सीसीटीव्हिमुळे लोकल मधील प्रवाशाचा मोबाईल खेचणारा लुटारु जेरबंद

 नवी मुंबई : लोकल मधील प्रवाशाचा मोबाईल फोन खेचुन पळून गेलेल्या लुटारुला वाशी रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन शोध घेऊन त्याला अटक केली आहे. अक्षय रमेश मणवर (२१) असे या लुटारुचे नाव असून गत ७ जानेवारी रोजी रात्री या लुटारुने सीवूड्स रेल्वे स्थानकात एका प्रवाशाचा मोबाईल खेचुन धावत्या लोकलमधून उडी टाकून पलायन केले होते. विशेष म्हणजे हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून १५ दिवसापुर्वीच तो जेलमधुन सुटून आल्याचे तपासात आढळून आले आहे.  

कामोठे येथे राहणारा राहुल आत्माराम जाधव (३१) हा गत ७ जानेवारी रोजी रात्री हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसएमटी पनवेल लोकलने शिवडी ते मानसरोवर असा लगेज डब्यातून प्रवास करत होता. सदरची लोकल रात्री १०. ३० वाजण्याच्या सुमारास सीवूड्स रेल्वे स्थानकात थांबून सुरु होताच आरोपी अक्षय मणवर याने राहुल जाधव याच्या खिशातील  मोबाईल फोन खेचुन धावत्या लोकलमधुन सीवूड्स रेल्वे स्थानकात उडी टाकून पलायन केले होते. या घटनेनंतर राहुल जाधव याने वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी अज्ञात लुटारु विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. त्यासाठी रेल्वे पोलिसांनी सीवूड्स रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन आरोपीचे वर्णन व गुफ्त बातमीदारांकडून त्याची माहिती काढली असता तो उलवे भागात रहाण्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.  

त्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपी अक्षय मणवर याला उलवे सेक्टर-१५ मधील हरीओम सोसायटीतून अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केली असता, त्याने सीवूड्स रेल्वे स्थानकात प्रवाशाचा मोबाईल फोन लुटल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील मोबाईल फोन हस्तगत करुन त्याला जबरी चोरीच्या गुन्ह्याखाली अटक केली. सदरचा आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे तसेच तो पंधरा दिवसांपूर्वीच तो जेलमधून सुटून आल्याची माहिती वाशी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू केसरकर यांनी दिली. या आरोपीने रेल्वेच्या हद्दीत अशाच प्रकारचे आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता असल्याने पोलिसांकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 एपीएमसी कोरोना प्रसाराचा हॉटस्पॉट होण्याची भिती