अडवली भुतावली शाळेची आदर्श शाळा म्हणून निवड

नवी मुंबई : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील काटी या गावातील जिल्हा परिषद शाळा तसेच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अडवली भुतावली या आदिवासी क्षेत्रातील पालिका शाळा क्रमांक ४१ या दोन शाळांची निवड जॉय सामाजिक संस्थेमार्फत आदर्श शाळा पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. दिनांक ५ जून रोजी दादर (मुंबई) येथे आरजु सभागृहात माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी, साहित्यिक राम नेमाडे, शिक्षक नेते जनार्दन जंगले आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. यावेळी संस्थेच्या वतीने आयोजिय करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वृत्तपत्रलेखन, ग्रीटिंग कार्ड स्पर्धा, कविता स्पर्धा तसेच नारीशक्ती पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना, कोरोना काळात गोरगरिबांसाठी मदत करणाऱ्या सामाजिक घटकांना तसेच जॉय संस्थेच्या सभासदांना याप्रसंगी गौरवण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील काटी या छोट्याशा पाड्यावरील जिल्हा परिषद शाळा आदिवासी कुटुंबांतील मुलांसाठी उत्तम प्रकारे ज्ञानदानाचे कार्य करत असून शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर तसेच शिक्षक श्री प्रवीण बडे तसेच केंद्रप्रमुख गुरुनाथ पष्टे यांची शाळेच्या प्रगती व विकासासाठी सुरू असलेली धडपड लक्षात घेऊन या शाळेची आदर्श शाळा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबईमधील अडवली भुतावली या पूर्णतः आदिवासी भागातील शाळेतील मुलांची खेळ, अभ्यासातील मूलांच्या प्रगतीचा वाढता आलेख व त्यासाठी मुख्याध्यापक भिकाजी सावंत, शिक्षक पारधी, भोये, शिवशरण, सौ घोडविंदे, रणशिंगे, भोईर मॅडम यांचे अथक परिश्रम यामुळे पालिकेच्या शाळा क्रमांक ४१ ची निवड संस्थेच्या वतीने करण्यात येत असल्याची माहिती जॉय चे संस्थापक गणेश हिरवे यांनी दिली आहे. पालघर व ठाणे जिल्ह्यातील या दोन्ही शाळांच्या आदर्श शाळा पुरस्कारासाठी झालेल्या निवडीबद्दल सर्व समाजातील सर्व स्तरांतून या शाळांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मुलांच्या शैक्षणिक वाटचालीतील प्रगती पाहून शाळांना आदर्श शाळेचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी जॉय संस्थेचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ०५ जूनला 'भव्य सायक्लोथॉन स्पर्धा'