राजकीय पक्षाच्या अनधिकृत कार्यालयास महापालिका प्रशासनाचे अभय ?

नवी मुंबई : वाशी सेक्टर-३० मधील  भूखंड क्रमांक-१९ ए वर बांधण्यात आलेल्या अरुणाचल भवन या इमारतीमध्ये सातवा आणि दहावा मजला आपत्ती काळाकरिता राखीव ठेवण्यात आला होता. परंतु अग्निशमन नियमांना डावलून सदर जागेवर संबंधित विकासकाद्वारे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. याशिवाय शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालेले राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षाचे प्रदेश सचिव मा. प्रशांत पाटील यांचे कार्यालय याच जागेत आहे. अशा प्रकारच्या अतिक्रमित बांधकामामुळे भविष्यात एखादी आग्नीजन्य दुर्घटना घडली तर लोकांना सुरक्षितरीत्या बाहेर काढणे अशक्य होणार आहे. 

      याविषयी महाराष्ट्र विकास आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. मल्लिकार्जुन पुजारी यांनी महानगरपालिकेच्या निदर्शनास ही बाब आणली असून कागदोपत्री पाठपुरावा करून सदर बाबतीत 6 मे रोजी 'क' विभाग आयुक्त सुखदेव येडवे यांचेकडे लेखी स्वरूपात तक्रारही करण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे मल्लिकार्जुन पुजारी प्रदेश उपाध्यक्ष यांच्यासह नवी मुंबई जिल्हा संघटक विजय साळवे, ऐरोली विधानसभा अध्यक्षा सौ. आरती ताई रोहीदास पाटील, जिल्हा सरचिटणीस धरमदेव ठाकूर, घनसोली तालुका उपाध्यक्षा सौ रूपाली ताई कांबळे, कोपर खैरणे तालुका उपाध्यक्षा सौ.अश्विनी ताई केदारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. 

यानंतरही कागदोपत्री पाठपुरावा करून देखील पालिका आयुक्तांद्वारे कारवाई होत नाही म्हणून शेवटी लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेचे काटेकोर पालन करून महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मा. मल्लिकार्जुन पुजारी पालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा गंभीर इशारा पक्षाद्वारे देण्यात आला आहे. 

अशा घडणाऱ्या घटनांमुळे राजकीय पक्ष व प्रशासनातील अधिकारी यांचे साटेलोटे जुळत असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नवी मुंबई  वाहतूक पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकीच्या 82 सायलेन्सर रोड रोलर चालवून केले नष्ट