शुध्द अशुध्द भाषा असं काय नसतंय?

शुध्द अशुध्द भाषा असं काय नसतंय ?

   सादर करण्याच्या काही कलाकृतींची रंगतच मुळी बोलीभाषेच्या गंमतीत आहे. शुध्दी-अशुध्दीच्या फूटपट्टया लावून रसिक त्यांचा आस्वाद घेण्याच्या भानगडीत न पडता कलाकृतीचा निखळ आनंद घ्ोतात. तुम्ही प्रमाण मराठीत बोला, लिहा किंवा मराठीच्या कुठल्या बोलीत व्यक्त व्हा..त्यातील भाव, संवेदना, हुंकार, आवाहन, तीव्रता, आशय, अभिव्यक्ती महत्वाची आहे. नुसते एकापुढे एक शब्द व्याकरणशुध्द पध्दतीने रचून उपयोगाचे नाही. शब्द तर तसे रेल्वेच्या छापील टाईम टेबलमध्ये किंवा टेलिफोन डिरेक्टरीमध्ये नि मेन्यू कार्डमध्येही असतात.  

   काही दिवसांपूर्वी ‘सैराट'  फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे वाशीमधील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात आले होते. तेथील तरुणाईला संबोधित करताना त्यांनी ‘शुध्द अशुध्द भाषा आसं काय नस्तंय'  असे म्हटले होते. त्यावर अनेक प्रकारची मते व्यक्त झाली. ‘मी माझ्या भाषेमुळे येथवर आलो, भाषा हे संवाद साधण्याचं माध्यम आहे एवढंच' असेही मंजुळे यांनी यावेळी म्हटले होते. हा भाषा शुध्दी-अशुध्दीचा प्रयोग गेली अनेक वर्षे सुरु राहिला आहे. कलावंत, लेखक, वक्ता, कवी, संवाद लेखक, नाटककार मंडळी त्यांच्या मनातील विचारांना भाषेचे रुप देतात आणि रसिकजनांसमोर ते सादर करतात. जे अस्सल असते, रसिकांना भावते, त्यांच्या मनाचा ठाव घेते, त्यांच्या हृदयाला हात घालते, ते क्षण जिवंत करण्याची अनुभुती देते..त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो. बाकीच्यांनी कितीही भिंग लावलेले चश्मे घालून व्याकरण शुध्द, ऱ्हस्व-दीर्घ, काना-मात्रा, वेलांट्या काटेकोरपणे तपासून लिहिले, सादर केले तरी त्याला दर्जा नसेल, अस्सलपणा नसेल, निव्वळ ती कारागिरी किंवा शब्दांचा निस्तेज डोलारा असेल तर लोक ते झिडकारतात.

   ‘मास्तर तुमचंच नाव लिवा..'  ही नारायण सुर्वे यांची कविता अशीच साध्या बोलीभाषेत असतानाही रसिकांनी ती मनापासून स्विकारली. समीक्षकांनाही ती भावली. शांता शेळके यांनी ‘राजा सारंगा माझ्या सारंगा डोलकरा रं धाकल्या दिरा रं चल जावं या घरा' , ‘वादल वारं सुटलं गं' , ‘मी डोलकर दर्याचा राजा'  अशी एकाहुन एक सरस कोळीगीते त्याच भाषेत लिहिली व गेली पन्नास वर्षांहुन अधिक काळ रसिकांनी ही गीते डोक्यावर घेतली आहेत. प्रमाण मराठीच्या चाहत्यांनीही त्यांना भरभरून दाद दिली. ‘माजो लवताय डावा डोला'  हे महानंदा चित्रपटासाठी शांता शेळके यांनी अशाच बोलीत लिहिलेले गाणे हृदयनाथ मंगेशकरांनी तरलपणे संगीतबध्द केले व लता मंगेशकरांनी तितक्याच तल्लीनपणे गायिले आहे. एवढेच काय, तत्कालिन अमेरिकन राष्ट्रपती बराक ओबामा व त्यांची पत्नी मिशेल हे मुंबईच्या बांद्रा येथील शाळेत गेले असता ‘मी हाय कोली'  हे मराठी नसलेला गायक श्रीकांत नारायण याने गायिलेले गाणे तेथे वाजवले असता या दोघा अमेरिकी दाम्पत्याने तेथील मुलांसमवेत भन्नाट नृत्य करुन त्या गाण्याचा मनमुराद आनंद लुटला.

   ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तीमत्व' म्हणून ज्या पु ल देशपांडे यांचे नाव आपण अभिमानाने घेतो त्यांनी गंगाराम गवाणकर लिखित ‘वस्त्रहरण'  या मालवणी नाटकाची अमाप प्रशंसा केली व त्यानंतर या नाटकाने प्रचंड यश मिळवले व हे नाटक आणि मराठीची ही मालवणी बोली मच्छींद्र कांबळी यांनी सातासमुद्रापार नेली. या नाटकात टोपलीभर मालवणी शिव्या आहेत. वस्त्रहरण मधील देवांच्या कथित अवमानाबद्दल काही उजव्या विचारांच्या संघटना नाट्यगृहांसमोर बावटे घेऊन निदर्शने करीत असत. संतोष पवारच्या ‘आम्ही पाचपुते'  नाटकात असेच ग्रामीण भाषेत देवांबद्दल काही आक्षेपार्ह असल्याचा आरोप करीत काही संघटनांनी वाशीच्या विष्णूदास भावे नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीजवळ जिलेटीन या स्फोटक पदार्थांच्या कांड्यांचा स्फोट २००८ च्या जून महिन्यात घडवून आणला होता. असाच स्फोट याच नाटकाचा ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे पार पडत असताना प्लास्टिकच्या पिशवीत विस्फोटक पदार्थ ठेवून घडवण्यात आला होता.  हरिभाऊ वडगावकरलिखित ‘गाढवाचं लग्न'  या लोकनाट्यातही ग्रामीण भाषेत दिलेल्या ढीगभर शिव्या आहेत. यात तर ‘सगळे देव रंडीबाज'  असा खटकेबाज संवादही आहे. हे नाटक देशाबाहेर सुध्दा गाजले. त्याचे आकाशवाणीवरुनही रुपांतर सादर झाले. अनेक नामांकित नटमंडळींनी त्यात सावळा कुंभाराची भूमिका केली. त्याच नावाचा सिनेमाही आला, ज्यात मकरंद अनासपुरेने सावळा कुंभार रंगवला. या कलाकृतींची रंगतच मुळात बोलीभाषेच्या गंमतीत आहे. शुध्दी-अशुध्दीच्या फूटपट्टया लावून रसिक त्यांचा आस्वाद घेण्याच्या भानगडीत न पडता रमले आणि त्यांनी कलाकृतीचा निखळ आनंद घेतला. सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकरांच्या प्रमाण मराठीतील नाटकांमध्येही एक वेगळे वास्तव समोर आणले होते. त्यांनाही भरपूर टीका, मानहानी, हल्ला यांचाही सामना करावा लागला होता. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी संयुक्त  महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात  तत्कालिन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांना भरसभेतून भरपूर शिव्या  दिल्या व ‘माझी प्रत्येक शिवी ही संयुक्त महाराष्ट्राची ओवी आहे'  असेही वर ठेवून दिले होते.

   म्हणजेच तुम्ही प्रमाण मराठीत बोला, लिहा किंवा मराठीच्या कुठल्या बोलीत व्यक्त व्हा..त्यातील भाव, संवेदना, हुंकार, आवाहन, तीव्रता, आशय, अभिव्यक्ती महत्वाची आहे. नुसते एकापुढे एक शब्द व्याकरणशुध्द पध्दतीने रचून उपयोगाचे नाही. शब्द तर तसे  रेल्वेच्या छापील टाईम टेबलमध्ये किंवा टेलिफोन डिरेक्टरीमध्येही असतात. पण त्यांच्या प्रेमात कुणी पडत नाहीत. केवळ संदर्भ म्हणून लोक तटस्थपणे ते वापरतात. प्रमाण, ग्रांथिक मराठीच तेवढी श्रेष्ठ आणि बाकीच्या मराठीच्या बोली कुचकामी असा हट्टाग्रह उपयोगाचा नाही. मात्र लिखाण ग्रंथस्वरुपी, वैचारीक, संकीर्ण, माहितीपर असेल तर अशावेळी प्रमाण मराठी असल्यास बरी! शालेय, महाविद्यालयीन पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमात, प्रश्नपत्रिकेत मराठीचे एक विशेष प्रमाण रुप पहायला मिळते व विद्यार्थ्यांनी त्याच स्वरुपात उत्तरे लिहावी असे अपेक्षित असते. तसे झाले नाही तर नुसताच गोंधळ माजण्याची शवयता आहे. प्रत्येक परिक्षार्थी जर प्रश्नांची उत्तरे त्याला येणाऱ्या मराठीच्या बोलीभाषेत लिहायला जाईल तर मात्र परिक्षकाला कपाळ बडवण्याची पाळी येईल. याला समाजमान्यता, शासनमान्यता नाही; हेही लक्षात घेतले पाहिजे.

   मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकीय विभागात काम करणाऱ्या आमच्यासारख्या अनेकांना रोज अनेक मराठी, अमराठी शब्दांना सामोरे जावे लागते. विविध सभा, संमेलने, महापालिका सभागृहाचे कामकाज, पत्रकार परिषदा यांचे वार्तांकन करण्याच्या निमित्ताने अनेक मराठी शब्द कानावर पडतात. आमचा आत्माही तृप्त होत असतो असे वैविध्यपूर्ण मराठी ऐकून-वाचून! आदयक्श म्होदै, म्हयला मंडळ, म्हराटी भाशा, संवदरयं, म्हापौर, मंचकावरील मान्यवर (खरे तर मंचक म्हणजे खाट किंवा पलंग! आणि मंच म्हणजे व्यासपीठ!!) पंद्रौडा, शुक्करवार, चवरेचाळीस, बंदू-भगिनी असल्या शब्दांचा मारा सहन करीत त्यातून बातमी मूल्य शोधत वार्तांकन करावे लागते. सादरीकरणातील विनोदनिर्मितीसाठी अशी भाषा वापरणे ठीक; पण ती वर्तमानपत्राची भाषा म्हणून कुणी स्विकारणार नाही. इथे प्रमाण मराठीच हवी! अनेकदा आम्हाला संपादन करताना काही नवनवे शब्द सापडतात. मागे एका पत्रलेखकाने लिहीले होते की ‘संपत्तीखोरांच्या सतरंज्या उचलण्यापेक्षा दीनांचे कैवारी बनले पाहिजे'. मला हा संपत्तीखोर शब्द खूप आवडला. आजवर हरामखोर, भांडखोर, दिवाळखोर हे  शब्द मी वाचले, ऐकले  होते. आणखी एका पत्रलेखकाने कळवले होते ‘टक्कलवंत असलेला अक्कलवंत असतोच असे नाही'.  ही म्हण की सुभाषित की ट्रकच्या मागे लिहिलेले अमोलिक साहित्य, ते मला कळेना! पण हे अर्धसत्य असावे. टक्कल असलेल्यांप्रमाणेच टक्कल न पडताही अलौकिक प्रतीची कामगिरी करुन गेलेली अनेक लोकोत्तर व्यक्तीमत्वे आहेत.  वृध्दत्व, वंशपरंपरा, कामाचा अतिरिवत ताण, मेंदूला अपुरा रवतपुरवठा होणे, शरीरात योग्य ती पोषणमूल्ये न जाणे, भेसळीच्या-कमी प्रतीच्या अन्नाचे सेवन ही व अशी अनेक कारणे टक्कल पडण्यामागे आहेत असे आरोग्य तज्ञ सांगतात. ते काही असो..पण टक्कलवंत हा शब्द मला भावला. इंग्रजीला मराठीचा जॉईन्ट मारुन अनेक नवे शब्द जन्माला आले आहेत. त्यांना कोणती ‘फूटपट्टी'  ( हाही शब्द असाच जॉईन्ट मारलेला!) लावणार? गणेशोत्सव-नवरात्रौत्सवाचे ‘ईव्हेंटीकरण'  हा शब्द त्यातलाच! ‘अक्टान्वये'  या शब्दाचाही जन्म असाच झाला आहे व त्याला महाराष्ट्र शासनमान्यताही आहे. आता बोला! आताच्या समाजमाध्यमी रमलेल्या नव्या पिढीचे तर गाडे मराठीला हिंदी-इंग्रजीचे अल्पाक्षरी पाणी मारल्याशिवाय पुढेच सरकत नाही. जानू, जीएम, जीएन, टीसी, लव यू, ओएमजी, जीएफ, बीएफ असे दोन किंवा  किंवा अनेक मराठी जीव एकमेकांना किंवा समुहाने समाजमाध्यमांवर कळवीत असतात. हे तर काहीच नाही. मला एक मराठी माणूस म्हणाला की, ‘आयुर्वेदीक मेडिसिन रेग्युलरली युज केल्याने साईड ईफेक्टस टळले'.

   या वाक्यातले मराठी शब्द शोधा आणि सांगा मला हे वाक्य मराठी की इंग्रजी? की आणखी काही? स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी दिनांक, नगरपालिका, महापौर, हुतात्मा, बोलपट, चित्रपट, विश्वस्त, निर्बंध, स्तंभ, विधीमंडळ, प्राचार्य, वेतन, अर्थसंकल्प, संचलन हे व असे कित्येक शब्द मराठी भाषेला दिले व कालांतराने ते प्रमाण मराठीत रुढ झाले. वर्तमानपत्रे, कथा-कादंबऱ्या, चित्रपट-मालिकांतूनही ते वाचायला-ऐकायला मिळू लागले.  असो. थेअरी व प्रॅक्टीकल, व्यवहार व तत्व यात काहीसा फरक हा असणारच! सर्वांना २७ तारखेस येणाऱ्या मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा!!

ता.क. मराठी राज्यातील मराठी पत्रकार शशिकांत वारीशे यांना त्यांनी लिहिलेल्या बातमीचा रोष मनात ठेवून मराठी हल्लेखोर पंढरीनाथ आंबेरकर याने त्यांना गाडीची धडक मारुन उडवले व फरफटत नेल्याने त्यात वारीशे यांचा मृत्यू ओढवला. या घटनेचा तीव्र निषेध !!

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मोदींच्या अदानी लाचारीची हद्द