तुर्भे रेल्वे स्थानकातील सबवेमध्ये साचणा-या पाण्यामुळे प्रवासी त्रस्त

नवी मुंबई : तुर्भे रेल्वे स्थानकातील सबवेमध्ये मागील महिन्याभरापासून पाणी साचत असल्यामुळे या सबवेमध्ये दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्याचा त्रास या रेल्वे स्थानकातून नियमित प्रवास करणा-या प्रवाशांना होत असल्याने सबवेत साचत असलेल्या पाण्याचा निचरा करुन प्रवाशांना दिलासा देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.  

तुर्भे रेल्वे स्थानकाखाली असलेल्या चेंबरमधून पाणी जात नसल्यामुळे रेल्वे स्थानकावरील पाण्याचा निचरा न होता, सदरचे पाणी तुर्भे रेल्वे स्थानकातील ठाणे बाजुकडील सबवेमध्ये साचत आहे. त्यामुळे तुर्भे रेल्वे स्थानकातून सबवेमध्ये उतरून जवणाऱ्या एका जिन्याला चक्क रश्शी बांधून सदरचा जिना बंद ठेवण्याची वेळ रेल्वेवर आली आहे. तुर्भे रेल्वे स्थानकात उतरणारे बहुतेक प्रवाशी हे पश्चिमेकडे असलेल्या एपीएमसी मार्केटमध्ये जाणारे असून हे प्रवासी ठाणे बाजुकडील सबवेमध्ये खाली उतरून मार्केटच्या दिशेने जात असतात. त्यामुळे या सबवेमधील प्रवाशांची वर्दळ जास्त आहे.  

मात्र सबवेमध्ये साचलेल्या पाण्यामुळे मोठ्या  प्रमाणात दुर्गंधी व घाण पसरत असल्याने या सबवेतून नियमित येजा करणाऱया प्रवाशांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांनी याबाबतच्या पार रेल्वे स्थानक व्यवस्थापकांकडे केल्या आहेत. रेल्वे स्थानकाची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांनी सबवेतील साचलेले पाणी काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा निचराच होत नसल्याचे व अंडरग्राऊंड असलेल्या चेंबरची सफाई झाल्याशिवाय येथील पाण्याचा निचरा होणे शक्य नसल्याचे येथील सफाई कर्मचाऱयांचे म्हणणे आहे.  

याबाबत तुर्भे रेल्वे स्थानकातील स्टेशन मॅनेजर लक्ष्मण दास यांच्याशी संपर्क साधला असता तुर्भे रेल्वे स्थानकातील सबवेमध्ये साचत असलेल्या पाण्याचा बंदोबस्त करण्यासाठी सिडकोकडे पत्रव्यवहार करुन त्याबाबत पाठपुरावा देखील करण्यात आला आहे, मात्र सिडकोकडुन याबाबत प्रतिसाद मिळत नसल्याचे दास यांनी सांगितले. याबाबत सिडकोचे कार्यकारी अभियंता कल्याण पाटील यांना संपर्क साधला असता, त्यांनी तुर्भे रेल्वे स्थानकातील सबवे बाबतच्या तक्रारी आल्या असून त्याबाबत तत्काळ कार्यवाही सुरु करण्यात येणार असल्याचे सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईतील क्रीडांगणे खुली करण्याची पर्यावरण सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांची मागणी