रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ०५ जूनला 'भव्य सायक्लोथॉन स्पर्धा' 

पनवेल: सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा ७१ वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०५ जून रोजी सकाळी ०६ वाजता उलवा नोडमध्ये 'भव्य उलवे सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा' होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुक्रवारपर्यँत ७०० हून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केली आहे.  
 
         सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत, त्या अनुषंगाने सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. हि स्पर्धा महिला व पुरुष प्रकारात आणि २५ किमी, १५ किमी, १० किमी व ०३ किमी अंतर या चार गटात होणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष आकर्षण असलेल्या २५ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्यास २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये, तृतीय क्रमांकास ०५ हजार रुपये, चतुर्थ व पाचव्या क्रमांकास अनुक्रमे ०३ हजार आणि ०२ हजार रुपये तसेच पाच उत्तेजनार्थ बक्षिसे आहेत. तसेच स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकास टी शर्ट व मेडल देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
 
          स्पर्धकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी झुम्बा मनोरंजनाचा लाभ प्रेक्षक व स्पर्धकांना घेता येणार आहे. त्याचबरोबर ३ ते ६ वर्षेंपर्यंतच्या लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सोसायटींसाठी विशेष स्पर्धाही होणार आहेत. त्यामध्ये स्वच्छ सोसायटी, स्पर्धेत सर्वात जास्त सहभाग, आणि ग्रीन सोसायटी या स्पर्धेचा समावेश आहे. या स्पर्धेतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकास अनुक्रमे १० हजार, ०३ हजार व ०२ हजार रुपये असे बक्षिस असणार आहे. या स्पर्धेत सहभाग होण्यासाठी रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ऑफलाईन तर www.rtisc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात नोंदणी करता येणार आहे. अधिक माहितीसाठी ९०२९०६५५३३ किंवा ९८२०१९८३८१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

भव्य उलवे सायक्लोथॉन २०२२' स्पर्धेला उदंड प्रतिसाद; तब्बल ९३४ सायकलपटू स्पर्धकांचा सहभाग