महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
महापालिका मालमत्ता विभागाला उपायुक्त मिळेना
नवी मुंबई :- नवी मुंबई महानगर पालिकेच्या मालमत्ता या अत्यंत महत्वाच्या विभागात १७ दिवस उलटून देखील या विभागाला उपायुक्त मिळत नसल्याने मनपाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. मालमत्ता उपायुक्त अशोक मढवी डिसेंबर अखेरीस निवृत्त झाल्यावर यारिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार या प्रतीक्षेत प्रभारी आणि प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र प्रशासकीय राजवट असल्याने सर्वच कारभार गोंधळी सुरू आहे.
मनपाच्या आकृतीबंध मंजुरीनंतर देखील अधिकाऱ्यांची नेमणूक व पदोन्नती रखडली असताना रिक्त पदांवर अजुन काही अधिकारी नेमणुकीच्या प्रतीक्षेत आहेत.मात्र राजकीय नेत्यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांनी मलईदार पदांवर जाण्यासाठी सगळा जोर लावला आहे. मालमत्ता विभागाकडून संपूर्ण शहरातील मालमत्ता आणि तत्सम बाबींचा अभिलेख आणि सिडकोशी कागदोपत्री व्यवहार आदी नोंदी ठेवण्याचे सर्वात महत्वाचे काम केले जाते.विकास आराखडा आणि मालमत्ता निश्चित करून त्याची नोंद ठेवण्याचे महत्वाचे काम करणाऱ्या या विभागाला अजून उपायुक्त नेमला जात नसल्याने प्रशासकीय वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.सध्या मनपाच्या आस्थापानेतील मंजूर पदांपेक्षा सध्या फक्त तीन उपायुक्त असून तर प्रभारी सहा उपायुक्त आहेत.प्रभारी उपायुक्तांनी पालिकेचा ताबा घेतला आहे.अतिरिक्त आयुक्त देखील दोन्ही प्रभारी असून एक मनपाच्या आस्थापना सबंधित असण्याचा नियम आहे.मात्र या सर्व नियमांना बगल देवून मनपाच्या चाव्या प्रतिनियुक्तीवर आलेल्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या हातात असल्याने मालमत्ता विभागावर अजूनही उपायुक्त नेमणूक झालेली नाही. निवृत्तीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या अधिकाऱ्यांची पदोन्नती रखडल्याने अधिकाऱ्यांची कृत्रिम टंचाई भासत आहे. तर आयुक्तांच्या समोर जी हुजुर करणाऱ्या मनपा आस्थापनेवरील उपायुक्तांना अतिरिक्त कारभाराची बिदागी देण्यात आली आहे.यामध्ये परिमंडळ याच बरोबर महत्वाची खाती जसे अतिक्रमण,प्रशासन समाज विकास अशी काही महत्वाची खाती या उपायुक्तांनी आधीच सांभाळून ठेवली असल्याने आता मालमत्ता विभागात कोणाची वर्णी लागते याकडे लक्ष लागले आहे