चला खेळ खेळूया अंतर्गत विस्मृतीत गेलेले बैठे आणि मैदानी खेळ ऐरोली येथे एकदिवसीय कार्यशाळा

नवी मुंबई ः शालेय मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी चला खेळ खेळूया या कार्यशाळा अंतर्गत विस्मृतीत गेलेले बैठे आणि मैदानी खेळ मुलांना शिकवण्याकरिता ‘आपला कट्टा' संस्थातर्फे येत्या २५ डिसेंबर रोजी ऐरोली येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत मुलांचा मानसिक आणि शारीरिक विकास कसा करता येईल यासाठी निमंत्रित तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती कार्यशाळाचे आयोजक तथा प्रशिक्षक पंकज भोसले यांनी दिली.  

आज-काल आमची मुले वेळेत झोपत नाहीत. तासन्‌तास मोबाईल वर असतात, अशी पालकांची तक्रार असते. पण, कोरोना काळात शिक्षण घेण्यासाठी हाच मोबाईल त्यांचा मित्र झाला तेे देखील तितकेच खरे आहे. आता मात्र प्रत्येक पालकांना या मोबाईलचे गैरफायदे देखील दिसायला लागले आहेत. स्मरणशक्तीची कमतरता, सतत होणारी चीडचीड, चिंता, संवाद समस्या, लहान वयात डोळ्यांवरील चष्मा आणि मुख्यत्वे झोप न लागणे अशी सर्व लक्षणे मुलांमध्ये दिसू लागली आहेत. परिणामी, पालकांना भविष्यात आपल्या पाल्याच्या संगोपनासाठी विशेष तयारी करावी लागणार आहे. त्यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबवावे लागणार आहेत. त्याकरिता मुलांना परत मैदानाकडे घेऊन जाणे काळाची गरज बनली आहे.  

म्हणूनच ८०च्या दशकात जे खेळ आपण खेळत होतो, तेच खेळ याचा उत्तम पर्याय ठरु शकतात. लगोरी, गोट्या, भोवरे, विषामृत, आट्यापाट्या, लमाण लंगडी यासारखे विविध मैदानी खेळ शारीरिक श्रम घडवतात. सदर खेळ मुलांबरोबर पालकांनी देखील खेळायला हवेत. एकटेपणा दूर होऊन ज्या खेळांमुळे संवाद वाढतो, असे बैठे खेळ संपूर्ण कुटुंबाने एकत्रित खेळले पाहिजेत.  

आपला कट्टा गेली ९ वर्षे हेच खेळ या नव्या पिढीला शिकवत आहे. चला खेळ खेळूया या कार्यशाळा अंतर्गत हेच विस्मृतीत गेलेले लगोरी, आट्यापाट्या, काठ्याकाठ्या, लामण लंगडी, गाडा-गाडा, गुंपयाचा खेळ, विषामृत या विविध पारंपारिक मैदानी खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच मंकला, बाघवाल, पट, चदुरंग, मोक्षपट, आठचल्लस या सारखे विविध बैठे खेळ देखील शिकवले जाणार आहेत.  

सदर कार्यशाळेचे आयोजन ऐरोली, सेवटर-५ मधील कै. भास्कर घाडी मैदान, चिंचवली गार्डन शेजारी येथे २५ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायं. ४ पर्यंत होणार असून अधिक माहितीसाठी ९८२१००९१३७ , ९७३०९७७५७९, ८०९७३२६६९९  या भ्रमणध्वनींवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिका शिक्षण विभागात १०८१ नवीन पदांना शासनाची मंजुरी