नमुंमपा शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना उत्तेजन देण्यासाठी अभिनव योजना

महापालिकेच्या विद्यार्थी खेळाडुंंना राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी


नवी मुंबई ः महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महापालिका शाळांतील गुणवंत खेळाडुंना उच्च स्तरावर खेळायला जाण्यासाठी योग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश शिक्षण विभागास दिले होते. त्यानुसार या क्षेत्रातील अनुभवी तज्ञांशी चर्चा करुन महापालिका शाळांतील गुणवंत विद्यार्थी खेळाडुंकरिता विशेष योजना तयार करण्यात आली. या योजनेस महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची मान्यता प्राप्त झाल्याने सदर विद्यार्थी खेळाडुंंना स्वतःची गुणवत्ता सिध्द करण्यासाठी राज्य आणि
राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.


या नवीन योजनेद्वारे नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागांतर्गत शाळांतील जिल्हा स्तरावर क्रीडा स्पर्धेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ पासून संबंधीत खेळातील उच्च प्रशिक्षण घेण्याकरिता क्रीडा प्रबोधिनी, प्रशिक्षण संस्था यांच्या शुल्कासाठी प्रति महिना ५ हजार रुपये मानधन पुढील तीन वर्षांपर्यंत दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे आवश्यक क्रीडा साहित्य खरेदीसाठी प्रती विद्यार्थी १५ हजार रुपये इतकी रक्कम एकरकमी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच शारीरिक तंदुरुस्ती खेळाकरिता एक महत्वाची बाब असल्याने आवश्यक पोषक आहार पुरवठा याकरिता प्रती महिना ५ हजार रुपये इतके मानधन तीन वर्ष दिले जाणार आहे.


नवी मुंबई महापालिका शाळांतून गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर दिला जात असल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये महापालिकेच्या शाळांचे मोठ्या प्रमाणावर आकर्षण दिसून येत असून दरवर्षी शाळांतील पटसंख्या लक्षणीय संख्येने वाढताना दिसत आहे. पाठ्यस्तकातील क्रमिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील अंगभूत गुणांना वाव
देण्याचा प्रयत्न विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून केला जात आहे. नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी ॲथलेटिक्स, खो-खो, कबड्डी, फुटबॉल अशा विविध खेळांमध्ये गुणवत्ता सिध्द केली असून अनेक विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावरील स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. तरीही अशा क्रीडा गुणसंपन्न विद्यार्थ्यांना राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक क्रीडा साहित्य उपलब्ध न झाल्याने अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. नेमकी हीच बाब हेरुन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर विद्यार्थ्यांच्या अंगभूत क्रीडागुणांना उत्तेजन देण्यासाठी अभिनव योजना राबविली आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

एफ.जी. नाईक महाविद्यालयात महारक्तदान शिबिर संपन्न