शासनाकडून न्यायाच्या प्रतिक्षेत रत्नागिरी येथील फिशरींग इंजिनिअरींगचे विद्यार्थी

शासनाच्या मत्स्य व्यवसाय-बंदर विभागाकडून नोकऱ्या, रोजगार-व्यवसाय आणि योजनांचा लाभ न  देता अन्याय

नवी मुंबई ः राज्य शासनाच्या डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे रत्नागिरी शिरगाव येथील डिप्लोमा इन फिशरींग इंजिनिअरींगमध्ये शिक्षण घेणाऱ्या कोकणातील आणि राज्यातील भूमीपुत्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध समस्या आणि सूचनांवर मार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांची भेट घेतली. तत्पूर्वी नवी मुंबईतील पालघर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या पाल्यांनी वाशी येथे दशरथ भगत यांची प्रथम भेट घेतली होती.

यावेळी फिशरींग इंजिनिअरींगचा डिप्लोमा केलेल्या तरुणांनी फिशरींग इंजिनिअरींग करुन देखील राज्य शासनाच्या मत्स्य व्यवसाय-बंदर विभागाकडून पात्रता असून देखील नोकऱ्या, रोजगार-व्यवसाय आणि योजनांचा लाभ न देण्याबाबत अन्याय होत असल्याची कैफियत मांडली होती. त्याअनुषंगाने दशरथ भगत यांनी प्रत्यक्ष शिक्षण घ्ोत असलेल्या विद्यापीठास आणि तेथील विद्यार्थी यांची भेट शिरगाव, रत्नागिरी येथे घेतली. यावेळी झालेल्या संवादात सर्वच विद्यार्थ्यांनी आम्ही भविष्यात मोठे स्वप्न घेऊनच मत्स्य व्यवसाय- बंदराशी संबंधित कार्यात नोकरी आणि रोजगार प्राप्त करुन देशाच्या तसेच राज्याच्या उन्नतीसाठी कटीबध्द राहू या उद्दिष्टांसह डिप्लोमा इन फिशरींग इंजिनिअरींग क्षेत्र निवडले आहे.
परंतु, राज्य शासनाच्या संबंधित विभागामार्फत गेल्या अनेक वर्षांपासून जाणीवपूर्वक अन्याय केल्याने आम्हाला सरकार नोकऱ्या, व्यवसाय आणि बंदर तत्सम खात्यामध्ये सागर मित्र म्हणून सामावून घेऊन न्याय द्यावा, अशी अपेक्षा उद्विग्न भावनेतून व्यक्त केल्या. सागर, नद्या तलाव, मत्स्य शेती यासंबंधित मत्स्य व्यवसाय आणि बंदर विभागाच्या अखत्यारितील टेक्निकल तसेच प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव असलेल्या विद्यार्थ्यांनाच राज्य सरकारने नोकरी आणि रोजगार याबाबतीत वाऱ्यावर सोडल्यास भविष्यात कृषी विद्यापीठाच्या या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेशासाठी मिळतील का? असा देखील सवाल विद्यार्थ्यांनी संवादाच्या वेळी उपस्थित केला.

दरम्यान, सर्वच विद्यार्थ्यांनी तुमच्यावरील अन्याया विरोधात सर्वप्रथम संघटीत व्हावे आणि आजपासून संघर्षाची सुरुवात करावी. एकतेतुन प्रामाणिक लढा उभारा. त्यायोगे राज्य सरकार, शासन आणि जनतेचे लक्ष वेधले गेले तरच अन्याय दूर होऊन अनेकांना न्याय मिळेल, असे दशरथ भगत यांनी यावेळी या
विद्यार्थ्यांना सूचित केले.

 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या संधी - लोकनेते रामशेठ ठाकूर