मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
प्रा. एन. डी. पाटील यांच्या जीवनावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन
नवी मुंबई : महाराष्ट्र राज्यातील संघर्षशील आणि विवेकी नेतृत्व ठरलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्यकर्तृत्वाचा सर्वसामान्यांना परिचय व्हावा या उद्देशाने लेट्स रीड इंडीया यांच्या वतीने प्रा. एन. डी. पाटील यांच्यावर 'राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा' आयोजित करण्यात आलेली आहे.
या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रु. १० हजार सह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र स्वरूपात प्रथम, रू. ५ हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे व्दितीय आणि रू. ३ हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात येतील. त्याचप्रमाणे काही उत्तेजनार्थ पारितोषिकेही प्रदान करण्यात येणार आहेत.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत, तसेच विविध लोकचळवळ व लढ्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनलेले प्रा. एन. डी. पाटील अखेरपर्यंत राज्यातील सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रा. एन. डी. पाटील यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणूनही उत्तम काम केले होते. नुकताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहताना त्यांचे पुण्यस्मरण व्हावे यासाठी ही निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही निबंध स्पर्धा सर्व वयोगटांसाठी खुली असून कोणत्याही वयाच्या स्पर्धकाला किमान 1000 ते कमाल 2500 शब्द मर्यादेचा निबंध लिहून स्कॅन करून किंवा टाईप करून वर्ड किंवा पीडीएफ फाईल स्वरूपात [email protected] या ई-मेलवर 5 फेब्रुवारी 2022 पर्यंत पाठवून स्पर्धेत सहभागी होता येईल. स्पर्धकाने निबंधासोबत आपली संपूर्ण माहिती पाठवावयाची आहे. स्पर्धक गुगल फॉर्मव्दारे स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. यासाठीची लिंक - निबंध स्पर्धा : विषय : जेष्ठ नेते प्रा. एन डी पाटील आहे. याशिवाय स्पर्धक आपला निबंध लिहून पोस्टाने देखील 311, द ग्रेट ईस्टर्न गॅलरीया, प्लॉट नं. 20, सेक्टर 4 ऑफ पाम बीच रोड, नेरुळ (पश्चिम), नवी मुंबई 400706 ( संपर्कध्वनी क्रमांक - 022 27710642) या पत्त्यावरही पाठवू शकतात.
स्पर्धसाठी पाठविण्यात येणारे निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये असावा व त्यामध्ये शुध्दलेखनाच्या चुका नसाव्यात. निबंधाचे परीक्षण नामवंत अभ्यासक तसेच तज्ज्ञ परीक्षकांमार्फत केले जाणार असून स्पर्धेतील निवडक निबंध पुस्तकरुपात प्रकाशित केले जाणार आहेत. निबंधाचा मजकूर हा स्वरचित असावा. कॉपी केलेला किंवा कोणत्या लेखाचा काही भाग घेतल्याचे लक्षात आल्यास ती प्रवेशिका बाद केली जाईल याची स्पर्धकांनी नोंद घ्यावयाची आहे. या स्पर्धेत परीक्षकांचा व आयोजकांचा निर्णय अंतिम असेल.
तरी पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व असलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांच्यावरील 'राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा' मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व प्रा. एन. डी. पाटील यांच्या उत्तुंग कार्यकर्तृत्वाला वैचारिक आदरांजली अर्पण करावी असे आवाहन लेट्स रीड फाऊंडेशनच्या वतीने करण्यात येत आहे.