खाजगी हौसिंग सोसायट्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई

वाशी ः एकीकडे नवी मुंबई शहरात धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचे वारे वाहू लागले आहेत तर दुसरीकडे नवी मुंबई महापालिका निवडणूक येऊ घातली आहे. त्यामुळे आता नवी मुंबई शहरातील खाजगी गृह निर्माण सोसायटीवर आपले वर्चस्व राखण्यासाठी राजकीय नेत्यांनी या सोसायटीच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केल्याने राजकीय हस्तक्षेप वाढू लागला आहे. याचे पर्यावसन आता हाणामारीवर पोचले आहे. घणसोली मधील माऊली कृपा सोसायटी मध्ये ४ फेब्रुवारी रोजी दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीमुळे आता खाजगी हौसिंग सोसायट्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई सुरु झाल्याचे स्पष्ट होत आहे.

नवी मुंबई शहरातील धोकादायक इमारतींना पर्याय म्हणून पुनर्विकासाचा पर्याय मोकळा झाला असून, नवी मुंबई शहरात धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचे प्रकल्प सुरु देखील झाले आहेत. मात्र, या पुनर्विकासाच्या प्रकल्पात आता राजकीय हस्तक्षेप वाढू लागला आहे.कारण एकाद्या सोसायटीचा पुनर्विकास प्रकल्प राबवायचा असेल तर त्या हौसिंग सोसायटीतील ५१ टक्के सदस्यांची मंजुरी लागते. त्यामुळे आपला कार्यकर्ता किंवा आपला माणूस त्या सोसायटीच्या अध्यक्ष असावा अशी आशा राजकीय नेत्यांना असते. त्यामुळे आता खाजगी हौसिंग सोसायटीच्या निवडणुकीत राजकीय नेत्यांनी दंड थोपटले आहेत. घणसोली मधील माऊली को. ऑप. हौसिंग सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. त्यामुळे या सोसायटीवर आपले वर्चस्व राहावे म्हणून महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये चढाओढ लागली आहे. मागील पाच दिवसांपुर्वीच माजी नवी मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या सोबत ‘राष्ट्रवादी’चे सौरभ शिंदे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. तर ४ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती निमित्त भाजप पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, या कार्यक्रमाला बाहेरील व्यक्तींना का आमंत्रित केले यावरुन ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे आमदार शशिकांत शिंदे यांचे पुत्र सौरभ शिंदे आणि भाजप गटात बाचाबाची होऊन तुंबळ हाणामारी झाली. त्यामुळे एकीकडे आगामी नवी मुंबई महापालिका निवडणूक तर दुसरीकडे पुनर्विकासाचे प्रकल्प या अनुषंगाने आता खाजगी सोसायट्यांमध्ये राजकीय वर्चस्वाची लढाई सुरु झाली आहे. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

आधी वृक्ष तोड नंतर परवानगी प्रक्रिया ?