नवी मुंबई महानगरपालिका शाळांचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 98.12 टक्के

नवी मुंबई : मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी एस.एस.सी. बोर्ड परीक्षेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या 20 माध्यमिक शाळांचा सरासरी निकाल 98.12 टक्के लागला असून नमुंमपा माध्यमिक शाळा क्रमांक 111, तुर्भे स्टोअरचा तेजस प्रदीप गायके हा विद्यार्थी 94.20 टक्के गुण संपादन करुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये सर्वाधिक गुण संपादन करणारा विद्यार्थी ठरला आहे.

नमुंमपा शाळा क्रमांक 114, सेक्टर 7कोपरखैरणे येथील सानिका कैलास गुंडकर ही विद्यार्थिनी 92.20 टक्के गुण संपादन करुन महापालिका शाळांमध्ये व्दितीय तसेच संगीता हरिनाथ राय ही नमुंमपा शाळा क्र. 106, सेक्टर 5, कोपरखैरणेची विद्यार्थिनी 90.40 टक्के गुण प्राप्त करुन तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

सन 2006-2007 या शैक्षणिक वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांतून विद्यार्थी इयत्ता दहावीची बोर्ड परीक्षा देत असून प्रत्येक वर्षी निकालाची गुणवत्ता उंचावताना दिसत आहे. यावर्षी महानगरपालिकेच्या 20 शाळांमधून 2612 विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेला बसले असून 98.12 टक्के इतका महानगरपालिका शाळांचा सरासरी निकाल लागला आहे.

त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका माध्यमिक विद्यालय शिरवणे, करावे, वाशी, तुर्भे स्टोअर, पावणे, खैरणे, श्रमिकनगर, सानपाडा, गोठिवली, दिवाळे या शाळांचा निकाल 100 टक्के तसेच नेरुळ या शाळेचा – 99.28, घणसोली – 98.89, दिघा – 98.75, राबाडा – 98.41, से. 7 कोपरखैरणे – 97.64, ऐरोली – 96.06, महापे – 95.45, से. 5 कोपरखैरणे – 95.11, दिवा – 94.44, तुर्भे गांव – 92.56 टक्के याप्रकारे निकाल लागला आहे.

 

इटीसी केंद्राचा निकाल 100 टक्के

      अशाच प्रकारे महानगरपालिकेचा इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्र हा अभिनव उपक्रम देशापरदेशात नावाजला जात असून या केंद्राचा निकाल यावर्षीही 100 टक्के लागलेला आहे. केंद्रातील सिद्धेश वाघमारे या मतिमंद विद्यार्थ्याने मराठी माध्यमातून 79 टक्के गुण संपादन केले तर रंजन ठाकूर या अंधत्व विद्यार्थ्याने हिंदी माध्यमातून 74 टक्के गुण संपादन केले असून रितिक नरसाळे या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्याने 89.90 टक्के गुण प्राप्त केले आहेत. तसेच त्याचप्रमाणे पालक मार्गदर्शक वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जिगर चौधरी या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्याने 70 टक्के गुण संपादन केले.

     या सर्व विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचीप्रात्यक्षिकांची संपूर्ण तयारी इ.टी.सी. अपंग शिक्षण प्रशिक्षण केंद्रामार्फत करून घेण्यात आली होती.

       प्राथमिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे ही ऐच्छिक जबाबदारी स्विकारुन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने माध्यमिक शिक्षण दिले जाते. त्यामध्ये सर्व सामाजिक स्तरांतील विद्यार्थ्यांचा समावेश असल्याने खाजगी शाळांच्या तुलनेत महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी संपादित केलेले हे यश निश्चितच अभिनंदनास पात्र आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांनी मिळविलेले यशही कौतुकास्पद असून या सर्वांच्या यशाबद्दल महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांनी विशेष कौतुक केले असून या गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या शिक्षकपालकांचेही अभिनंदन करण्यात येत आहे.

Read Previous

लॉरेम इप्सम म्हणजे काय?

Read Next

सिद्धार्थ हायस्कूल ,खारघर  १० वी विद्यार्थ्यांच्या १०० % निकालाची उज्वल परंपरा कायम !