एपीएमसीतील सत्रा प्लाझामधील पाम अटलांटिक हुक्का पार्लरवर पुन्हा कारवाई 

नवी मुंबई : रात्री उशीरापर्यंत बेकायदेशीरपणे सुरु असलेले एपीएमसीतील सत्रा प्लाझा या इमारतीतीत रात्री उशिरापर्यंत सुरु असलेले हॉटेल पाम अटलांटिक बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत हुक्का पार्लर मालक निकुंज सावला याने हुज्जत घालुन शिवीगाळ केल्याची तसेच त्यांना बघुन घेण्याची व त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे खोटी तक्रार करण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. या प्रकारानंतर निकुंज सावला याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर देखील सोमवारी भरदुपारी हे हुक्का पार्लर राजसोरसपणे सुरु असल्याचे पोलिसांना आढळुन आले. त्यामुळे एपीएमसी पोलिसांनी भरदुपारी या हुक्का पार्लरवर पुन्हा छापा मारुन हुक्कापार्लरमधील चालक व वेटर तसेच 14 ग्राहक अशा एकुण 19 जणांवर कारवाई केली आहे.  

एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्रा प्लाझा या इमारतीतील पाम अटलांटिक हे हॉटेल रात्री उशीरापर्यंत सुरु असल्याची तसेच सत्रा प्लाझा इमारतीसमोर लोकांची गर्दी जमल्याची माहिती रविवारी रात्री गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा मेखले यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास सत्रा प्लाझा इमारतीत प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली असता, सदर ठिकाणी हॉटेल पाम अटलांटिकमध्ये हुक्का पार्लर सुरु असल्याचे तसेच अनेक ग्राहक आतमध्ये गर्दी करुन हुक्का ओढत बसल्याचे आढळुन आले.  

त्यामुळे मेखले यांनी सदरचे हुक्का पार्लर बंद करण्यास बजावले असता, हुक्का पार्लर मालक निकुंज सावला याने त्यांच्यासोबत हुज्जत घालुन त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना बघुन घेण्याची धमकी देतानाच त्यांची वरिष्ठ अधिका-यांकडे खोटी तक्रार करण्याची धमकी दिली. त्यामुळे मेखले यांनी निकुंज सावला याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. या कारवाईनंतर देखील सोमवारी भरदुपारी सदरचे हुक्का पार्लर राजरोसपणे सुरु असल्याची माहिती एपीएमसी पोलिसांना मिळाली.  

त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख व त्यांच्या पथकाने हॉटेल पाम अटलांटिकवर पुन्हा छापा मारला. यावेळी सदर हुक्का पार्लरमध्ये 14 व्यक्ती हुक्का ओढत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी सदर हुक्का पार्लर मधील हुक्का ओढण्यासाठी लागणारे हुक्का फ्लेवर तसेच हुक्का ओढण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले. त्यानंतर पोलिसांनी हुक्का ओढण्यासाठी बसलेल्या ग्राहकांवर तसेच हुक्का पार्लर चालक व वेटर अशा एकुण 19 जणांविरोधात कोफ्टा कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

विद्यार्थी व पालकांची फसवणूक करणाऱ्या क्लासेस विरोधात मनविसे आक्रमक