दर्जेदार शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या संधी - लोकनेते रामशेठ ठाकूर

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार

खारघर : रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या (आरटीपीएस) माध्यमातून मिळत असलेल्या दर्जेदार शिक्षणामुळे येथील विद्यार्थ्यांना अनेक चांगल्या संधी निर्माण होत आहेत. त्यामुळे येणार्‍या काळातही स्कूल प्रगतीच्या दिशेने काम करीत राहिल, असा विश्वास जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. ते स्कूलच्या स्थापना दिन सोहळ्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा 11वा भूमिपूजन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, शकुंतला रामशेठ ठाकूर, संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे, उपसचिव श्री. थोरात, संचालिका वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, मुख्याध्यापिका राज अलोनी, भाजपचे खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक प्रवीण पाटील, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, ज्येष्ठ नेते प्रभाकर जोशी, दीपक शिंदे, साधना पवार, कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर स्कूलच्या मुख्याध्यापिका स्वप्नाली म्हात्रे, रामशेठ ठाकूर ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्सच्या श्रीमती नायर, सीकेटी विद्यालयाच्या संध्या अय्यर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस शाळेचा भूमिपूजन दिवस म्हणून साजरा केला जातो. या शाळेचा पाया रामशेठ ठाकूर यांनी घातला आहे. या दिवशी शाळेतील निवडलेले विद्यार्थी प्रतिनिधी शपथ घेतात. या सोहळ्याची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांच्या समूह गायनाने झाली. त्यानंतर आदेश ठाकूर याने रामशेठ ठाकूर यांचा परिचय करून दिला. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या राज्यांतील लोकनृत्ये सादर केली.

शैक्षणिक वर्ष 2019-20, 2020-21, 2021-22मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा चषक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हस्ते या वेळी सत्कार करण्यात आला. रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल मधील विद्यार्थी सध्या जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी आयआयटी, एमबीबीएस, एलएलबी, बी.टेक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत पुढील शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना घडवणार्‍या शिक्षकांचासुद्धा या सोहळ्यात सत्कार करण्यात आला.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

जिल्हास्तरीय द्रोणागिरी फुटबॉल स्पर्धेचे महादेव घरत यांच्या शुभहस्ते उद्‌घाटन