सफाई कामगारांसाठी सुविधायुक्त हजेरी शेडचा प्रश्न ऐरणीवर

नवी मुंबई ः नवी मुंबई सिडको निर्मित २१ व्या शतकातील सुनियोजित शहर असून या शहराने स्वच्छ भारत अभियानात देशपातळीवर सतत अव्वल स्थान पटकावत आहे.या शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी अगदी वैश्विक महामारी कोरोना कालावधीतहीघनकचरा व्यवस्थापन खात्यात अविरतपणे काम करणाऱ्या सफाई कामगारांची आहे.तरीही येथील सफाई कामगारांसाठी सुविधायुक्त हजेरी शेडचा प्रश्न ऐरणीवर असल्याचा मुद्दा वाशी मधील सामाजिक कार्यकते मल्हारी घाडगे यांनी उपस्थित केला आहे.

वाशी, सेक्टर-२९ मध्ये राजीव गांधी उद्यान जेष्ठ नागरिक विरंगुळाकेंद्रामागे प्रेम सागर सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोरील ‘महावितरण’च्या वीज ट्रान्सफॉर्मर रुम शेजारी महापालिका सफाई कामगारांसाठी असलेले हजेरी शेड म्हटले तर उघड्यावर वर्षानुवर्षे कार्यरत आहे. विशेष म्हणजे सफाई कामगारांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिक पटीने आहे. त्यांचे वैयक्तिक सामान, कपडे, जेवणाचे डबे आणि स्वच्छतेसाठी बंदिस्त कार्यालयासारखी त्यांना हक्काची जागा नाही.

साफसफाई कामगार सफाईचे काम करीत असताना भटक्या व्यक्ती, भिकारी त्यांचे कपडे चोरतात, डबे खातात. परिणामी, त्यांना उपाशीपोटी देखील दिवसभर काम करावे लागते. कधी दिवसा तर नेहमी रात्री या जागेवर वाटसरु भिकारी लघवी आणि संडास करुन घाण करतात. ज्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी सफाईचे काम करणाऱ्या कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा अतिशय घाणेरड्या जागेत या शहराला स्वच्छ भारत अभियानात बहूमान पटकावून देणाऱ्या सफाई कामगारांना हजेरी लावून वावरावे लागते. सदरची बाब नवी मुंबई महापालिकेच्या दृष्टीने अतिशय लाजीरवाणी आहे. त्यामुळे सदर साफसफाई कामगारांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीकोनातून महापालिकेच्या घनकचरा विभागातील तसेच वाशी-सी विभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी सदर समस्येकडे गांभिर्याने लक्ष देऊन ती तातडीने दूर करण्याची मागणी मल्हारी घाडगे यांनी केली आहे.


 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीसीटीव्हिमुळे लोकल मधील प्रवाशाचा मोबाईल खेचणारा लुटारु जेरबंद