महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
पुस्तक परिक्षण!
पुसट सावल्या गडद काळ : नेटके भाष्य, सूक्ष्म निरीक्षणाचा प्रत्यय
अष्टगंध प्रकाशन, ठाणे यांनी हा देखणा ‘पुसट सावल्या गडद काळ' काव्यसंग्रह प्रकाशित केला आहे. प्रदीप म्हापसेकर यांनी गूढरम्य मुखपृष्ठ चितारले आहे. एक माणूस सुख दुःखाचे डोंगर उचलून चालतोय. उन्ह सावल्या चित्रात दिसत आहेत. चित्रातील हा माणूस नक्कीच कवी असला पाहिजे. या जगात सव्रााधिक चटके कवीला बसतात कारण तो संवेदनशील असतो. ‘कवी झाले हजार आणि कविता झाली ठार.' असे लोक म्हणत असताना, बाजारात काव्यसंग्रह विकले जात नसताना काव्यसंग्रह प्रकाशित करणे म्हणजे कवीची दुर्दम्य आत्मविश्वास आहे.
हार्डबोर्ड कव्हर, छान बांधणी, कवितांची रेखीव मांडणी, काळी रिबिन स्वच्छ पांढरा कागद असलेला हा कविता संग्रह नजरेत भरतो. कवयित्री संध्या लगड मलपृष्ठावर म्हणताहेत की ‘कविता तर्क आणि विवेक यांचा संगम आहे.' पुस्तक हातात घेताच आपण वाचक या संगमावर उभे राहतो.
१०५ पृष्ठांच्या या काव्यसंग्रहात एकूण एकोणसत्तर कविता आहेत. सर्व कविता मुक्तछंद काव्यप्रकारात आहेत. निसर्गात पाऊस मुक्तछंद पडतो, धबधबे, नद्या मुक्तछंद वाहतात. समुद्रास मुक्तछंद भरती आहोटी येते. रोज सुर्य मुक्तछंद उगवतो आणि पौर्णिमेस चंद्र मुक्तछंद चमकतो. मुक्तछंद हे एक नैसर्गिक सौंदर्य आहे. निष्पाप बालकाचे असिम सुहास्य, लांब केस मोकळी सोडलेली स्त्री, झाडांवरून खाली उतरलेल्या सुंदर फुलांच्या वेली, रानफुलांवर विहंगणारी फुलपाखरे, पाण्यातील जलतरंग हे सारे सृष्टी सौंदर्य मुक्तछंद आहे. कवी राजीव जोशी यांनी प्रस्तावनेत लिहले आहे की , ‘वास्तव नेहमी भ्रामक असतं, कवितेतील त्याचे अर्थ, प्रभाव शोधून काढावे लागतात. संध्या लगड यांची कविता स्त्री जाणिवेची आहे. स्त्री वेदना उजागर करणारी आहे. ही कविता सभ्यता, इतिहास, संस्कृती, व्यवस्था, परंपरा, नातेसंबंध यावर संयमित भाष्य करते. संध्या लगड यांच्या प्रगल्भ सामाजिक जाणिवा कवितांमधून जाणवतात.' कवयित्री आपल्या मनोगतात लिहते, ‘वयाच्या सोळाव्या वर्षी लिहती झालेली माझी कविता तिथेच थांबली. विचारांची बैठक आणि वाचन याचा वारसा मला वडिलांकडून मिळाला. स्त्री जाणिवांच्या कथा,कविता यांची माझ्या करता आदर्श आहेत. आजवरच्या माझ्या प्रदीर्घ प्रवासात आलेल्या अनुभूतीच्या कवितांचा हा पहिलाच कवितासंग्रह सोपवताना मला आनंद आणि हुरहुर जाणवत आहे.'
आपल्या पहिल्याच ‘वैयक्तिक संपत्ती ' या कवितेत ते लिहितात.. पिकांचे हंगाम संपलेत, जमीन ओसाड होऊ घातलेली. जी मला वाटून टाकायची आहे, माझी वैयक्तिक संपत्ती म्हणून..... ‘मूल्यमापन ' कवितेत त्या लिहितात- कातडीचा रंग, शरीराची उंची, नाकाचा आकार, ओठांची महिरप, रेखीव चेहरा....ही इतकीच नाही कविता. ‘मैलाचे दगड ' या कवितेत त्या लिहितात- शहराच्या प्रत्येक हमरस्त्यावर, प्रत्येक मैलाच्या दगडामधे मला दिसते शिळा झालेली अहिल्या......‘वा-याच्या गोष्टी ' कवितेत- वारा सांगतो गोष्टी, गावच्या, घरच्या, परसाच्या, झाडांच्या, वेलींच्या, नदीच्या, नदीपलिकडच्या वारा सांगतो, सांगत राहतो घोंगावत. ‘चित्रातल्या कविता' कवितेत- चित्रप्रदर्शनात एकाच चित्रकाराच्या वेगवेगळ्या रंगाच्या भावविभोर कविता भिंतीवर अमूर्ताशी नातं सांगणा-या. ‘गृहितक' कवितेत- मी एक शून्य विश्वाच्या निर्वात पोकळीतलं जिथे अशा खिजगणतीत नसलेल्या अनेक पोकळ्या शून्याच्या. ‘भ्रमिष्ट' कवितेत- कुठल्याशा तंद्रीत तिथे एक चौकोन काढला समोरच्या कागदावर, त्यात भरला वारा, वारा गोल गोल फिरत राहिला चौकोन भर. ‘सावली' करूया कल्पना समजा, आपली सावली हरवली किंवा निघून गेली एखाद दिवशी आपल्याला सोडून तर .... ‘अनर्थाच्या विहिरी' कवितेत- अर्थाचे अनर्थ आणि अनर्थाच्या विहिरी ओसंडून वाहतात तरी मुलीबाळी उपसत राहताहेत गाळ विहिरीतला.
या काव्यसंग्रहातील कविता वाचल्यावर आपल्या लक्षात येते की कवयित्रीने आपल्या मनात आलेले वादळ, वारे ,ग्रहण, धावत्या ढगांच्या पलत्या सावल्या, उगवतीचे- मावळतीचे अमोघ रंग शब्दात टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. घरात, गर्दीत, बाजारात, कार्यालयात माणूस मनातल्या मनात एकटाच असतो. नाना प्रकारचे आक्राळ विक्राळ विचार मानात येत असतात. कधी कधी तो त्या प्रवाहात वाहून जातो तर कधी स्वतःस सावरून कामास लागतो. ‘झंझावात' कवितेत- सगळी भुतं मारली गेली आहेत, निती अनितीची, असा कुठला झंझावात झोडपून काढतो आहे. माणसामाणसातला विश्वास ? ‘बाईपणाची अंगाई' कवितेत- ते म्हणतात..पुरे झाली बाईपणाची अंगाई मग कोणाला सांगायचं किंवा कोणाला दाखवायचं रितं अवकाश? ‘हिटलरला द्यायचाय निरोप' कवितेत- हिटलरला द्यायचाय निरोप ,तुझे वंशज अस्तित्वात आहेत अजून. ‘आत्महत्या' कवितेत- मनाच्या विषण्ण अवस्थेत खूप विचार येऊ लागतात तेव्हा, कोणत्याही धर्म स्थळांना मी भेट देत नाही. ‘प्रवास' कवितेत- आपल्याला बदलता आले असते एकमेकांचे देह तर किती बरं झालं असतं. ‘भूमिका' कवितेत- रंगमंचावर नाटक सुरू आहे, प्रत्येकजण वठवतंय भूमिका आपापली एकपात्री अगदीच बेमालूमपणे. ‘मोराचा झगा ' कवितेत- त्याचा मोराचा झगा हरवलाय, भिंतीला लटकवून ठेवलेला. ‘गुलमोहर' कवितेत पारदर्शी तरंगाचा एक पडदा संन्यस्त उन्हाच्या वळचणीला आणि गुलमोहर असा बहरून आलेला. ‘भलामण' कवितेत- प्रगतीचे कुठलेच मार्ग अमान्य नव्हतेच कधी पण हे अष्टौप्रहर गुलामीचं राज्य नकोच आता.‘निष्क्रिय' कवितेत- डोंगर डोंगर डोंगर चहूबाजूंनी कामाचे इमारतींचे माणसांचे भावनांचे कसले कसले.
या काव्यसंग्रहातील कविता वाचताना आपल्याही मनात असे विविधरंगी विचार येतात याची प्रचिती येते. कवी शेवटी हाडामासाचा माणूसच असतो. कल्पनाविलास, स्वप्नरंजन, योजना, आराखडे तो करत असतो. त्यामुळेच या कविता वाचताना कवी सापडतो आणि माणूसही सापडतो. पहिले आणि शेवटचे रेखाचित्र गूढरम्य आहे. साहित्य म्हणजे काय तर अवतीभवतीचा माणूस शोधणे तसेच आपल्यात एक माणूस आहे तो शोधणे. तो माणूस प्रत्येकास सापडतोच असे नाही. काही माणसं शेवटपर्यंत चाचपडत आयुष्य जगत राहतात. सुख हे दुस-या माणसात नसून आपल्याच अंतरंगात आहे. हे एक मोठे कोडे आहे. याचे धागेदोरे या काव्यसंग्रहात आहेत. ते वाचा आणि शोधा. भाष्य, सूक्ष्म निरीक्षण शक्ती कवितांची बीजं आहैत. १०६ पानांच्या या पुस्तकाची किंमत १५०/ रूपये आहे. अष्टगंध प्रकाशनाचे हे एक छान पुस्तक आहे.
पुसट सावल्या गडद काळ - कवितासंग्रह
अष्टगंधा प्रकाशन, ठाणे
पृष्ठे १०६ मूल्य १५० रु.
- गज आनन म्हात्र