मुशाफिरी : नावे, गावे..काही आम काही खास

नावे, गावे..काही आम काही खास

कोण कोणत्या गावाचे आहे, तेवढेच महत्वाचे नाही..त्याने त्या गावासाठी काय केले, त्या गावाचे नावलौकिक, प्रतिष्ठा, सन्मान उंचावण्यासाठी काय योगदान दिले..की ती व्यक्ती स्वतःच्या कुटुंबासाठी, त्या गावासाठी कलंक किंवा बदनामीचा विषय ठरली हेही पाहिले जात असते.

   समाज माध्यमांवर दररोज काही ना काही येऊन आदळत असते. काही घेण्यासारखे असते, काही निव्वळ मनोरंजक, काही माहितीपूर्ण तर काही छचोर, चवचाल, भडकाऊ, वर्णद्वेषी, धर्मद्वेषी असे वेगवेगळ्या प्रकारचे असते. त्यातील एक रील पाहण्यात आले. मुंबई विरुध्द पुणे हा चिरंतन चालणारा वाद आहे. त्यावर आधारीत हे रील असून आमचे पुणे, आमचा शनिवार वाडा, आमचा दगडूशेट हलवाई, आमची सारस बाग, आमचे जोशी वडे, आमचे विद्येचे माहेरघर अशी शेखी मिरवणारा एक पुणेकर दादरला उतरुन शिवाजी पार्कला कसं जायचं असं एका कट्टर मुंबईकराला विचारतो. त्या बोलाचालीत तो पुण्याच्या मोठेपणाबद्दल ऐकवायची संधी घेतो. पुण्याचे महात्म्य सारे  ऐकून आणि त्याला सडेतोड जबाब देऊन झाल्यावर मग हा मुंबईकर त्या पुणेकराला विचारतो की, ‘इकडे मुंबईत कशा निमित्त येणं केलंत?' तर पुणेकर सांगतो की ‘जॉबसाठी म्हणून!'..  ‘घ्या म्हणजे पुणे एवढे महान वगैरे असूनही नोकरी करायला मुंबईच गाठली का,' असे म्हणत मुंबईकर त्या पुणेकराला शेवटी शुभेच्छा देतो.

   अर्थात हा सारा गंमतीचा भाग आहे. दोन महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांमधील द्वेष, दुश्मनी, दुराभिमान या अर्थाने हे सारेे घेण्याचे काही एक कारण नाही; शवयतो तसे कुणी घेतही नाहीत. या विषयावर मराठीत सिनेमेही निघाले असून विविध साहित्य प्रकारांमधूनही या विषयावर विविध प्रकारच्या रचना करण्यात आल्या आहेत. हा वाद जेवढा हलवयाने घेतला जातो, तेवढ्या हलवयाने मराठी कानडी वाद घेतला जात नाही. तेवढ्या हलवयाने अनेकजण मराठी गुजराती वादाकडे पहात नाहीत. मराठी विरुध्द परप्रांतीय याही वादाला अनेकदा तिखट फोडणी देऊन थेट मारामारीचे प्रकार घडत असल्याचेही आपण पाहिले आहेत. एकच देश, एकच संविधान, एकच राष्ट्रध्वज तसेच अनेकदा धर्मही एकच असून हे असे हमरीतुमरीवर येण्याचे प्रसंगही घडल्याचे पहायला मिळत असते. आपल्या या महान व मोठ्या व्याप्तीच्या, विविधतेत एकता हे वैशिष्ट्य जोपासणाऱ्या देशात वेगळेपणच खूप. देशाच्या सीमेवर लढणारे साऱ्याच प्रांतातले आहेत व ते तिथे आहेत म्हणून आपण इथे सुरक्षित आहोत हे एकदा मनाशी पक्के केले की मग हा भय्या, तो पंजाबी, अमूक कानडी, तमुक अंडुगुंडु मद्रासी असले काही उरत नाही. हे सारे समजण्यासाठी फिरावे लागते. अन्य भाषा, प्रांत, जिल्हे, तालुके, गावे आहेत. त्यांची बोलीभाषा, चालीरीती, खाद्यपदार्थ, जीवनशैली यांची माहिती आपलेपणाने घ्यायची असते. त्यांच्याकडे तुच्छतादर्शक कटाक्ष टाकून काही होत नाही. प्रत्यक्षात उतरवायला हे अवघड आहे. याचे कारण म्हणजे नसलेल्या अस्मितेच्या, नसलेल्या वेगळेपणाच्या धुंदीतच अनेकजण वावरतात व अज्ञानातले सुख भोगतात. आपल्या देशात एकाच वेळी भारत व इंडिया हे दोन देश सामावले आहेत. त्यातही पुन्हा जोडीला हिंदुस्थान आहेच. त्यात परत शिकलेले विरुध्द अल्पशिक्षित, अभिजन विरुध्द बहुजन, श्रमजिवी विरुध्द बुध्दीजिवी, श्रीमंत विरुध्द गरीब हे असले पोटभेद आहेत हेही पाहता येईल. हे सगळे बाजूला ठेवून आपला तालुका, जिल्हा, राज्य, अन्य प्रांत, देश आधी पहायला हवा.  

   आपल्या राज्यातले छोट्यातले छोटे गाव घेतले तरी त्याचीही काहीतरी खासियत असते. तिथे कुणीतरी काहीतरी मुलखावेगळे काम करुन ठेवलेले असते. तेथील काही धार्मिक, भौगोलिक, पौराणिक, प्रादेशिक, कार्यविषयक वैशिष्ट्य असते. अण्णा हजारे यांचे राळेगण सिध्दी हे गाव असेच त्यांच्या कामामुळे जगभरात नावाजले गेले. पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार हे गाव असेच कामामुळे गाजले. सातारा जिल्ह्यातील मिलीटरी अपशिंगे गाव त्या गावातील प्रत्येक घरातील एकतरी व्यक्ती भारतीय सैन्यदलात असण्याबद्दल सुप्रसिध्द आहे. काही गावे, तालुके हे भरपूर पावसासाठी..तर काही प्रचंड उन्हासाठी, दुष्काळासाठी, खडतर जीवनासाठी म्हणून प्रसिध्द आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर-समनापूर हे गाव आता अन्सार चाचा यांच्या नसीब वडापाव सेंटरमधील त्यांच्या वडापावची चव व त्याहीपेक्षा टेसदार असलेली त्यांची वैशिष्ट्यपूर्ण मराठी ( ‘चटका देऊ का? खाता की पेता..की घरी नेता, साठ च्या स्पीडने त्यांचे वडे बांध' टाईप) बोलीकरिता नाव कमावून आहे. आपल्या राज्यातील अनेक गावे, तालुके हे  तेथील कला, शिल्प, खाद्य, बाजार, बगीचे, उद्याने, खाणी आदि विविध कारणांनीही लोकांच्या मनात घर करुन आहेत. नारायणगाव हे फार काळापासून तेथील लोकनाट्ये, तमाशे यांच्या करिता नावाजले गेले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण हे गाव गणपतींच्या मूर्तींच्या आखणी (गणेशमूर्तीच्या डोळ्यांच्या जिवंत वाटणाऱ्या हुबेहुब रेखाटना)  करिता सुप्रसिध्द असून ‘आमच्या येथे पेण येथील गणेशमूर्ती मिळतील' अशा पाट्या अवतीभवतीच्या अनेक महानगरांतून तुम्ही पाहिल्या असतील. आताच्या समाजमाध्यमांनी व्यापलेल्या जीवनात अशा प्रकारची वैशिष्ट्ये लागलीच तंत्रस्नेही मंडळींमुळे सर्वांच्या समोर जातात. विशेषकरुन गावोगावच्या खाद्यसंस्कृतीचा, खाऊ गल्ल्यांचा प्रचार-प्रसार या समाजमाध्यमांमुळे वेगात होण्यात मोठाच हातभार लागल्याचे लक्षात येत आहे.

   अर्थात हे झाले केवळ माहिती विषयक. डिजिटल, आभासी वर्णनाबद्दलचे. एवढी माहिती जमा केल्यावर सच्चा खाद्यप्रेमी कधी जागेवर स्वस्थ बसून राहणारच नाही. तो ती माहिती संकलित करुन आपला लावा लष्कर घेऊन तिथे जाणार म्हणजे जाणारच. स्वच्छतेचे अनेक भोवते असे खा, तसे खा, हायजिनिकच खा, अशा अशा कसोट्यांवर उतरलेलेच खा असे सल्ले स्वतःच्या डिस्पेन्सऱ्या, विलनिवस, दवाखाने चालवताना देतात व तेच लोक हातगाडीवरील पाणीपुरी, चाट, छोले-भटूरे यांवर यथेच्छ ताव कसा मारतात हे मी पाहिले आहेत. आता बोला! पाणीपुरी हा पदार्थ खरा उत्तर भारतातला! पण त्याने अखिल भारतीय स्तरावरची अमाप लोकप्रियता मिळवली आहे. मी राजस्थानच्या कोटा शहरात गेलो होतो. तिथे पाणीपुरी हाच पदार्थ ‘पानी पताशे' या नावाने ओळखला जातो व ती बनवून देणारा गाडीवाला किती स्वच्छ, अस्वच्छ याची पर्वा न करता त्याला सुशिक्षित, अशिक्षित, उच्चशिक्षित अशा साऱ्यांचाच गराडा पडल्याचे मी याचि देही याचि डोळा पाहिले आहे. याच पाणीपुरीला दिल्ली व अन्य भागात ‘गोलगप्पे' असेही नाव आहे.  फरसाण, फाफडा, गाठे यावर गुजरात्यांची मोठी छाप आहे.  त्यासाठी टापटीप अशा स्टोअरमध्ये जाण्याची आवश्यकता नाही असे मानणारे अनेक गुजराती आहेत. माझी भाची तिच्या विवाहानंतर गेल्या एकवीस वर्षांपासून गुजरातेतल्या सौराष्ट्रातील जुनागढमध्ये राहते. तिकडे फाफडा, गोटा भजी तिथल्या तिथे प्लेटच्या नव्हे तर, पाव किलो, अर्धा किलो असे किलोच्या हिशेबात बनवून देणारे गाडीवाले चालक असतात. आपण जाऊन सांगायचे की किती किलो हवे आहे. मग लागलीच ते बेसन पीठ, कांदे, हळद, मीठ, मसाला व अन्य सामग्रीच्या सहाय्याने गरमागरम व्यंजन बनवून देतात. द्वारकेमधील भजीही अशीच गाडीवर भरपूर चटणीसह मिळते. या साऱ्याचा  मी तिथे जाऊन आस्वाद घेतला आहे. ‘अर्धी मुंबई ठेल्यावरचे, गाडीवरचे, बाहेरचेच खाऊन जगते' असे म्हटले जाते. इथे मुंबईच्या जागी वेगवेगळ्या शहरांची नावे टाकून हेच वाक्य  कुठेही, कोणत्याही भाषेत आता तुम्ही खपवू शकता. कारण घरातल्या स्त्रीला आता नोकरीनिमित्त बाहेर पडावे लागते. स्वादिष्ट पदार्थ रांधून वाढणारी माता-भगिनींची पिढी अस्ताला लागली आहे. चूल, मूल आणि अर्थकारण यात घरच्या बाईने स्वतःला पूर्णतः गुरफटून घ्यावे असे आता पुरुषवर्गालाही फारसे रुचत नसल्याने ऑर्डर, पार्सल, झोमॅटो, स्विगी, ॲमेझॉन, उबेर इट्‌स यांचे नवे युग अवतरले आहे व ते अनेकांच्या पचनीही पडले आहे.  एक जमाना होता...मुंबईत दादरला रानडे रोड आणि फोर्टात काहीही मिळते असे म्हटले जाई. आता विविध उपनगरात काहीही मिळण्याची सोय उपलब्ध झाली असल्याचेही पाहता येईल. नळ बाजार अर्थात चोर बाजार हा मुंबईतच आहे असे नाही..असे चोर बाजार विविध शहरांमधूनही आहेत..पण त्यांची ख्याती मुंबईच्या चोरबाजाराइतकी पसरली नाही एवढेच!

   हे सगळे समजून घेण्यासाठी आपल्या गावा-शहराखेरीज अन्य गावा-शहरांची, राज्यांची, प्रांतांची आपल्याला तेवढीच आणि खुल्या दिलाची ओढ हवी. कोण कोणत्या गावाचे आहे, तेवढेच महत्वाचे नाही..त्याने त्या गावासाठी काय केले, त्या गावाचा नावलौकिक, प्रतिष्ठा, सन्मान उंचावण्यासाठी काय योगदान दिले..की ती व्यवती त्या गावासाठी कलंक किंवा बदनामीचा विषय ठरली हेही पाहिले जात असते. स्वातंत्र्यवीर विनायक  विनायक दामोदर सावरकर हे मूळचे नाशिकच्या भगुर गावचे होते..पण त्यांनी कोकणातही काम करुन दाखवले होते. प्रा. मधु दंडवते हेही अहमदनगरचे; त्यांनीही कोकणला आपली कर्मभूमी मानले. नावात पुणेकर असले तरी सुरेखा सोलापूरची असू शकते व तिने लावणीला तंबूतून थेट महानगरांतल्या वातानुकुलित नाट्यगृहात नेण्यात मोलाची भूमिका बजावलेली असते. पंढरपूर हे गाव विठ्ठलाबरोबर पंढरपुरी तंबाखूसाठी नव्हे, तर वि. आ. बुवा, द. मा. मिरासदार अशा दर्जेदार साहित्यिकांचे मूळ गाव म्हणूनही ओळख मिळवून आहे. ‘बंद सम्राट' म्हणून ओळखले गेलेले, रेल्वेचा अभूतपूर्व संप घडवून आणणारे व मंगलोर येथे जन्म घेतला असूनही दक्षिण मुंबई, मंगलोर, मुजफ्फरपूर, नालंदा अशा वेगवेगळ्या लोकसभा मतदार संघांतून निवडणूका लढवीत केंद्रीय मंत्रीपद मिळवणारे कै. जॉर्ज फर्नांडीस जिथे जिथे वावरले..तेथील लोकजीवनाशी ते एकरुप झाले. खासदार असूनही आम आदमी सारखा त्यांचा वावर, पेहराव व राहणीमान राहिले. पद्म विभूषण या किताबानेही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. अशा प्रकारच्या किती व्यवित हल्ली आपल्याला पहायला मिळतात?

-(मुशाफिरी) राजेंद्र घरत. उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई.

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शुध्द अशुध्द भाषा असं काय नसतंय?