महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
नवी मुंबई:- बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतील तरतूद केलेले रु.1 कोटी व नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारलेल्या ऑक्सिजन प्लांटचा लोकार्पण सोहळा नुकताच वाशी येथील सिडको एक्झिबिशन कोविड केयर सेंटर येथे नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष श्री.रामचंद्र घरत यांच्या शुभहस्ते उत्साहात पार पडला. यावेळी माजी सभापती डॉ.जयाजी नाथ, सभागृह नेते रवींद्र इथापे, नगरसेवक गिरीश म्हात्रे, निशांत भगत, महामंत्री निलेश म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, महिला अध्यक्ष दुर्गा ढोक, विकास सोरटे, सुहासिनी नायडू, राजेश राय, कल्पना छत्रे, जगन्नाथ जगताप, पांडुरंग आमले, जयवंत तांडेल, राजू तिकोने, जनार्दन सुतार, न.मुं.म.पा. शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त बाबासाहेब राजळे, अधिकारी अरविंद शिंदे तसेच असंख्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. सदर ऑक्सिजन प्लांटची क्षमता 1200 एलपीएम असून दिवसाला 225 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर म्हणजेच दिवसाला 2.24 मॅट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याचे तसेच दिवसाला 150 ते 170 नागरिकांना लाभ होणार असल्याची माहिती शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली.
यावेळी आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना काळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला होता. संपूर्ण जगावर आलेल्या या संकटाचा सामना करण्याच्या अनुषंगाने नवी मुंबईतील नागरिकांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये याकरिता ऑक्सिजन प्लांट उभारण्याकरिता मी माझ्या आमदार निधीतून रु. 1 कोटींची तरतूद केली होती. नवी मुंबई महानगरपालिकेनेही त्वरित कार्यवाही करून ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली याबद्दल मी आयुक्त अभिजित बांगर व शहर अभियंता संजय देसाई यांचे मनापासून आभार मानते. सध्याची कोरोना व ओमीक्रोनची गंभीर परिस्थिती पाहता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. परंतु ऑक्सिजन प्लांट उभारल्यामूळे नवी मुंबईकरांना दिलासाही मिळाला आहे. माझ्या मतदारसंघातील एकही नागरिक आरोग्य सुविधेशिवाय वंचित राहणार नाही, हे एक आमदार म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. नेरुळ येथील मीनाताई ठाकरे हॉस्पिटल येथे ही व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अजूनही आरोग्य सुविधा पुरविण्याकरिता कोणतीही आवश्यकता असल्यास त्याकरिताही आमदार निधीची तरतूद करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच संपूर्ण नवी मुंबई कोरोनामुक्त व ओमीक्रोनमुक्त होईल यात शंका नाही तरीही सर्व नागरिकांनी शासनाने दिलेल्या निर्बंधांचे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी केले.