महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
धम्मचक्र प्रवर्तन दिन : १४ ऑक्टोबरलाच का साजरा करावा?
शतकानुशतकांची गुलामगिरी, शोषण, जातिभेद यांना छेद देत नवा युगारंभ केला. हाच तो क्षण होता ज्याने दलित, शोषित, वंचित समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. त्यामुळे १४ ऑक्टोबर हा केवळ दिनदर्शिकेतील एक दिवस नसून, तो आशेचा, स्वाभिमानाचा आणि क्रांतीचा दिवस आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन लाखो जनतेला नवजीवन दिले. त्यामुळे या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे.
धम्मचक्र प्रवर्तनाचा सामाजिक संदेश, धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड, पण हिंसेशिवाय. ते माणसाला माणसासमान जगण्याची शिकवण देते. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचा अधिष्ठान आहे, ज्यात कोणतीही जात नाही, उच्च-नीचपणाचा भेद नाही. त्यामुळे धम्म स्वीकारणे म्हणजे आत्मसन्मान स्वीकारणे. १४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस भारतीय इतिहासातील एक क्रांतिकारी वळण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह नागपूरच्या दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
बाबासाहेबांनी सारनाथच्या धम्मचक्र फिरवणाऱ्या बुद्धांच्या परंपरेशी संगती साधत, आश्विन पौर्णिमेला दीक्षाभूमीवर धर्मचक्र फिरवले. त्या एका कृतीने त्यांनी पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या दास्याच्या साखळ्या तुटल्या आणि समतेच्या धर्माचा नवा प्रवास सुरू झाला. भारताच्या दीर्घ सामाजिक इतिहासात जातिव्यवस्था ही जखम होती. शेकडो वर्षे दलित समाजाला अपमान, अन्याय, अस्पृश्यतेच्या यातना सोसाव्या लागल्या. डॉ. आंबेडकरांनी आपल्या अभ्यास, संघर्ष आणि त्यागातून या व्यवस्थेविरुद्ध आवाज उचलला. अखेर त्यांनी ठामपणे जाहीर केले की, "मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही” आणि आपल्या शब्दाला जागत १४ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन लाखो जनतेला नवजीवन दिले. त्यामुळे या दिवसाला ऐतिहासिक महत्त्व आहे. या दिवशी बाबासाहेबांनी जे धाडस केले, त्यातून दलित समाजाने आपली गुलाम मानसिकता झटकून टाकली. हा दिवस म्हणजे "स्वाभिमान दिन” आहे.
काहींना प्रश्न पडतो की, हा दिवस १४ऑक्टोबरलाच कां साजरा करावा? कारण तो फक्त बाबासाहेबांचा व्यक्तिगत निर्णय नव्हता; तो संपूर्ण समाजाचा नवजीवनाचा क्षण होता. लाखो लोकांनी त्यादिवशीच आपले भविष्य बदलले. एकंदरीत हा दिवस म्हणजे "धम्मक्रांतीचा जन्मदिन” आहे. हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या दाहात जळणाऱ्या समाजाने पहिल्यांदा मीही माणूस आहे असे ठामपणे जाणले, तो दिवस म्हणजे म्हणूनच १४ ऑक्टोबरला विसरून चालणार नाही. नागपूरची भूमी, लाखोंचा सागर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा तेजोमय संकल्प! तो फक्त एक दिवस नव्हता; तो पिढ्यान्पिढ्यांच्या अश्रूंचा शेवट आणि मानवतेच्या नव्या पहाटेचा उदय होता. या दिवशी दीक्षाभूमीवर एकत्र आलेल्या जनसमुदायाची अवस्था डोळ्यांसमोर आणली, तर अंगावर शहारे येतात. शतकानुशतकांच्या अन्यायाचे ओझे त्या दिवशी हलके झाले. "आता आपणही माणूस आहोत, समान हक्काचे आहोत” ही भावना आणि भावनिक दृष्टीकोन त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होती. तो केवळ धर्मांतर नव्हता; ती मानवी स्वातंत्र्याची घोषणा होती. आज आपल्याला १४ ऑक्टोबरचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. कारण जातिव्यवस्था आजही वेगवेगळ्या स्वरूपात दिसते. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या शिवाय मानवतेला अर्थ नाही. तसेच, हा दिवस आपल्याला शिकवतो की खरी ताकद ही संघटनेत, शिक्षणात आणि विचारांत आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिन केवळ स्मरणोत्सव नसून तो आहे सतत जागवणारा चेतावणीचा नगारा. विषमता, दारिद्रय, अन्याय अजूनही समाजात आहे, अशा परिस्थितीत आजच्या पिढीसाठा १४ ऑक्टोबरचा संदेश असा आहे की, समता, न्याय आणि करुणा अधिक सामर्थ्याने पसरवण्याची गरज आहे.
हा फक्त एका धर्मांतराचा दिवस नाही. तो भारतीय समाजाच्या पुनर्जन्माचा दिवस आहे. ज्यांनी अस्पृश्यतेच्या अंधःकारातून प्रकाशाकडे वाटचाल केली, त्यांचा हा उत्सव आहे. म्हणूनच आपण हा दिवस केवळ साजरा करावा असे नाही, तर जीवनपद्धतीत उतरवावा. तो होता मनुष्यत्वाचा उत्सव, तो होता अस्मितेचा पुनर्जन्म, तो होता न्याय, समता आणि बंधुत्वाच्या नव्या वाटचालीचा आरंभ. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हते, तर मानसिक गुलामीतून मुक्त होण्याचा शपथविधी होता. त्या दिवशी दीक्षाभूमीवर एकत्र जमलेला जनसागर पाहताना असे वाटले. जणू अंधाराने त्रस्त झालेले लाखो तारे एका सूर्याच्या प्रकाशाने उजळून निघाले. लोकांच्या डोळ्यांत अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते; ते होते आनंदमुक्तीचे अश्रू. शतकानुशतके अपमान सहन केलेल्या समाजाने पहिल्यांदाच उंच मान करून मोकळा श्वास घेतला.
बुध्दधर्मात जनतेला हवा असणारा ईश्वर नाही, आत्मा नाही, चमत्कार नाहीत, त्यात दुःखावर भर आहे, ऐहिकांविषयी अनास्था आहे, ब्राम्हणी धर्मातील विषमतेची आणि अनाचारांची बाधाही त्याला झालेली आहे, शिवाय भारताबाहेर त्याचा बेसुमार जलद गतीने प्रसार झाल्यामुळे भारताबाहेरील अनेक गोष्टी बौध्दधर्म संघटनेत प्रभावी ठरल्या आहेत, इत्यादी अनेक गोष्टींचा फायदा ब्राम्हणीधर्माने पध्दतशीरपणे घेतला. अशा रीतीने एका बाजूने बौध्दाला आत्मसात करणे आणि दुसऱ्या बाजूने त्याचे उच्चाटन करणे, अशा दुहेरी-दुधारी शास्त्रानिशी बौध्दधर्माशी ब्राम्हणी नेत्यांनी सामना केला. ही खरी शोकांतीका म्हणावी लागेल. डॉ. आंबेडकरांनी बौध्द धर्म स्वीकारला, धर्मचक्र प्रवर्तन केले पण त्यातून आजच्या संदर्भात निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांचा सांगोपांग विचार पुन्हा-पुन्हा केला. तो विचार चालू ठेवायला, त्यातून आजच्या प्रश्नांची उत्तरे शोधायला ते स्वतः राहिले नाहीत, ही एक खरोखरच अत्यंत दुर्दैवी घटना समजली पाहिजे.
१४ ऑक्टोबर हा दिवस निव्वळ तारखेतला आकडा नाही. तो आहे, गुलामीतून मुक्तीचा विजयदिवस, मानवतेच्या धर्माचा पहिला जयघोष आणि आगामी पिढ्यांना दिशा देणारा दीपस्तंभ. म्हणूनच धम्मचक्र प्रवर्तन दिन आपण १४ ऑक्टोबरलाच साजरा करतो. कारण तो दिवस म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला समतेचा अमर दीप, जो कधीही विझणार नाही. या दिवशी दीक्षाभूमीवर एकत्र येणारे लाखो अनुयायी हा केवळ उत्सव साजरा करत नाहीत; तर ते आपली माती, आपला अभिमान, आपली क्रांती पुन्हा अनुभवतात. म्हणूनच १४ ऑक्टोबरला ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करणे म्हणजे बाबासाहेबांच्या क्रांतीला अभिवादन करणे आणि आपल्या भविष्याचा मार्ग ठरवणे होय. सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा! - प्रविण बागडे