नवी मुंबईत रविवारी राष्ट्रीय योगा स्पर्धा

 

नवी मुंबई - योगा प्रशिक्षणात अग्रेसर असलेले आर्ट ऑफ लर्निंग इन्स्टीट्यूट आणि लायन्स क्लब ऑफ नवी मुंबई यांच्या वतीने नवी मुंबईत राष्ट्रीय पातळीवरील योगा स्पर्धा अयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा येत्या रविवारी सानपाडा येथील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेत देशभरातील हजारो स्पर्धक सहभागी होणार आहेत. त्यामध्ये सहा वर्षांच्या मुलांपासून ते ७५ वर्षांच्या वृध्दांचाही समावेश असणार असून स्पर्धा एकूण आठ गटामध्ये होणार आहे.

सदृढ आरोग्यासाठी योगासने किती महत्त्वाची आहेत, याची जनजागृती करण्यासाठी आर्ट ऑफ लर्निंग इंस्टिट्यूटच्या माध्यमातून या स्पर्धेचे गेल्या ११ वर्षांपासून आयोजन करण्यात येत आहे. दरवर्षी या स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातील स्पर्धक सहभागी होतात. यंदाच्या स्पर्धेमध्येही मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होणार आहेत. सानपाडा येथील साधु वासवानी शाळेमध्ये रविवारी सकाळी साडेदहा वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर स्पर्धक योगासने सादर करणार आहेत. प्रत्येक गटात विशेष प्राविण्य दाखविणाऱ्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता बक्षिस वितरण समारंभ पार पडणार आहे. या प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, सीआरपीएफचे पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता, सीडब्लुएच्या अध्यक्षा रितू दत्ता आदी उपस्थित राहणार आहेत. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

२७ ते २९ मे दरम्यान  मनसेचा 'उरण महोत्सव'