मुलांमध्ये जिज्ञासूवृत्ती, विज्ञानदृष्टी जागृत करण्याची गरज - डॉ.रघुनाथ माशेलकर

विज्ञानाधिष्ठित समाजाकडे या विषयावर डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद

नवी मुंबई ः विज्ञाननिष्ठ भारताच्या निर्मितीसाठी देशाचे उज्वल भविष्य असणाऱ्या लहान मुलांमध्ये विज्ञानदृष्टी जागृत करण्याची गरज असून त्यादृष्टीने आधुनिक काळाची पावले ओळखत बहुआयामी शिक्षण देण्याची आवश्यकता ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केली.


वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आयोजित विज्ञानाधिष्ठित समाजाकडे या विषयावर डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी आणि नागरिकांशी सहज संवाद साधत अत्यंत सोप्या भाषेत विज्ञान, तंत्रज्ञान विषयक माहितीचा खजिना खुला केला. तसेच अनेक उदाहरणे देत आगामी काळातील आव्हानांविषयी भाष्य केले.


आपल्याला ज्ञानेश्वरांकडून विज्ञानेश्वरांकडे जायचे आहे. त्यामुळे मुलांना भरपूर शिकू द्या, त्यांच्या शिक्षणातच त्यांचे भविष्य आहे, असे पालकांना आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या जीवनात योग्य दिशा देणाऱ्या शिक्षकांचे महत्व आपल्या भावेसरांच्या आठवणी सांगत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी उलगडताना मुलांमध्ये जिज्ञासा वाढीसाठी त्यांना प्रश्न विचारण्याची सवय लावण्याची गरज असल्याचे सांगितले. शिक्षकांना प्रतिष्ठा देणे समाजाची जबाबदारी आहे. आजचा विद्यार्थी मोबाईलमुळे साऱ्या जगाच्या माहितीशी जोडला गेला आहे. त्यामुळे शिक्षकांनीही माहितीच्या दृष्टीने अद्ययावत राहण्याची, नवा विद्यार्थी येतोय त्याच्यासाठी नवे होण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


‘राईट टू एज्युकेशन'च्या पुढे जाऊन ‘डिजीटल राईट टू एज्युकेशन'ची गरज व्यक्त करताना डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आजच्या झपाट्याने बदलत्या युगात नवनवीन लागणाऱ्या शोधांमुळे भविष्याचा वेध घ्ोऊन शिक्षण पध्दतीत करायच्या बदलांचा विचार करुन त्यादृष्टीने शाळांमध्ये प्रयोग केले जावेत, असे मत मांडले. आपण जे शिकवतो ते मुलांच्या भविष्याचा विचार करुन शिकवायला हवे, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.


कोरोना काळात मुलांना ऑनलाईन शिक्षणामुळे वेगळ्या स्वरुपाच्या शिक्षण पध्दतीचा अनुभव घ्ोता आला असे सकारात्मक मत मांडत डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या ७९ वर्षांच्या जीवनातील अनुभवांच्या परिपाकातून आलेले ५ माशेलकर मंत्र यावेळी सांगितले. महत्वाकांक्षा उंच ठेवा, प्रज्ञेला परिश्रमाची जोड द्या, समस्येचा भाग न होता उत्तराचा भाग होण्याचा कसोशीने प्रयत्न करा, आत्मविश्वास-चिकाटीने काम करीत रहा आणि उत्तमतेच्या यशाच्या पायऱ्यांना शेवट नसतो या ५ अनुभवसिध्द मंत्राचे महत्व त्यांनी विविध प्रसंग, आठवणी सांगत सहजपणे उलगडले.


याप्रसंगी प्रास्ताविकातून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी लहानपणी शाळेत असताना डॉ. जयंत नारळीकर यांचे व्याख्यान ऐकल्यानंतर भारले गेल्याची आठवण सांगितली. लहान वयात डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्यासारख्या महनीय व्यक्तीला प्रत्यक्ष बघण्याचा, ऐकण्याचा भाग्ययोग लाभणे अनेक जणांसाठी प्रेरणा देणारी गोष्ट ठरणार असून अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भविष्याच्या प्रगतीसाठी मौलिक असे विचार ऐकण्याचा सुयोग लाभला. यामुळे अमृत महोत्सव आयोजनाचे सार्थक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
 
‘नवी मुंबई नवे शहर असून त्याच्या नाविन्य पूर्णतेतील गुणवत्तेचा प्रत्यय विविध कामांतून येतो. विष्णुदास भावे नाट्यगृहात प्रदर्शित केलेल्या महापालिकेच्या सध्या कार्यान्वित आणि नियोजित प्रकल्पांविषयीचे माहितीफलक तसेच मॉडेल्स अवलोकन केल्यानंतर डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी आपले मत व्यक्त केले.' 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

यश प्राप्तीसाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करा - प्रवीण तांबे