सचिन ठाकूर महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2022 ने सन्मानित

उरण : 27 जानेवारी 2022 रोजी पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे डायनामिक युथ स्पोर्ट्स अकॅडमी इंडिया यांच्या वतीने "अभिमान महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2022"  हा पुरस्कार उरण तालुक्यातील जसखार गावचे सुपुत्र तथा श्री रत्नेश्वरी कलामंचचे नृत्य दिग्दर्शक व सर्वेसर्वा सचिन लहू ठाकूर यांना व्यासपीठावरील मान्यवर गोल्डमेडलीस्ट मनिष अडविलकर, सुप्रसिद्ध सिनेकलाकार शशिकांत केळकर, डायनामिक युथ स्पोर्ट्स अकॅडेमीचे अध्यक्ष जयेश चौगुले यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू अर्जुन पुरस्कार व पदमश्री पुरस्कार प्राप्त ऍलिझा नेल्सन, प्रो कबड्डी राष्ट्रीय खेळाडू निलेश साळूंके, कलाकार ऋतुजा बागवेकर, आंतरराष्ट्रीय बॉक्सर सिद्धार्थ वर्मा आदी सिने, नाट्य, कला क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज सिने कलाकार,अभिनेते, खेळाडू,तज्ञ मंडळी उपस्थित होते.

सचिन ठाकूर हे उरण तालुक्यातील जसखार गावचे रहिवाशी असून गेली 22 वर्षे ते नृत्य क्षेत्रात डान्सर व कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत सचिन ठाकूर यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही चॅनेलवर रिऍलिटी शो मध्ये भाग घेऊन आपली कला सादर केली आहे. अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले आहे. सध्या प्रत्येक घरांमध्ये वाजत असलेला 'आई तुझा देऊळ' या गाण्याचे निर्माते कोरिओग्राफर आणि लीड डान्सर म्हणून सचिन ठाकूर प्रसिद्ध आहेत. आजपर्यंत अनेक आगरी, कोळी, मराठी गाण्यांमध्ये त्यांनी काम केले आहे. सचिन ठाकूर यांनी आजपर्यंत 3000 हुन जास्त विद्यार्थ्यांना नृत्याचे मोफत प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेत त्यांना "अभिमान महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार 2022" प्रदान करण्यात आल्याने नृत्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक सामाजिक, राजकीय आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सचिन ठाकूर यांचे कौतुक करत सचिन ठाकूर यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

युवा सेनेच्या दणक्याने हॉस्पिटल नरमले; नवजात बाळ आणि पालकांची केली सुटका