अभिजात दर्जा आणि आपल्या जबाबदाऱ्या

दरवर्षी छोटी मोठी २५० मराठी साहित्य संमेलने होतात, गतवर्षी दिल्लीत झालेले ९८ वे साहित्य संमेलन होय. साहित्य संमेलनाची इतकी जुनी परंपरा अन्य भाषेत नाही. ग्रंथ व्यवहाराची वार्षिक बाजारपेठ जवळपास २०० कोटींची आहे, जशी बोलली जाते तशीच्या तशी लिहिली जाणारी भाषा म्हणजेच मराठी ही एकमेव भाषा होय. असे असूनही मराठीची दुरावस्था आहे. कारण आपल्यामध्येच आपल्या माय मराठीबद्दल अनास्था, उदासीनता आहे. मराठी भाषेचा असा गौरवशाली इतिहास, परंपरा असतानाही जर आपण तीची उपेक्षा करणार असू तर आपल्यासारखे करंटे आपणच.

बऱ्याच वर्षांच्या मागणी नंतर मराठी भाषेला गतवर्षी ३ ऑक्टोबर रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही अत्यानंदाची गोष्ट खरी पण केंद्र सरकारने आपले काम केल्यानंतर तरी आपण आपले कर्तव्य पार पाडणार आहोत का ? हा खरा प्रश्न आहे. भाषा बोलली, लिहिली, वाचली, शिकली गेली तरच ती जिवंत राहते, तिचे संवर्धन होते हे लक्षात घेतले तर मराठी शाळा हे भाषा जिवंत ठेवण्याचे - संवर्धन करण्याचे मुख्य साधन आहे,असे असताना आज राज्यातील खेड्यापाड्यातील मराठी शाळा बंद का झाल्यात/होताहेत ? ज्या सुरू आहेत त्या मरणासन्न अवस्थेत का आहेत? मराठी मुले मराठी माध्यमातून शिकणार नसतील तर परप्रांतीय मुले मराठी शाळांमध्ये शिकणार का? मराठी मुलांनी मराठी शाळांकडे पाठ फिरवली तर तो दोष कुणाचा ? आज राज्यातील छोट्या शहरांमध्येही सार्वजनिक ठिकाणी मराठी माणसे हिंदी-इंग्रजीतून बोलत असतील, आपल्याला मराठीबद्दल न्यूनगंड वाटत असेल तर मराठीला वाली कोण ? पुढची पिढी मराठीतून शिकलीच नाही तर विपुल, अतुलनीय मराठी साहित्य वाचणार कोण? इतर कोणत्याही भाषेत नसतील अशी एकाहून एक अवीट मराठी गीते ऐकणार कोण? गीत आणि संगीतामध्ये चमत्कार मानले गेलेले ‘गीत रामायण' पुढच्या पिढीला कसे ऐकता येईल ? मराठीतील अजरामर नाटके - चित्रपट कोण पाहणार ? उत्तमोत्तम साहित्यिक, कलावंतांची जसे - आचार्य अत्रे, पु.ल.देशपांडे, वि.स.खांडेकर, वि.वा.शिरवाडकर, गदिमा, बालकवी, खेबुडकर, राम गणेश गडकरी, सुधीर फडके, वसंत देसाई, खळे, मंगेशकर भावंडे, काशिनाथ घाणेकर, नाना पाटेकर, जयश्री गडकर, सुलोचना वगैरे वगैरेंची ओळख पुढच्या पिढीला कशी होणार? आपली परंपरा-संस्कृती टिकणार कशी ? अशा अनेक गोष्टी आपली मुले मराठी माध्यमातून शिकली तरच समजतील / टिकतील. दुर्दैवाने तसे झाले नाही तर सारेच कलौघात नष्ट होण्याचे भय आहे. आपली मुले मराठी माध्यमात शिकली तर त्यांना भवितव्य नाही असा समज मराठी पालकांचा झालेला आहे तो दूर करण्यासाठी सरकारने शासकीय नोकर भरतीत मराठी माध्यमातून शिकलेलेच उमेदवार घेतले जातील असा कायदा केला पाहिजे. खाजगी अस्थापनातसुद्धा काही टक्के जागा मराठी माध्यमात शिकलेल्या उमेदवारांसाठी राखीव ठेवल्याचं पाहिजेत. नोकरीची हमी वाटली तरच मराठी मुले मराठी शाळांकडे वळतील.

वास्तविक देशातील प्रमुख २२ भाषांमध्ये मराठीचा समावेश होतो. जगात १० वा तर देशात चौथ्या क्रमांक लागतो. मराठी बोलणाऱ्यांची संख्या १२ कोटींहून जास्त आहे. मॉरिशस आणि इस्राईल या देशांमध्ये स्थानिक भाषा म्हणून मराठीला मान्यता आहे. ०९ व्या शतकापासून प्रचलित असलेली मराठी भाषा ७२ देशांमध्ये आणि भारतातील ३६ राज्यांमध्ये पसरलेली आहे. मराठी भाषा संस्कृतपेक्षा जुनी आहे असे प्राच्यविद्या अभ्यासक आणि संशोधक डॉ.प.वि.वर्तक हे ५० वर्षांपासून आपल्या व्याख्यानात सांगत होते पण कुणीही भाषा अभ्यासकांनी त्यावर विचार केला नाही; पण महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या डॉ. रंगनाथ पठारे समितीने पुराव्यानिशी ते खरे असल्याचे २०१३ साली दाखवून दिले. राज्यातील १५ विद्यापीठात मराठी अध्ययन केले जाते, प्रतिवर्षी सुमारे २००० नवीन पुस्तके आणि जवळपास ५०० दिवाळी अंकांची निर्मिती होते. दिवाळी अंकांची सव्वाशे वर्षांची परंपरा फक्त मराठीतच आहे. दरवर्षी छोटी मोठी २५० मराठी साहित्य संमेलने होतात, गतवर्षी दिल्लीत झालेले ९८ वे साहित्य संमेलन होय. साहित्य संमेलनाची इतकी जुनी परंपरा अन्य भाषेत नाही. ग्रंथ व्यवहाराची वार्षिक बाजारपेठ जवळपास २०० कोटींची आहे, जशी बोलली जाते तशीच्या तशी लिहिली जाणारी भाषा म्हणजेच मराठी ही एकमेव भाषा होय. असे असूनही मराठीची दुरावस्था आहे कारण आपल्याला आपल्या माय मराठीबद्दल अनास्था, उदासीनता आहे. मराठी भाषेचा असा गौरवशाली इतिहास, परंपरा असतानाही जर आपण तीची उपेक्षा करणार असू तर आपल्यासारखे करंटे आपणच.

      आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने केंद्र सरकारकडून दरवर्षी मराठी भाषेसाठी सुमारे पाचशे कोटी निधी मिळणार आहे, त्याचा उपयोग मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठीच झाला पाहिजे. मराठीतील अमुल्य ग्रंथांचे जतन करणे, त्यांचा अभ्यास करणे, यासाठी अद्ययावत असे मराठी भाषा भवन बांधणे, जिल्ह्या जिल्ह्यात मराठी भाषा समृद्धीसाठी चळवळी उभारणे, देशातील ४५० विद्यापाठांमध्ये मराठी शिकण्याची सुविधा निर्माण करणे, नवीन तंत्रज्ञान मराठीतून शिकता येण्यासाठी प्रयत्न करणे, पुढचा काळ हा कृत्रिम बुद्धिमत्ते (AI) चा असल्याने सदर शिक्षण मराठीतून मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, तरच मराठी भाषा ज्ञान भाषा होईल. मराठी शिकलेल्यांना अनेक संधी उपलब्ध होतील आणि तसे झाले तरच आताची व पुढची पिढी मराठी शिकेल, मराठीचे संवर्धन होईल, मराठी चिरकाल टिकेल. संत ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषा ही माधुर्यात अमृताशी पैज जिंकेल असे सांगितलेले होते. मराठी भाषा अभिजात आहेच त्यावर सरकारी मोहरही उमटली आहे आता महाराष्ट्र सरकारने ३ ऑक्टोबर हा ‘अभिजात भाषा दिन' म्हणून जाहीर केलेला असला तरी तेथेच सरकारची जबाबदारी संपलेली नाही. सरकारने आणि मराठी भाषिकांनी भाषेबाबत दक्ष राहून ती जगात अग्रस्थानी नेण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. अभिजात भाषा दिनाच्या तमाम मराठी भाषिकांना, मराठी भाषा प्रेमींना खूप खूप शुभेच्छा. मराठी भाषा चिरायू होवो.
  - मनमोहन रो.रोगे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

साडी साडी रे