक नवगरे, स्मिता चौलकर, क्रीडा शिक्षक सुभाष भुसारा, समीर म्हात्रे यांनी उत्तम रितीने केले. ईटीसी केंद्रातील सर्व विशेष शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी दिव्यांगांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सदर आनंददायी उपक्रम यशस्वी केला.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ३८ रिक्त पदांसाठी भरती