महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
गुटख्याचा साठा करुन त्याची विक्री करणारी टोळी जेरबंद
नवी मुंबई : महापे एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये साठा करुन ठेवलेला सुगंधीत तंबाखू व पान मसाला टेम्पोमधून छुप्या पद्धतीने विक्री करण्यासाठी नेणाऱ्या ७ जणांच्या टोळीला नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारावाईत गुन्हे शाखेने तब्बल ४२ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु व पान मसाल्याचा साठा तसेच १८ लाख रुपये किंमतीचे ४ टेम्पो असा तब्बल ६० लाख ७२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली.
महापे एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात गुटखा विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-३ ला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये व पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी व त्यांच्या पथकाने गत शनिवारी रात्री महापे एमआयडीसीमध्ये सापळा लावला होता. पहाटेच्या सुमारास टाटा मोटर्स सर्व्हीस शोरुम मधून चार छोटा हत्ती टेम्पो संशयास्पदरित्या बाहेर पडताना निदर्शनास आल्याने गुन्हे शाखेच्या पथकाने चारही टेम्पोची तपासणी केली. या तपासणीत चारही टेम्पोमध्ये गुटखा आढळुन आला. त्यामुळे पोलिसांनी टेम्पो चालकांची अधिक चौकशी केली असता, त्यांनी गोडाऊनची माहिती दिली.
त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने गोडाऊनची तपासणी केली असता त्याठिकाणी गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळुन आला. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने गुटखा आणणारा इसरार अहमद नियाज अहमद शेख (४५), गुटख्याची वाहतुक करणारा सुरज हरिष ठक्कर (४१) तसेच गोडाऊन संभाळणारा सस्तु रामेत यादव (३४) त्याचप्रमाणे टेम्पो चालक नितीन बाबूराव कसबे (४१), नौरुद्दीन अलिशौकत सय्यद (२६), मोहम्मद नफिस रफिक शेख (३४), आणि पवनकुमार पन्नालाल श्रीवास्तव (२७) या सात जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर या सर्वांविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चार टेम्पोत व गोडाऊनमध्ये आढळून आलेला ४२ लाख ७२ हजार रुपये किंमतीचा सुगंधीत तंबाखु व पानमसाला तसेच सदरचा गुटखा वाहुन नेण्यासाठी वापरण्यात आलेले चार टेम्पो असा एकुण ६० लाख ७२ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
या कारवाईत अटक करण्यात आलेली टोळी महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला सुगंधीत तंबाखु व पानमसाला (विमल गुटखा) परराज्यातून छुफ्या पद्धतीने कमी दरात खरेदी करुन ते भाड्याने घेतलेल्या एमआयडीसीतील गोडाऊनमध्ये त्याचा साठा करुन ठेवत असल्याचे आढळून आले आहे. तसेच मध्यरात्री अथवा पहाटेच्या सुमारास छोट्या टेम्पोतून हा गुटखा नवी मुंबई, मुंबई व ठाणे परिसतातील व्यावसायीकांना जादा दराने विकण्यासाठी नेला जात असल्याचे तपासात आढळुन आले आहे.