महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
उरण न.पा.च्या बायो मायनिंग प्रकल्पाचे मुख्याधिकाऱ्यांनी केले उद्घाटन
उरण : उरण शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी उरण नगर पालिकेने बायो मायनिंग प्रकल्प सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन तहसिलदार भाऊसाहेब अंधारे आणि पालिकेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांच्या हस्ते करण्यात आले.
बोरी पाखाडी येथिल डम्पिंग ग्राउंडवर सुरू झालेल्या या प्रकल्पात २००७ पासून साठलेल्या कचऱ्याचीही विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे उरण शहरातील कचऱ्याचा प्रश्न सध्यातरी मार्गी लागला आहे. उरण न.पा.ला डम्पिंग ग्राऊंडसाठी रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी २००७ साली बोरी पाखाड़ी येथिल इनामदार नगर हद्दीत समुद्रालगत एक हेक्टर क्षेत्राचा भूखंड दिला होता. त्या जागेत उरण शहरातील कचरा टाकला जात होता. मात्र या भूखंडा लगत असणाऱ्या हनुमान कोळीवाडा या गावाला कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास होऊ लागल्याने व सदर भूखंड या गावाच्या पुनर्वसन येत असल्याने त्या ग्रामस्थांनी सदर डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.
त्यावर निर्णय देताना न्यायालयाने सदर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून हा भूखंड वनखात्याकडे हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत. नगर पालिकेने या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले असून हे काम भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट प्रा लि या कंपनीला दिले आहे. त्यासाठी सुमारे १० लाख ४५ हजारांचा खर्च होणार आहे. सुमारे ३ महिन्यात हे काम संपवून कचऱ्यापासून माती व खत निर्माण होणार आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावून सदर भूखंड वनखात्याकडे वर्ग करण्यात येईल असे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी सांगितले .