‘खारेपाटातला ईल'

"ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ
ज़रा हट के, ज़रा बच के
ये है बॉम्बे मेरी जान!”

 ओ.पी. नय्यरजींच्या जादुई संगीताने सजलेले हे गीत. सहा दशकांहूनही अधिक काळ उलटून देखील या गीताचा गोडवा कमी झाला नाही किंवा मजरूह सुल्तानपुरींनी वर्णन केलेली मुंबईची स्थिती बदलली नाही. मोठमोठ्या इमारती, भरधाव वाहने आणि कंपन्यांच्या गजबजाटातील  मुंबईकरांचे जीवन अजूनही ‘मुश्किल' च आहे. समुद्राने वेढलेल्या या बेटांवर माणसालाच राहणे कठीण असताना इतर जीवांचा विचार कोण करेल? त्यातच ज्या प्राण्याचा प्रत्यक्षात आपल्याला काहीच उपयोग नाही, त्याच्या संरक्षणाची अपेक्षा बाळगणे म्हणजे विरार लोकलमध्ये विंडो सीट मिळण्याची अपेक्षा बाळगण्यासारखेच. आपण जिथे राहतो, ज्या मार्गाने प्रवास करतो त्या परिसरात असा एखादा सजीव आहे, हे कित्येकांना ठाऊकही नसेल. मुंबई लगतच्या वेगाने नाहीसे होत चाललेल्या खारफुटी, दलदलीच्या परिसरातील ‘जीना मुश्किल झालेला हा जीव म्हणजे ‘ईल प्रजातीतील मुन्हेर'. इंडीयन शॉर्टाफिन ईल या नावाने प्रसिद्ध असणारा हा सापासारखा भासणारा मासा. या प्राण्याचे शास्त्रीय नाव अँग्विला बायकलर पॅसीफीया. मुंबईच्या वास्तवदर्शी गाण्यातील "इक चीज़ के है कई नाम यहाँ” ही ओळ शब्दशः खरी करणारा हा प्राणी  मुन्हेर, मुनेर, मुनेट, मुलेट या वेगवेगळ्या स्थानिक नावांने ओळखला जातो.

          आठशेहून अधिक जाती असलेला हा प्राणी म्हणजे खरंतर कमकुवत परांचा ईल मासाच आहे. याची लांबी एक ते दोन फूटांपर्यंत असते. हे प्राणी जेन्टस्‌ छत्र्यांसारखे अनाकर्षक अशा करड्या, काळपट, तपकीरी रंगांचे असले तरी त्यांचे काही भाईबंद मात्र लेडीज छत्र्यांसारखे रंगीबेरंगी असू शकतात. या प्राण्याचे शरीर दलदलीच्या प्रदेशात राहण्यासाठी पोषक अशा रचनेचे बनलेले असते. खवले नसलेले गुळगुळीत शरीर आणि त्यावरील चिकट स्त्रावामुळे त्याला हाताने पकडणे ‘मुश्कीलच नाही तर नामुमकीन' असते. पाण्यात पोहताना आपल्या शरीराची हालचाल लहरींप्रमाणे करून तो पुढे सरकतो, त्याचबरोबर त्याला गाडीच्या ‘रिव्हर्स गिअर' प्रमाणे उलट्या दिशेनेही पोहता येते. शरीराच्या हालचालींमुळे निर्माण होत असलेल्या लहरींची दिशा बदलून तो मागे जाऊ शकतो. पाण्यातील ही सहजता दलदलयुक्त जमिनीवरही कायम राहते. मुन्हेर हा मुंबईकरांसारखाच निशाचर प्राणी. अन्नाच्या शोधात सहसा रात्री बाहेर पडतो. इतर वेळी तो ‘ईल'  नावाच्या आपल्या बिळांमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह भक्ष्याची वाट पाहत निवांतपणे पहुडलेला असतो. किटक, मासे, बेडूक, खेकडे आणि मोठ्या प्राण्यांच्या मृत शरीराचा भागही तो खाऊ शकतो. अर्थातच हे सगळं खाण्यासाठी आवश्यक मजबूत जबडा आणि धारदार दात त्याच्याकडे आहेत. मुनेरची दृष्टी अतिशय सामान्य दर्जाची आहे. या कमकुवत दृष्टीच्या बदल्यात त्याला उच्च दर्जाची गंध संवेदन क्षमता लाभली आहे. रात्रीच्या वेळेस याच क्षमतेचा वापर करून अन्नाचा शोध घ्ोणे आणि कठीण जागेतून मार्गक्रमण करणे त्याला सोपे होते. त्याचे श्वसन कल्ल्यांच्या साह्याने होते.

      या प्राण्याच्या रक्तात विषारी प्रथिने असतात. या ईल माशांच्या रक्तातील द्रव्याचा उपयोग चार्ल्स रिचेट या शास्त्रज्ञाने आपल्या ‘अति संवेदनशीलता' या विषयावरील संशोधनासाठी केला. या संशोधनाबद्दल त्याला एकोणिसशे तेरा साली शरीरविज्ञानशास्त्रातले नोबेलही मिळाले. अन्न शिजवण्याच्या आणि पचनाच्या प्रक्रीयेमुळे यातील विषारी द्रव्ये निघून जातात. परिणामी जपान, चीनसारख्या देशांत त्यांचा अन्न म्हणून सर्रासपणे वापर होतो. इतकंच नव्हे तर जर्मनी, नेदरलँड, पोलंड, स्विडन, स्पेनसारख्या देशांत हे महागडे अन्न म्हणून ओळखले जाते. भारतात ‘मुनेर'चा समावेश अन्नात होत नाही. परंतु खेकडे पकडण्यासाठी लावलेल्या ‘पागोळ्या' नावाच्या जाळ्यांमध्ये आमिष म्हणून मुनेराचे तुकडे लावतात.

     ईल माशांच्या काही प्रजाती सुप्रसिद्ध आहेत. ‘जरा हट के' असलेल्या या प्रजांतीपासून ‘जरा बच के' राहीलेलेच बरे. आपल्याकडे उच्च विद्युतधारा वाहत असलेल्या केंद्रांवर ‘खतरा चारशे चाळीस व्होल्टस' असे लिहलेले फलक असतात. ईलेक्ट्रिक ईल असे नामकरण असलेल्या माशावर तर त्यापेक्षाही मोठा फलक लावायला हवा. त्यांच्या शरीरात सहाशे पन्नास व्होल्टस्‌इतकी जोरदार विद्युत क्षमता असते.  मरे ईल नावाचा प्राणी तर आधारासाठी स्वतःच्या शरीराची गाठ मारून लटकू शकतो.

     फिलीपाईन्सच्या काही जमातींमध्ये ईल माशाला मृतात्मा मानले जाते. युरोपातील काही भागांमध्ये या प्राण्याच्या शरीरातून निघालेल्या तेलापासून दैवी शक्ती मिळत असल्याचा समज आहे. तर इजिप्तमध्येही ईल पूजनीय आहे. जगाच्या काही भागात या जीवाला महत्त्व असलेल्या या जीवाची ‘जरा हट के' असलेल्या मुंबईत "कहीं बिल्डिंग, कहीं ट्रामे, कहीं मोटर, कहीं मिलमिलता है यहाँ सब कुछ, इक मिलता नहीं ईल अशी स्थिती आहे. सामान्यतः ईल माशांचे आयुष्य तीस ते सत्तर वर्षांइतके असते. यातले काही जीव पंच्याऐंशी वर्षापर्यंत जिवंत असल्याच्या नोंदी आहेत.परंतु हे आयुष्य जगण्यायोग्य परिस्थितीतील आहे. नवी मुंबईतल्या बिल्डींग, ट्रेन्स, मोटर आणि कंपन्यांसाठी  केल्या गेलेल्या किनारी जमिनींच्या अधिग्रहणामुळे या प्राण्यांना राहण्यायोग्य जागाच उरली नाही. परिणामी त्यांच्यावर ‘ऐ ‘ईल है मुश्किल जीना यहाँ' अशीच म्हणायची वेळ आलीय. या दुर्लाक्षित प्राण्यासाठी मानवापासून ‘जरा बच के रहा', हाच सल्ला. - तुषार म्हात्रे 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मानसिक छळात रूपांतरित होणाऱ्या मानसिक खेळात वृध्दी (१० ऑक्टोबर : जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष)