कविता समरसून शिकविणारे गुरुजन चिरकाल स्मरणात

पाचवी इयत्तेच्या सर्व शिक्षकांसाठी "कवितेची कार्यशाळा" संपन्न 

नवी मुंबई : कविता हे कमीत कमी शब्दात व्यक्त होण्याचं एक चांगलं माध्यम असून कविता स्वरबद्द झाली की तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते आणि अशा कविता जे गुरुजन विद्यार्थ्यांना समरसून शिकवितात ते गुरुजन विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहतात असे मत व्यक्त करतानाच संगीतकार अमृत पाटील नेरुळकर यांनी सर्वच कवितांना संगीताच्या माध्यमातून चांगला न्याय दिल्याचे नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी सांगितले. 

"गाऊ आनंदे" या उपक्रमांतर्गत शाळा क्र. १०१, शिरवणे येथे संगीतकार अमृत पाटील नेरुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय अभ्यासक्रमातील पाचवी इयत्तेच्या सर्व शिक्षकांसाठी "कवितेची कार्यशाळा" आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्र समन्वयक सुप्रिया पायरे, रेखा पाटील, प्रशांत म्हात्रे, मुख्याध्यापिका तन्वी सुर्वे, माधुरी नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

      कवितेच्या या कार्यशाळेत पाचवी इयत्तेच्या शिक्षकांना संजीवनी मराठे यांची माय मराठी, वसंत बापट यांची वल्हवा रं वल्हवा रं, पद्मिनी बिनीवले यांची रंग जादूचे पेटीमधले, सदाशिव माळी यांची माहेर, यशवंत यांची सण एक दिन, सुकन्या आगाशे यांची प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, अनिल यांची वासरु, बहिणाबाई चौधरी यांची कापणी आदी कविता तालासुरात म्हणावयास शिकविण्यात आल्या. यावेळी शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनीही आपल्या सुरेल आवाजात दोन गाणी गाऊन सर्व उपस्थित प्रशिक्षणार्थींना सुखद धक्का दिला.

      सदर उपक्रम आनंददायी व आत्मिक संबंध देणारा असून अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षक विजय गावित, नेहा खरात यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

      या कार्यक्रमाची भैरवी रागातील "आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना" या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाने सांगता झाली. या कार्यक्रमास विकास नाईक व भानुदास पाटील यांनी साथ सांगत केली.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

महापालिका सीबीएसई शाळेमध्ये महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंती साजरी