सीबीएसईच्या शाळेत शिक्षकांची कमतरता,पालक हवाल दिल

कुणी शिक्षक देता का शिक्षक

नवी मुंबई -: नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोपर खैरणे येथील सीबीएसई शाळेत १२५० विद्यार्थ्यांची मदत मदार अवघ्या दहा शिक्षकांवर आहे.आता सहामाही परीक्षा तोंडावर आली असून तरीदेखील या शाळेला शिक्षक मिळेनात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यामुळे या शाळेला कुणी शिक्षक देता का शिक्षक अशी  म्हणन्याची  वेळ येथील पालकांवर आली असून या  ठिकाणी तात्काळ शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांना देखील गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे या हेतूने सीबीएसई बोर्डाचे शाळा सुरू केली आहे. नेरुळ आणि कोपरखैरणे येथे शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. नेरुळ येथील शाळा महापालिका आणि संस्थेच्या माध्यमातून चालवण्यात येत आहे. त्यामुळे या ठिकाणी १२०० विद्यार्थ्यांसाठी ३६ शिक्षक आहेत . मात्र दुसरीकडे कोपरखैरणे येथील शाळेत १२५० विद्यार्थ्यांसाठी अवघे १० शिक्षक आहेत. येत्या १० ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांची परीक्षा होणे अपेक्षित आहे.  मात्र परीक्षा तोंडावर आली असून आत्तापर्यंत अवघे २० ते २५ टक्केच अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे. अद्याप २०% अभ्यासक्रम घेणे बाकी आहे. जिथे ६ तासांची शाळा भरते तेच या ठिकाणी अवघी ३ तासांची शाळा असते . या तीन तासात शिक्षक विद्यार्थ्यांना काय काय आणि कोणत्या पद्धतीने शिकवणार?  असा प्रश्न उपस्थित होत आहे.  त्यामुळे येथील शिक्षकांनाही परीक्षा जवळ आली असून अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा ? असा प्रश्न पडला आहे . कोपरखैरणे येथील शाळेत एकूण १२५० विद्यार्थी त्यापैकी प्राथमिक मध्ये १७ तुकडीत ६६६ विद्यार्थी संख्या असून यासाठी केवळ ५ शिक्षक आहेत. तर  नर्सरीकरिता ४ शिक्षक असून १६ तुकडीमध्ये ५७६ पटसंख्या आहे आणि १  मुख्याध्यापक असे १० शिक्षक आहेत. जून-जुलै पासून शिक्षक मिळतील या आशेवर विद्यार्थी आणि पालक आहेत , मात्र अद्याप पुरेसे शिक्षकच उपलब्ध नाहीत. त्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत असून या शाळेत तात्काळ  शिक्षकांची नेमणूक करण्याची मागणी मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कडे केली आहे.या प्रकरणी मनपा शिक्षण अधिकारी योगेश कडूसकर यांच्या.सोबत संपर्क साधला असता प्रतिसाद लाभला नाही.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

नील शेकटकर ठरला जगातील सर्वात कमी वयाचा जलतरणपटू