दुर्जनांवर चालून जाणारा सज्जन सुभेदार सैनिक!

शिपाई मुकेश चंद यांना कवर फायर देण्याची आज्ञा दिली आणि सज्जनसिंग यांनी पुढे मुसंडी मारली....कवर फायर तुटपुंजे होते...पहिल्या अतिरेक्याच्या अगदी पाच मीटर्स अंतरावर पोहोचू शकले...गोळीबाराची एक सबंध फैर पोटात घुसली. सज्जन सिंग साहेब तसेच पुढे जात राहिले...रायफल आग ओकत राहिली.....एक न अर्धा....पाचही अतिरेकी खतम झाले...जणू आगीच्या एका मोठ्या गोळ्याने शत्रूची शेकोटी विझवून टाकली होती. हिजबुलचा बटालियन कमांडर इम्तीयाज ही एक मोठी शिकार होती! मरणा-या अतिरेक्यांनी त्यांच्या जीवाच्या आकांताने झाडलेल्या काही गोळ्या सज्जनसिंग साहेबांचे हेल्मेट भेदून डोक्यात शिरल्या....आता जीव वाचणार कसा?

सुबाह म्हणजे एक प्रांत. हा शब्द मुघलांनी प्रचलित केला. पुढे याचे सुबा असे रूप झाले आणि या सुब्याची किंवा सुभ्याची संपूर्ण जबाबदारी सांभाळणारा अधिकारी सुबेदार/सुभेदार म्हणून ओळखला जाऊ लागला. जीवाचे दान देऊन किल्ले कोंढाणा काबीज करून दाखवणारे तानाजी मालुसरे हे सुभेदार या महत्त्वाच्या आणि मानाच्या पदावर होते, हे आपल्याला ठाऊक आहे.  

   १८६६ पर्यंत भारतातल्या ब्रिटीश सैन्यात एक शिपाईगडी पोहोचू शकेल असे हे सर्वोच्च पद होते. भारतीय सैन्याने हे पदनाम विशिष्ट अर्थाने कायम ठेवले असले तरी आता संदर्भ बदलला आहे. पण या पदावर पोहोचणे काही सोपे काम नाही. वयाच्या साधारण १८व्या वर्षी एखादा तरुण ‘जवान म्हणून सैन्यात भरती होतो तेंव्हा त्याला शिपाई संबोधन असते.  पाच वर्षांनी हे शिपाई लान्स नायक, आणखी चार-पाच वर्षांनी नायक आणि आणखी पाच-सहा वर्षांची उत्तम सेवा बजावल्यावर हवालदार पदी बढती मिळू शकते. हवालदार यांना दहा सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करण्याची संधी मिळते. हवालदार हे नॉन कमिशन्ड ऑफिसर्स म्हणून संबोधले जातात. इथपर्यंत आपल्या या सैनिकाची सुमारे पंधरा वर्षांची सेवा झालेली असते. बहुतांश जवान सतरा वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतात. हवालदार पदाच्या पुढची पदे प्राप्त करणारे ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर्स होऊ शकतात...अर्थात अनेक परिक्षांमधून तावून सुलाखून निघाल्यावरच...."साहब या संबोधनास पात्र ठरतात! नायब सुबेदार ते सुबेदार आणि अखेरीस सुभेदार मेजर अशी ही बढती असते.  सुमारे तीस ते चाळीस सैनिकांची तुकडी सांभाळण्याची जबाबदारी  ते खांद्यावर घेतात. या पदापर्यंत पोहोचता पोहोचता या सैनिकांनी अनेक सशस्त्र संघर्ष पाहिलेले असतात, लढाया लढलेल्या असतात, खात्यांतर्गत अनेक परीक्षा दिलेल्या असतात...थोडक्यात सैनिक ते सुबेदार ही मोठी मजल असते! सुबेदार साहब आपल्या सैनिकांच्या कल्याणाची काळजी वाहतात, वरिष्ठ आणि आपले सैनिक यांच्यात समन्वय राखतात, शिस्त पाहतात, प्रशिक्षण सांभाळतात....आणि मुख्य म्हणजे प्रत्यक्ष लढाईत पुढे राहून नेतृत्वही करतात...! आपले आजचे कथानायक सुबेदारपदी कार्यरत होते. यांना लहानपणापासून केवळ सैनिकच व्हायचे होते. शालेय वयात हॉकी खेळाचे वेड होते. भरतीयोग्य वयात येताच साहेब थेट सेनेत भरती झाले आणि ‘जवान बनले. ३० मार्च १९५३ रोजी जन्मलेले सज्जन सिंग यादव अठरा वर्षे एक महिना आणि २८ दिवसांनी म्हणजे २७  मे १९७१ रोजी भारतीय सैन्यात दाखल झाले होते...१३, कुमाउ रेजिमेंट!

लगेचच त्यांनी १९७१ची भारत-पाक लढाई लढली...भरतीनंतर केवळ सहाच महिन्यांत हे सोनं आगीत जोखलं गेलं होतं. अंगभूत शौर्य, उत्तम संवाद कौशल्य, प्रामाणिकपणा, प्रशासन कौशल्य आणि एकूणच सैनिकी जीवनाबद्दल कमालीची आस्था असलेल्या या सैनिकाला पराक्रम खुणावत असे. विविध सीमा, विविध जबाबदा-या सांभाळत सांभाळत साहेब चाळीशी पार करते झाले आणि  २६  सप्टेंबर, १९९४ हा दिवस उजाडला. साहेब त्यावेळी कुपवाडामध्ये तैनात होते. अनेक अतिरेक्यांना त्यांनी यमसदनी धाडण्यात यश मिळवले होते. त्यादिवशी तर फार मोठी खबर होती. पाच अतिरेकी..त्यात काही स्थानिक तर काही पाकिस्तानी जलुराह गावाजवळ असलेल्या एका अत्यंत घनदाट, डोंगरी भागात लपून बसलेले आहेत...आणि कधीही भारतीय सैन्यावर हल्ला करण्याच्या बेतात आहेत...ते हल्ला चढवण्याची वाट न पाहता....त्यांचा शोध घेऊन त्यांना नष्ट करणे आवश्यक होते. ऑपरेशन म्हणजे अत्यंत नियोजनपूर्वक, धोक्याची कल्पना आणि तयारी ठेवून केली गेलेली कृती...जिची फलश्रुती निश्चित असते...बलिदान गृहीत धरलेले असते! सैनिकाच्या भाषेत ‘नुकसान म्हणजे बलिदान! ऑपरेशन ईगल सुरु झाले. बिळात लपलेल्या कालसर्पांना शोधून टिपण्यासाठी गरुड निघाले.  

युद्धाक्षेत्राची समुद्रसपाटीपासूनची उंची ५३०० फूट...पाकिस्तान व्याप्त काश्मीरची सीमा अगदी खेटून...अर्थात पाकिस्तानी कीटक आपल्या सीमेत घुसू शकण्याची शक्यता प्रचंड...कारण इथलं जंगल या कीटकांना आश्रय देतं...पोसत राहतं....फुटा-फुटावर पहारा ठेवणं अशक्य असतं...तरीही डोळ्यांत तेल घालून रात्रं-दिन युद्धाचा प्रसंग मनात चितारला जातो...

हे पाच-सहा अतिरेकी लपले होते ती जागा म्हणजे उभी चढण असलेला पहाड...त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाच्या सर्व बाजूंना दाट झाडी. वेडावाकडा वाहणारा नाला...मात्र त्यांच्या अड्ड्याशेजारी मोकळी जागा...जिथून ते झाडीतून त्यांच्या दिशेला येऊ पाहणारी हालचाल सहज टिपू शकायचे. वरिष्ठ अधिका-यांनी योजना आखली...सहकारी अधिकारी,कनिष्ठ अधिकारी यांनी ती समजावून घेतली. ठरल्याप्रमाणे वीर निघाले. काही सैनिक पायी तर काही वाहनामधून त्या जागेला वेढा घालायला सरसावले. रात्र संपता संपता शोध सुरु करायचा होता....पहाडाच्या वरच्या बाजूने खाली येत येत सर्व जंगल पिंजून काढायचे होते. तोवर वाहनातून आलेले सैनिक त्या भागावर वेढा आवळत आणणार होते.

सकाळचे नऊ वाजलेले...सुबेदार सज्जन सिंग यादव....आपल्या सैनिकांचे नेतृत्व करीत सर्वांत अग्रभागी...कित्येक वर्षांची अनुभवी पावले जंगल तुडवत होती....सज्जनसिंग साहेबांचा भेदक नजरेने दोन अतिरेकी पाहिले.....साहेब सावध पावलांनी पुढे सरकत राहिले...केवळ दहा मीटर्सचे अंतर राहिले....अतिरेक्यांनी साहेबांना पाहिले आणि धडाधड गोळीबार सुरु झाला....त्यांचा नेम काही चुकत नव्हता....अतिरेकी केवळ याचाच तर सराव करीत असतात...त्यांना पाकिस्तानी सैन्य प्रशिक्षित करीत असते. सज्जन सिंग साहेबांनी आडोसा घेतला आणि जवाबी फायरींग आरंभले. तेवढ्यात त्यांनी पाहिले...कॅप्टन केकेएस कोयराह साहेब आणि त्यांचे साथीदार सैनिक त्याच दिशेने पुढे पुढे येत होते....काहीच क्षणांत ते सर्व त्या अतिरेक्यांच्या अचूक गोळीबाराच्या टप्प्यात पोहोचतील...आता वेळ दवडण्यात अर्थ नव्हता....छातीचा कोट केला तरच कॅप्टन साहेब आणि अन्य सहकारी बचावू शकतील....सज्जन सिंग साहेब हातात्तील रायफल सरसावत त्या गोळीबाराच्या पावसात नहायला सज्ज झाले...दुसरा पर्याय नव्हता....शिपाई मुकेश चंद यांना कवर फायर देण्याची आज्ञा दिली आणि सज्जनसिंग यांनी पुढे मुसंडी मारली....कवर फायर तुटपुंजे होते...पहिल्या अतिरेक्याच्या अगदी पाच मीटर्स अंतरावर पोहोचू शकले...गोळीबाराची एक सबंध फैर पोटात घुसली....कवर फायर देणा-या मुकेश चंद यांनाही गोळ्या लागल्या....सज्जन सिंग साहेब तसेच पुढे जात राहिले...रायफल आग ओकत राहिली.....एक न अर्धा....पाचही कीटक खतम झाले...जणू आगीच्या एका मोठ्या गोळ्याने शत्रूची शेकोटी विझवून टाकली होती....राख उरली होती फक्त...हिजबुलचा बटालियन कमांडर इम्तीयाज ही एक मोठी शिकार होती! मरणा-या अतिरेक्यांनी त्यांच्या जीवाच्या आकांताने झाडलेल्या काही गोळ्या सज्जनसिंग साहेबांचे हेल्मेट भेदून डोक्यात शिरल्या....आता जीव वाचणार कसा?

तिथे तीन एके-५ रायफली, एक स्नायपर रायफल, असंख्य काडतुसे, हातगोळे, रेडीओ सेट असा मोठा शस्त्रसाठा होता. याच शस्त्रांनी हल्ला करण्याची संधी ते अतिरेकी शोधत होते...सज्जन सिंग साहेबांनी त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले....स्वतःच्या जीवाची कुरवंडी करून! हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज साहेबांच्या मातोश्री जिजाऊ साहेबांनी राजांनी कोंडाणा घेतला पाहिजे अशी इच्छा प्रकट केली....राजांचे सुबेदार तानाजीराव थेट उदयभानुला भिडले....पडले;  पण शत्रूला धुळीस मिळवूनच. त्यांच्याच पराक्रमाची याद यावी असा सुबेदार सज्जन सिंग यादव साहेबांचा पराक्रम....मृत्यूकडे झेप घेणारा...आणि अंती विजयश्री खेचून आणणारा!
दुर्जनाचा कर्दनकाळ ठरलेल्या या सज्जन सैनिकाच्या स्मृतींना वंदन. जय हिंद! - संभाजी बबन गायके 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

शेतकऱ्यांची आर्त हाक ऐका