मराठी भाषेचा अभिजात दर्जा  व आपली जबाबदारी

वैभवशाली परंपरा असणारी मराठी भाषा सव्रााधिक बोलली जाणारी जगातील १५ वी भाषा आहे , तसेच ती भारतातील चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. सुमारे नऊ कोटी लोक मराठी भाषा बोलतात.लिहीणे, वाचणे, बोलणे, आकलन होणे या संदर्भात विविध भाषांचा वेग हा वेगवेगळा असतो.मराठी ही जगामधील पहिल्या पाच वेगवान भाषांपैकी एक भाषा आहे.

  अभिजात भाषा : केंद्र सरकार तर्फे काही भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे ठरवले. हा दर्जा मिळण्यासाठी १ ) भाषा प्राचीन असावी २) त्या भाषेचे साहित्य श्रेष्ठ असावे ३) भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे ४ ) भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे ५ ) प्राचिन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा. असे निकष होते.केंद्र सरकारच्या या निकषानुसार २००४ साली तामिळ ह्या भाषेला हा दर्जा दिला. २००५ साली संस्कृत, २००८ साली तेलगू आणि कन्नड, २०१३ साली मल्याळम, २०१४ साली ओडिया या भाषांना हा दर्जा मिळाला महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा केल्यानंतर ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषे बरोबर बंगाली, पाली, प्राकृत, आसामी ह्या भाषांना अभिजात दर्जा देण्यात आला.

      मराठी भाषेसाठी महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न :  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून पाचशे पानांचा अहवाल केंद्र सरकारकडे सादर केल्यानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला.

     अभिजात दर्जामुळे मराठी भाषिकांचे फायदे  ः १ - मराठी बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह प्रकाशित कारणं शक्य होईल २- भारतातील सर्व साडेचारशे विदयापीठामध्ये मराठी शिकवण्याची सोय करण्याची शक्यता आहे. ३- प्राचिन ग्रंथ सवलतीत अनुवाद करता येतील ४- महाराष्ट्रातील सर्व बारा हजार ग्रंथालयांना सशक्त करता येईल. ५ - मराठी भाषेच्या उत्कर्षां साठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा सर्वांना भरीव मदत मिळेल ६- रोजगाराची संधी मिळेल.

    महाराष्ट्र शासनाची जबाबदारी : १) केंद्रसरकारकडून मिळणारा निधी अखंडपणे मिळवणे व केंद्र सरकारच्या अपेक्षा पूर्ण करणे ही सर्वात मोठी जबाबदारी आहे.

२ ) विद्यार्थी साहित्य संमेलन आयोजित करावे - प्रत्येक महाविद्यालयात मराठी वाडःमय मंडळातर्फे २१ मार्चला कवितादिन, २७ फेब्रुवारीला राजभाषा दिन, २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन, १५ ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरे करण्यास सांगून विदयापीठातर्फे जसा युवा महोत्सव साजरा केला जातो तसा "साहित्य जल्लोष”  साजरा करावा.त्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा.

३ ) अनुवादास प्रोत्साहन द्यावे - इतर भाषेतून मराठीत तसेच मराठी साहित्याचे इतर भाषेत अनुवाद करणाऱ्यांस प्रोत्साहन द्यावे.

४ ) मराठी भाषेतील प्रवाहांना प्रोत्साहन द्यावे - संत साहित्य, भक्ती साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, कामगार साहित्य इत्यादी प्रवाहांना प्रोत्साहन दिले तर मराठी भाषा समृद्ध होईल.

    वाचक व लेखकांची जबाबदारी :  फक्त  "महाराष्ट्र माझा आणी मी महाराष्ट्राचा”  हे बोलून चालणार नाही तर महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी वाचवली पाहिजे. ती सर्व मराठी माणसांची जबाबदारी आहे. त्यासाठी खालील सवय लावून घेणे गरजेचे आहे.

१ - साहित्य संस्थेत सहभागी व्हावे - आपल्या परिसरातील साहित्य संस्थेत सक्रिय सहभाग घ्यावा. जागोजागी वाचनकट्टा सुरू करून किमान आठवड्यातून एखादा कार्यक्रम तरी आयोजित करावा.

२--कार्यक्रमास उपस्थित राहावे - सध्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम आयोजित करताना प्रेक्षक कसे जमवायचे ? हा प्रश्न पडतो. यासाठी प्रत्येक मराठी प्रेमींनी प्रत्येक मराठी कार्यक्रमास उपस्थित राहून आयोजकांना प्रोत्साहन द्यावे.

३- पुस्तके भेट द्या - सध्या मराठी पुस्तकांची विक्री होत नाही.यासाठी मराठी माणसांनी लग्न, वाढदिवस अश्या समारंभात पुस्तके भेट द्यावीत.

४ - मुलांना मराठी शाळेत घालावे -- अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मते मुलांना मातृभाषेत शिक्षण दिले तर त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकास चांगला होतो.


५- मराठीत बोला मराठीत लिहा - स्वभाषा म्हणजे आपल्या संस्कृतीशी जोडणारा सुवर्णसेतूच. त्यामुळे आपल्या मातृभाषेपासून दूर जाणे योग्य नाही.समाजाच्या अस्तित्वासाठी मातृभाषेचे संवर्धन होणे गरजेचे आहे.आपल्या कुटुंबात, मित्रमंडळ, सहकारी यांच्यात मराठी लिहिणे, बोलणे गरजेचे आहे.

६ - माहिती-सेवा-संवाद- मराठीत : आज माहिती ,सेवा या सार्वजनिक क्षेत्रात मराठी भाषेच्या वापरासाठी प्रयत्न करायला हवेत.संपूर्ण जगात मराठी ही पंधराव्या क्रमांकाची भाषा आहे.केंद्र शासन, राज्यशासन, न्यायालय, दूरदर्शन, जाहिरात सर्व बाबतीत जनतेशी संपर्क सेवा मराठी भाषेत करावी.

७ - आर्थिक क्षेत्र - : बऱ्याचदा मराठीचा प्रश्न भावनिक वाटतो.मराठी केवळ साहित्य, कला, सांस्कृतिक एवढ्यापुरतीच न राहता ती संवाद , ज्ञान , रोजगार , नोकरी ,व्यवहार ,उद्योगाशी जोडलेली भाषा व्हावी.बीएसईची वेबसाईट मराठीत होणे, आय.टी.क्षेत्रातील कंपन्यांतील मराठी मंडळींनी प्रयत्न करावेत.

८ - माहिती तंत्रज्ञान - मराठी - आज संगणकाचे युग आहे.त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाची भाषा मराठी होण्याची गरज आहे.

९- साहित्य - ज्ञान -संस्कृती - मराठी - मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठीत विविध भाषांतील साहित्यकोश, पाठ्यपुस्तके, ज्ञानविज्ञान,  संशोधन मराठी भाषेत उपलब्ध व्हावेत.

१० - मराठीतील योग्य शब्दांचा वापर करावा -स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी भाषेला अनेक शब्द दिले आहेत.   Budget ला अंदाजपत्रक, Cycle ला दुचाकी. कुसुमाग्रजांनी ‘बेकेट' च्या केलेल्या अनुवादात ‘सायक्लोरामा' साठी आकाशपडदा हा शब्द वापरला आहे.

११ - मराठी बोलताना जास्तीत जास्त मराठी शब्द वापरावे - एका व्यक्तीने दुसऱ्याला सांगितले की ”बाथरूममध्ये स्टँडवर ती बॉटल असेल बघ.” यात सहा शब्दांत चार इंग्रजी शब्द आहेत. त्या ऐवजी ”न्हाणीघरातल्या फडताळात ती बाटली असेल बघ”  हे वाक्य वापरले तर त्यात सर्व मराठी शब्द आहेत.

   कोणतीही भाषा टिकणे व तिचा विकास होणे म्हणजे काय ? तर श्रवण, भाषण,संभाषण ,वाचन व लेखन ही भाषिक कौशल्ये अत्यंत विस्तृत, सखोल व व्यापक होत जाणे. ९६ वर्षांपूर्वी म्हणजे १९२६ साली राजवाडे यांनी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून विचार मांडताना मराठी टिकणार नाही असे भाकीत केले होते त्याला मराठीचे कैवारी कवी गंगाधर रामचंद्र मोगरे यांनी प्रत्युतर देऊन ठणकाऊन सांगितले होते की कोणत्याही भाषेच्या आक्रमणाने मराठी भाषा मरणार नाही थोडी कमकूवत झाली तर आम्ही त्यावर इलाज करू. मोगरे यांच्या विचाराशी सहमत असलेल्या अनेकांनी माय मराठीला वाचवले.

     १४ फेब्रूवारी २००९ ते १६ फेब्रूवारी २००९ ला अमेरिकेत पहिले मराठी विश्व साहीत्यसंमेलन आयोजित करून मराठी भाषा साता समुद्रापलीकडे पोहोचवली. राजवाडे यांनी मराठी भाषा मरणार असे भविष्य केले त्याला २०२६ साली शंभर वर्ष होणार आहेत. या घटनेची दखल घेऊन २०२६ साली होणाऱ्या ९९ व्या साहित्य संमेलनात विशेष परिसंवाद आयोजित करावा.

     महाराष्ट्र शासनानाने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी अनेक वर्ष पाठपुरावा केला व ३ ऑक्टोबर २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाला यश मिळाले. हा दर्जा टिकवण्यासाठी वा केंद्र सरकारकडून दरवर्षी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. - दिलीप प्रभाकर गडकरी 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अभिजात दर्जा आणि आपल्या जबाबदाऱ्या