झडीचे दिवस
एकदा का झड लागली की बरेच दिवस सलग पावसाची रिपरिप चालू असायची. आमचे आई वडिल तर सांगायचे की, आठवडा भर नव्हे तर बारा पंधरा दिवस ही पावसाची झड चालायची. नातवंडाना आतापर्यंत ‘झड' म्हणजे काय ? तर पाऊस जोरातही पडायचा नाही आणि थांबायचाही नाही. सलग रिपरिप चालू असे. झडी कंटाळवाणी वाटत असली तरी आजही मनाला केवळ आठवणीने टवटवीत करून जाते. झडीच्या आठवणीने गतकाळातील भावनांच्या आठवणींचा पुर मनाच्या पटलांवरुन ओसांडून वाहू लागतो.
नाशिक पुण्यात व इतरत्र दोन तीन दिवसां पासून सलग पाऊस सुरु होता, मुंबईत तर विचारायची सोय नाही, बहुतेकांना तर तो आता नकोसा झालाय! कंटाळले असावेत बहुधा !
हो, पण बाकी गावात आणि छोट्या शहरातील वयस्करांना नक्कीच झडीची आठवण झाली असेल ! माझेही मन अलगद भूतकाळात गेले व तेथेच रमून गेले.
खुप दिवसानंतर म्हणजे जवळपास काही वर्ष झाले असतील ‘झडीचे दिवसच' पाहायला मिळाले नाहीत.
आताच्या नव्या पिढीला ‘झड़ी लागणे' म्हणजे नेमके काय ? आणि ती कशी असते ? हे अनुभवायला आणि सांगायला मिळेल कि नाही या बाबतीत मी साशंकच असायचो ! पण आताच्या झडीने माझ्या नातवंडाचा गहन प्रश्न चांगलाच हलका केला.
आमच्या बालपणी जशी झड़ी लागायची ना, तशी तर आता अलिकडच्या काळात अजिबात लागत नाही. पर्यावरणाचा समतोल ढासाळला म्हणा की मानवाच्या वागणुकीचे संतुलन ढासळले म्हणून हा झडीचा पाऊस नामशेष व्हायला लागला की काय याची शंका बरेचदा येत असते, पण खरे खोटे निसर्गालाच ठाऊक.
एकदा का झड लागली की बरेच दिवस सलग पावसाची रिपरिप चालू असायची. आमचे आई वडिल तर सांगायचे की, आठवडा भर नव्हे तर बारा पंधरा दिवस ही पावसाची झड चालायची. नातवंडाना आतापर्यंत ‘झड' म्हणजे काय ? तर पाऊस जोरातही पडायचा नाही आणि थांबायचाही नाही. सलग रिपरिप चालू. असे सांगून मी वेळ मारून देत असे! पण अशा या झडीच्या वातावरणात सलग अनेक दिवस घरातच राहावे लागायचे. आणि या काळात संपूर्ण कुटुंब एकाच ठिकाणी असल्याने घरात छान गप्पा रंगायच्या, कधी मागे झालेल्या भरपुर पावसाच्या, नद्याना आलेल्या पूराच्या, झालेल्या नुकसानीच्या, कधी एखाद्या वर्षी न पडलेल्या पावसाच्या, दुष्काळाच्या, दुष्काळी वर्षात लोक काय आणि कसे खाऊन जगले याच्या. गप्पांना अक्षरशः उत यायचा.
पाऊस सतत सुरु असल्याने घराबाहेर जाणे फार जीवावर यायचे. जिकडे तिकडे चिखलच-चिखल (आमच्या लहानपणी गावातील तुरळकच रस्ते पक्के असायचे) झालेला असायचा. त्या काळात खेड़े गावात अनेक गैरसोई असायच्या, त्यामुळे झडीच्या दिवसातील सर्वात अवघड आणि कठिण कार्य कोणते असेल तर बाहेर जाऊन येणे.
त्यात घरात छत्र्या फार कमी असायच्या आणि सदस्य जास्त असायचे, अशावेळी जर कुणाला बाहेर जायचे असेल तर पोते , खताच्या बो-या यापासून घोंगटे डोक्यापासुन गुड़घ्या पर्यंत पोत्याचा केलेला खोलगट भाग जो पाठीवरुन घेतला जायचा आणि मग बाहेर जायचे.
एकदा सकाळच्या त्या आवश्यक क्रिया आटोपल्या की दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरातच. अशा वेळी झडीचे काही खास मेनू असायचे. कुर्डया पापड खायचे तर कधी गरमा-गरम भज्यांचा आस्वाद चाखायला मिळायचा. कधी वडे तर कधी गुलगुले. थोडक्यात काय तर गप्पा मारायच्या. गप्पा करता करता कुणीतरी सहज एखाद्या पदार्थाची आठवण काढायची, बाकी सदस्यांची सहमती असायचीच आणि लगेच मेनू तयार. ओल्याचिंब असलेल्या वातावरणात त्या गरमागरम पदार्थांची चव काही वेगळीच असायची, जी आजही स्मृतींच्या कोंदणात कायमची साठवली आहे आणि ती आजही तशीच जागृत आहे.
सततचा पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात साहजिकच गारठा आलेला असायचा. काही ठिकाणी चूल पेटलेली असायची, तिच्याभोवती जिथे जागा मिळेल तिथे बसायचे. मोठ्यांच्या गप्पा चालायच्या आणि लहानग्यानी त्या कान देऊन ऐकायच्या.असा शेकोटी वजा कार्यक्रम घरोघरी असायचा आमच्या बहिणी घरात लपवून ठेवलेल्या चिंचोका, आंब्याच्या कोई शोधून आणायच्या व त्या चुलीच्या निखाऱ्यात छान खरपूस भाजून गप्पांसोबत एकीकडे त्याचाही आलपालटून आस्वाद घ्यायचा !
खुशाल मनसोक्त खायचे आणि उबदार कपड़े घालून छान झोपा काढ़ायच्या, हा झडीच्या दिवसातील बहुतेकांचा आमचा आवडीचा कार्यक्रम असायचा.
परंतु एकदा का झडीचा मुक्काम वाढला तर मात्र मोठी पंचायत व्हायची. चांगली चांगली घरंही गळायला लागायची. घरामध्ये ओल फुटायची, भिंती सार्दळायच्या, काही घरांच्या भिंती पडायच्या. धाबे ( मातीचा स्लॅब असलेले घर ) फक्त झडीतच गळायचे. आणि धाबे का एकदा गळायला लागले की हळूहळू टपकण्याचे क्षेत्रफळ वाढत जायचे आणि मग गळणाऱ्या जागेवर घरात असतील तेवढी भांडे कुठे कुठे ठेऊ- याची नाकीनऊ यायचे. स्वयंपाक घरातील भांडयांचा उपयोग झडीच्या काळात दुसरीकडे होऊ शकतो, हे मी तेंव्हाच बघितले असावे ! दिवस तरी कसाबसा निघुन जायचा परंतु रात्र फार अवघड जायची. कारण टपकणाऱ्या जागेवरील भांडे भरले तर पाणी बाहेर फेकावे लाग़ायचे, जर झोप लागली आणि ते जर फेकले गेले नाही तर घरभर पाणी व्हायचे. शेणामातीने सारवलेली घरं! एकदा का घर ओले झाले तर बसायलाही जागा शिल्लक राहायची नाही. त्यामुळे आतही ओले आणि बाहेरही ओले. आणि झड़ी जाईपर्यत घर कोरडे होण्याची वाट पहावी लागायची. टपकणाऱ्या पावसामुळे झोपण्याच्या जागा वारंवार बदलाव्या लागायच्या. त्यामुळे रात्री बऱ्याच वेळा झोपमोड व्हायची. म्हणुन रात्र फार अवघड असायची.
काही जरी असले तरी झड़ी मनात कुठेतरी हवी हवीशी वाटायची हे नक्की !
आम्ही जेंव्हा नोकरी निमित्त डिफेन्स कॅालनीत वास्तव्यास होतो, तेंव्हा आजुबाजूला अनेक लहान मोठी खेडी असायची. आमची कॅालनी तर चारी बाजूंनी शेतांनी वेढलेली होती. अशात पावसाची रिपरिप सारखी सूरु झाली की आजुबाजूच्या शेतीची कामे पूर्णपणे थांबलेली असायची. त्यामुळे मोठ्यांना शेतीची कामे नाही, आणि मुलांना शाळेत जावे लाग़ायचे नाही, त्यामुळे अभ्यासाची आणि होमवर्कची चिंता नसायची .आणि हो ! बायकांनाही स्वयंपाका व्यतिरिक्त इतर फारशी कामे नसायची.
त्या काळात टिव्ही नव्हते, मोबाईल नव्हते त्यामुळे माणसांचा माणसांशी ”संवाद होता. झडीमध्ये घरात थांबुन थांबुन कंटाळलेली माणसे गावच्या ‘पारावार' ( मंदिरावर) जमायची, गपांच्या मैफिली वर मैफिली रंगत रहायच्या किंवा ट्रान्जिस्टर लावून संंगीतात आपली करमणूक करून घ्यायचे.
झडीच्या दिवसातील खेळही वेगळेच. काहीजण कुणाच्या माडीवर जाऊन बसायचे तर काहीजण गोठयात किंवा अडगळीच्या त्या खोलीत जमायचे आणि जिथे बसण्यासारखी जागा मिळायची तिथे जाऊन बसायचे. मग तिथे पत्यांचा हमखास डाव चालायचा . ”पैसे लाउन पत्ते खेळणे तेव्हा आम्हाला माहितच नव्हते एकतर खिशात पैसाच नसायचा आणि असा काही पत्यांचा खेळ असतो हे माहितच नसायचे !शेतकरी मुलांचा पेरणीपाणी करून पैसा आटलेला असायचा.
पत्ते न येणारी मुले घरातच चौपट, साप -शिडी वा सोळा खडी असे खेळ खेळत असू ! पत्यांत डाव चालायचे ते सत्ती लावणीचे, जुटायचे आणि आपसात वाद विवादाने खेळले ही जायचे. झब्बू हा ही पत्यांचा खेळ आलटून पालटून खेळला जायचा, संगतिला व चघळायला खाण्याच्या वस्तुंची सोय हमखास असायचीच. जसे की बिस्किटांचे पुडे, पोंग्याच्या (पंडीत ) थैल्या, शेंगदाणे गुळ खोबरे यासारखे अनेक खाण्याचे पदार्थ.
अशा पत्यांच्या डावामध्ये खेळणारे आणि पाहणारे यांचा संपूर्ण दिवस कसा निघुन जायचा हे कळायचेच नाही. पूर्वी जिव्हाळा एवढा होता की ग्रामीण भागात टिव्ही वा इतर मनोरंजनाच्या साधनांची उणीव कधी जाणवली नाही. झडी कंटाळवाणी वाटत असली तरी आजही मनाला केवळ आठवणीने टवटवीत करून जाते. झडीच्या आठवणीने गतकाळातील भावनांच्या आठवणींचा पुर मनाच्या पटलांवरुन ओसांडून वाहू लागतो.
सध्याच्या काळात पावसा प्रमाणेच नात्यामधील भावनांचीही ”झड होऊन गेली आहेकी काय असे वाटायला लागते!तेंव्हा नात्यांची ही विण घट्ट होण्यासाठी पूर्वीप्रमाणेच ”झड़ी लागण्याची मी वाट पाहत असतो.
आणि तुम्ही? - अनिल देशपांडे