वाशी पादचारी पूल वादाच्या भोवऱ्यात ?

नवी मुंबई-:वाशी सेक्टर ९ आणि सेक्टर १५/१६ येथे रस्ता ओलांडताना होणाऱ्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी याठिकाणी पादचारी पुलाचे काम हाथी घेण्यात आले आहे. मात्र सदर पादचारी पुलाऐवजी या ठिकाणी उड्डाणपूलाची निर्मिती करून  कायम स्वरूपी तोडगा काढावा व भविष्यात या रस्त्यावर होणारा मनपाचा खर्च वाचवावा अशी मागणी भाजप अ.जा.मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विकास  सोरटे  यांनी केली आहे.त्यामुळे वाशीतील पादचारी पूल बांधण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

वाशी -कोपरखैरणे हा मुख्य रस्ता वर्दळीचा असून या भागात वारंवार वाहतूक कोंडी होत असते तसेच नागरिकांना रस्ता ओलांडणे मुश्किल होत असते.त्यावर पर्याय म्हणून वाशी हायवे ते वाशी सेक्टर २८ जुने ब्ल्यू डायमंड हॉटेलपर्यंत उड्डाणपूल उभारणे हा कायमस्वरूपी योग्य पर्याय राहील.मात्र त्याऐवजी  सेक्टर ९ आणि सेक्टर १५/१६ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाची निर्मिती मनपाकडून करण्यात येत आहे.मात्र ते एकच असे ठिकाण नाही जिथून नागरिक रस्ता ओलांडत असतात.वाशी हायवेपासून ब्ल्यू डायमंड नाला पर्यंत क्रमाने गेल्यास वाशी सेक्टर १७ अभ्युदय बँक चौक, वाशी छ शिवाजी महाराज चौक, वाशी फायरब्रिगेड सिग्नल, वाशी सेक्टर ९ वारणा डेअरी व शिवसेना मध्यवर्ती कार्यालय समोरील क्रॉसिंग , शबरी हॉटेल समोरीलक्रॉसिंग, वाशी विभाग कार्यालय समोरील क्रॉसिंग, एम जी कॉम्प्लेक्स समोरील क्रॉसिंग, जुहूगाव शिवसेना शाखा कार्यालय समोरील क्रॉसिंग अशी बरीच ठिकाणे आहेत.त्यामुळे अशा सर्वच ठिकाणी  पादचारी पुलाची गरज आहे मग अश्या प्रत्येक ठिकाणी आपण फूट ओव्हर ब्रिज उभारणार का?असा सवाल सोरटे  यांनी केला आहे.तर या पादचारी  पुलाचा जेष्ठ नागरीकांना वापर करतात मोठी कसरत करावी लागणार  असून भविष्यात यापुलाववर फेरिवाले देखिल बसण्याची शक्यता आहे.मुळातच या मार्गावरील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी आणि नागरिकांची रस्ता ओलांडण्याची कसरत दूर करण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची दूरदृष्टी हवी मात्र तसे न करता लोक प्रतिनिधी व मनपा अधिकाऱ्यांच्या मिलीभगत असल्याने पादचारी पुलाची निर्मिती करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.मनपाने एकाच समस्येसाठी वारंवार खर्च करण्याऐवजी एकदाच खर्च करत या मार्गावर उड्डाणपूल बांधावे अशी मागणीभाजप अ.जा.मोर्चा चे  नवी मुंबई जिल्हाध्यक्ष विकास  सोरटे  यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या कडे केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर येथे मोठ्या प्रमाणावर कांदळवनांची कत्तल