महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
जीवनाची वाताहात करणाऱ्या व्यसनापासून तरुण पिढीने दूर रहावे - किर्तनकार सत्यपाल महाराज
नवी मुंबई : भारत सुजलाम, सुफलाम व्हावा यासाठी गांधी, तुकडोजी महाराज, गाडगे महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या सारख्यांनी संत सुधारकांनी अथक प्रयत्न केले. पण, आजचा तरुण दारु, गुटखा, तंबाखू, सिगरेट यासारख्या व्यसनांच्या विळख्यात सापडत बरबाद होताना दिसत आहे. मी जेव्हा खेड्यापाड्यातून फिरतो तेव्हा व्यसनापायी कुटुंबातील कर्ता पुरुष मेल्यामुळे बरबाद झालेल्या कुटुंबातील लेकरवाळ्या बाईची स्थिती पाहावत नाही आणि तरीही सरकार दारुपासून उत्पन्न वाढते म्हणून दारुची विक्री किराणा दुकानातूनही करण्याच्या घोषणा करते. तेव्हा म्हणावेसे वाटते, चो-या, दरोड्यापासूनही उत्पन्न आहे, मग ते करायलाही परवानगी द्या, असे जळजळीत उद्गार तुकडोजी महाराज, गाडगे महाराजांचा समाज प्रबोधनाचा वारसा जपणारे विदर्भातील सप्त खंजिरी वादक कीर्तनकार सत्यपाल महाराज यांनी काढले.
अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या चला व्यसनाला बदनाम करुया, या जानेवारी महिन्यातील विशेषांकाच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रकाशनानंतर अतिशय प्रभावीपणे केलेल्या कीर्तनात त्यांनी व्यसनामुळे होणाऱ्या वाताहतीचे वर्णन करत गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांच्या अभंगांचे निरुपण करीत आजच्या तरुणांना व्यसनमुक्त जीवन जगण्याचे आवाहन केले.
या प्रकाशन समारंभाचे प्रास्ताविक करताना प्रसिद्ध मनोविकारतज्ञ आणि व्यसनविरोधी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी अंधश्रद्धा या ज्याप्रमाणे माणसाच्या विवेकी विचारातील अडथळा आहेत, त्याचप्रमाणे व्यसनही माणसाला विवेकी विचार करण्यापासून थांबविण्याचे साधन आहे. म्हणूनच बुवाबाजी आणि व्यसन एकमेकांच्या हातात हात घालून काम करताना दिसतात. त्यामुळेच अंधश्रद्धा निर्मूलन समिती व्यसनविरोधी लढा हा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीचा महत्वाचा भाग असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, करोनासारख्या संसर्गजन्य आजारामुळे पाच लाख नागरिकांचा मृत्यू झाला. त्याअनुषंगाने करोना संसर्गाचे गांभीर्य ओळखून शासनाने निर्बंध लावून लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या, ते योग्यही आहे. पण दरवर्षी १५ लाख बळी घेणाऱया व्यसनांच्या विरोधात कडक उपाय योजण्याच्याबाबतीत मात्र सरकार आणि समाज दोघेही गंभीर नाही. मॉलमध्ये वाईन विकायला शासन परवानगी देत आहे. म्हणूनच या वर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ३१ डिसेंबरला नो वाईन, रहा फाईन ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर चालविली व त्या मोहिमेला महाराष्ट्रातील प्रत्येक जिह्यातून प्रचंड पाठिंबा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे समुपदेशक उदय चव्हाण यांनी व्यसनविरोधी गीत गायनाने झाली. पाहुण्यांचे स्वागत व परिचय अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक राजीव देशपांडे यांनी केले, तर आभार अंनिवाचे सहसंपादक अनिल चव्हाण यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंनिवाचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी केले. या ऑनलाईन कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून अंनिसचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.