महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
शाळेचा बस चालक मद्यधुंद अवस्थेत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करताना आढळुन आल्याने खळबळ
नवी मुंबई : उलवे परिसरातील एका खाजगी शाळेचा बस चालक मद्यधुंद अवस्थेत शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करून घेऊन जाताना आढळुन आल्याने खळबळ उडाली आहे. अशोक जनार्दन थोरात (६५) असे या स्कूल बस चालकाचे नाव असून स्कूल बसमधून ४० विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना त्याने एका रिक्षाला धडक दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस सुसाट चालवली असती तर एखादी अनुचित घटना घडली असती. अशी भीती पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.या प्रकारानंतर एनआरआय पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत शाळेची बस चालवून ४० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या सदर बस चालकाला अटक केली आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला बस चालक अशोक थोरात हा उलवे सेक्टर-१९ मध्ये राहण्यास असून तो त्याच भागातील आय एम एस या शाळेच्या स्कूल बसवर चालक म्हणून कामाला आहे. मंगळवारी सकाळी चालक अशोक थोरात हा दारू पिऊन मद्यधुंद अवस्थेत शाळेच्या बसवर गेला होता. त्यानंतर तो मद्यधुंद अवस्थेत ४० विद्यार्थांना आपल्या बसमध्ये घेऊन निघाला होता. मात्र शाळेपासून काही अंतरावर या बस चालकाने एका रिक्षाला धडक दिली. यावेळी रिक्षा चालकाने वेळीच रिक्षा बाजूला घेतल्याने मोठा अपघात टळला. मात्र या अपघातानंतर त्या भागातील नागरिकांनी शाळेच्या बसकडे धाव घेतल्यानंतर स्कूल बस चालक हा सकाळीच मद्यप्राशन करून बस चालवत असल्याचे तसेच त्याला कोणत्याही प्रकारची शुद्ध नसल्याचे आढळुन आले. जर या चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस सुसाट चालवली असती तर एखादी अनुचित घटना घडली असती. अशी भीती व्यक्त करत नागरिकांनी मद्यधुंद अवस्थेतील चालकाला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर पोलिसांनी स्कूल बस चालक अशोक थोरात याने मद्य धुंद अवस्थेत बस चालवून ४० विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घटल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. दरम्यान, अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी चालकांसाठी नियमावली तयार करण्याची मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे. तसेच, आपल्या पाल्याला शाळेत पाठवताना गाडीचा चालक शुद्धीत आहे की नाही हे सुद्धा तपासणे आवश्यक असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.