महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
अनधिकृत फेरीवाले न हटवल्यास संबंधित अधिकाऱ्यांना फोन लावा, जाब विचारा आंदोलन
नवी मुंबई ः महापालिका प्रभाग क्रमांक-३५ मधील नेरुळ गांव, सेक्टर-२० येथील नागरी समस्यांबाबत ‘मनसे'चे उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली नेरुळ विभाग अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ‘मनसे'च्या शिष्टमंडळाने प्रभागातील समस्यांचा पाढा विभाग अधिकारी यांच्या समोर वाचून दाखविला.
नेरुळ गावातील जवळ जवळ सर्वच रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाले आहे. परंतु, ३ मुख्य रस्ते पक्षीय राजकारणामुळे असेच दुरावस्थेत आहेत. सदर रस्त्यांची यंदाच्या पहिल्याच पावसाळ्यात चाळण झाली असून रस्त्यात जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. नेरुळ स्टेशन पश्चिम, नेरुळ गांव प्रवेशद्वार ते नेरुळ गांव महापालिका शाळा क्रं.१० येथील रस्त्यांवर अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत फळविक्रेते यांनी उच्छाद मांडला असून रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे. तसेच नेरुळ गांव स्मशानभूमीत पिण्याच्या स्वच्छ पाण्याची सोय नसल्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे.
त्यामुळे प्रभागातील समस्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात; अन्यथा नागरिकांच्या समस्यांबाबत ‘मनसे'च्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी ‘मनसे'चे विभाग अध्यक्ष अनिकेत भोपी यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिला. महत्वाचे म्हणजे नेरुळ स्टेशन पश्चिम येथील अनधिकृत फेरीवाले न हटवल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांची नावे आणि मोबाईल क्रमांक बॅनरद्वारे सर्वसामान्यांसाठी जाहिर करुन ‘फोन लावा, जाब विचारा' आंदोलन सुरु करण्यात येईल, असा इशाराही उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी ‘मनसे'च्या शिष्टमंडळात उपशहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, विभाग अध्यक्ष अनिकेत भोपी यांच्यासह ‘मनविसे'चे सचिव समृध्द भोपी, शाखा अध्यक्ष विनोद पाटील, प्रसाद दळवी, पदाधिकारी उपस्थित होते.