नवी मुंबईत पुनर्विकासाचा पहिला नारळ फुटला

नवी मुंबई-: अडथळ्यांचे मोठी शर्यत पार करून नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पहिल्या पुनर्विकासाचा नारळ आज अखेर फुटला. वाशी येथील सेक्टर ९ मध्ये असलेल्या श्रद्धा सोसायटीच्या बांधकाम प्रकल्पाचे भूमिपूजन झाल्याने गेल्या २० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाला यश आले आहे. धोकादायक म्हणून घोषित केलेल्या श्रद्धा सोसायटीला गेल्या वर्षी महापालिकेने बांधकाम परवानगी दिली होती. पाडकामानंतर आता बांधकाम सुरू झाल्याने नवी मुंबईतील धोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या ५५ हजार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबई शहरातील सिडको वसाहतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सुमारे ७०० इमारती धोकादायक बनल्या आहेत. शहरातील तत्कालीन सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती नसल्याने हा पुनर्विकास मार्गी लागला नाही. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास व्हावा यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर पाटकर यांनी शासकीय आणि न्यायालयीन पातळीवर मोठा लढा दिला. अडथळ्यांचे मोठमोठे डोंगर पार करून धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी संघर्ष सुरू ठेवला. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. वाशी येथील श्रद्धा सोसायटीच्या बांधकाम प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. याप्रसंगी ईव्ही होम्सचे व्यवस्थापकीय संचालक ई.व्ही. थॉमस उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

खारघर शहर हॉटस्पॉट ठरण्याची शक्यता