महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नवी मुंबईतील ५०० चौरस फुट घरांचा मालमत्ता कर माफ -ना.एकनाथ शिंदे
नवी मुंबई ः नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ डिसेंबर रोजी ‘सिडको’च्या विविध प्रकल्पांचा आढावा घऊन नवी मुंबई मेट्रो, नेरुळ आणि बेलापूर जेट्टीसह इतर प्रकल्पांना भेटी दिल्या. दरम्यान, ‘सिडको’च्या वतीने सुरु असलेले प्रकल्पांचा दर्जा राखून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
दरम्यान, मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घतला आहे. त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेनेही नगरविकास ख्यात्याकडे प्रस्ताव पाठविला असून सदर प्रस्तावावरही सकारात्मक निर्णय घण्यात येणार आहे. नवी मुंबई महापालिकाही असाच प्रस्ताव शासनाला सादर करणार असून तो आल्याबरोबर नवी मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घण्यात येणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबईकरांना दिलासा देणारे आणखी काही निर्णयही तातडीने घण्यात येणार आहेत, असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाऊचा धक्का ते नेरुळ जेट्टी दरम्यान बोटीने प्रवास करुन शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू प्रकल्पाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी नेरुळ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या जेट्टीची पाहणी केली. त्याचठिकाणी त्यांनी ‘सिडको’च्या विविध प्रकल्पांचा आढावा घतला. याप्रसंगी ‘ठाणे’चे खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते तथा ‘मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळ’चे सभापती विजय नाहटा, आमदार महेंद्र थोरवे, महाराष्ट्र राज्य वडार समाज समन्वय समितीचे सभापती विजय चौगुले, माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हा सल्लागार बबन पाटील,नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिनकुमार सिंह, ‘सिडको’चे सह-व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, एस.एस.पाटील, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, पोलीस उपआयुक्त सुरेश मेंगडे, पुरुषोत्तम कराड, विवेक पानसरे, शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, ‘काँग्रेस’चे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, ‘राष्ट्रवादी’चे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे यांच्यासह इतर पदाधिकारी तसेच ‘सिडको’चे अधिकारी उपस्थित होते.
‘सिडको’चे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी ‘सिडको’च्या वतीने सुरु असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण केले. प्रधानमंत्री आवास योजना तसेच ‘सिडको’च्या आवास योजनेतील घरांचे बांधकाम, प्रस्तावित नावडे येथील टाऊनशिप, नवी मुंबई विमानतळ, नैना विकास आराखडा, नेरुळ जलवाहतूक टर्मिनल, नेरुळ-बेलापूर-खारघर सागरी मार्ग, पाणी पुरवठा योजना, सांडपाणी पुर्नप्रक्रिया, खारघर येथील सेंटर ऑफ एक्सलन्स, वाशी येथील ठाणे खाडीपुल, पालघर मधील प्रशासकीय इमारती आदिंचा यावेळी आढावा घण्यात आला.
देशातील सर्वात उत्कृष्ट अशा इमारती ‘सिडको’ने पालघर मुख्यालयाच्या रुपाने उभारल्या आहेत. पालघर प्रमाणेच नवी मुंबईतील प्रकल्पांची कामे दर्जेदार तसेच वेळेत पूर्ण करण्यावर भर द्यावा. ‘सिडको’च्या वतीने उभारण्यात आलेल्या आणि पुढील काळात उभारण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर सरकत्या जिन्याची सोय करण्यात यावी. ‘सिडको’च्या विविध प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात नवी मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे. या प्रकल्पांमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे, असे गौरवोद्गार ना. एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.