वैभव पाटील यांचा शासन स्तरावर सन्मान

नवी मुंबई : महाराष्‍ट्र शासनाच्‍या मराठी भाषा विभागामार्फत दिनांक १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्‍यात येत आहे. त्‍या निमित्‍ताने शासनाच्‍या विविध प्रशासकीय विभागांमध्‍ये काम करत असताना मराठी भाषेच्‍या प्रचार व प्रसारासाठी विशेष योगदान देणा-या अधिकारी व कर्मचा-यांचा सत्‍कार सोहळा गुरुवार दिनांक २० जानेवारी २०२२ रोजी मंत्रालयात आयोजित करण्‍यात आला होता. मंत्रालयाच्‍या त्रिमुर्ती या मुख्‍य प्रांगणामध्‍ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्‍यात आलेल्‍या हया कार्यक्रमामध्‍ये सार्वजनिक आरोग्‍य विभागाच्‍या राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान कार्यालयातील कक्ष अधिकारी वैभव मोहन पाटील (नवी मुंबई) यांचादेखील सत्‍कार मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव डॉ. भूषण गगराणी, सहसचिव श्री मिलिंद गवारे यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आला.

शासनाच्‍या आरोग्‍य विभागाच्‍या विविध योजना व उपक्रम आपल्‍या लेखांच्‍या माध्‍यमातुन जनतेपर्यंत पोहोचवण्‍यामध्‍ये वैभव पाटील यांचे अत्‍यंत मोलाचे योगदान राहीले आहे. आरोग्‍य विभागाचे मुखपत्र असलेल्‍या महाराष्‍ट्र आरोग्‍य पत्रिकेत ते गेल्‍या अनेक वर्षांपासुन नियमित लिखाण करत आहेत. दै नवे शहर मध्‍ये प्रसारीत झालेल्‍या आरोग्‍यविषयक योजनांच्‍या लेखमालिकेचे ‘’आरोग्‍यमंथन’’ हे त्‍यांचे पुस्‍तकदेखील आरोग्‍य विभागाच्‍या आरोग्‍य, माहिती, शिक्षण व संपर्क विभागामार्फत प्रकाशित झाले आहे. महाराष्‍ट्रातील विविध नामांकित मराठी वृत्‍तपत्रांमध्‍ये ते सातत्‍याने विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्‍कृतीक व आरोग्‍याच्‍या विषयावर लिखाण करत असतात. मराठी भाषा संवर्धन दिनाच्‍या पार्श्‍वभुमीवर त्‍यांचा मराठी भाषेच्‍या प्रसारातील योगदानासाठी शासन स्‍तरावर झालेला सन्‍मान कौतुकास्‍पद असुन  विभागातील अधिकारी, कर्मचा-यांनी त्‍याबददल त्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रा. एन. डी. पाटील यांच्या जीवनावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन