पुस्तक परिक्षण

माझं मन  दुःखाला भिडण्याची कुवत असणाऱ्या लेखणीचा कवी

कोरोना काळातील झालेली जगण्याची घालमेल, तो जगभरातील काळाकुट्ट माहोल! तरीही माणूस अजून कसा जागृत होत नाही? का माणुसकी लयाला जात आहे? देश, त्याचे संरक्षक भारतीय जवानांना आदर व्यक्त करत जगाला युद्ध नको बुद्ध हवा आहे ह्याची जाण करुन देणारा संदेश देत कवी आपल्या कवितेतून व्यक्त होत आहे. आदर वाटतो अशा विचार करणाऱ्या युवकाचा!

लांजा तालुक्यातील स्पष्ट शब्दांत बोलणारा एक विद्वान कवी, ज्याच्या अंगी विविध कलागुण दडलेले आहेत, असा अवलिया! त्यांचा एक काव्यसंग्रह माझ्या हाती लागला. खरं तर त्यांनीच एका काव्यमैफलीत माझं मन हे पुस्तक सप्रेम भेट म्हणून अभिप्रायार्थ दिला. अर्थातच त्यांची माझी ती पहिलीच भेट असूनही आत्मीयता वाटू लागली. एक कवी म्हणून अशा तरुणाशी चार शब्द बोलता आले. कवितेचे छान असे सुबक ५६ पानी पुस्तक मी एका दिवसात वाचून काढले. ज्याचे मलपृष्ठ अतिशय सुरेख असे आहे. वाचून यावर माझ्या काव्य अनुभवातून चार शब्द लिहावे असे वाटले. जे मी सर्व वाचकांना शेर करत आहे. कवी आणि कविता याचे आपण सर्व स्वागत कराल ह्याची खात्री आहे.

कविता वाचण्याआधीच प्रारंभीच किमान सहा प्रतिथयश जाणकारांनी आपले मौलिक अभिप्राय दिले आहेतच. पुढे कवी नरेंद्र पवार या तरुण मराठी साहित्यिकाने आपले मनोगत व्यक्त केले आहे. त्यांनी बालपणापासून ते आजपर्यंतची आपली जडणघडण कशी झाली? त्याचे अतीशय करुण शब्दांत विवरण केले आहे. तेव्हाच असे वाटले, त्यांचा पुढील काव्यमय प्रवास कसा झाला इथपर्यंत बरेच काही मोजक्या शब्दांत सांगितले आहे. मला तसे तुलनात्मक लिहिणे ठीक नाही वाटत, मात्र कवी ग्रेस, कविवर्य नारायण सुर्वे यांची आठवण झाली. दुःखाला शब्दांची पाझर कशी फुटते ते त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक रचनेत मांडली आहे. अतिशय खोल विचार सोप्या शब्दांत कवी सहज सांगतात, ह्याचीच हुरहूर मनास लागते.

प्रारंभीच्या दोन कविता या अतिशय दुःखी शब्दांत कवी लिहिता झाला आहे. त्याच्या मनोगतात जे अन्‌ जसे अवतरले त्याहीपेक्षा ज्यास्त प्रभावी त्याच्या आई आणि पप्पा या दोन काव्यात दडले आहे. पुनः पुन्हा वाचत राहिलो तेव्हां त्यावर शब्दांत व्यक्त होता आले. स्वतःला दुःखासमोर शरण न जाता त्यांस थेट भिडण्याची कुवत या कवीच्या लेखणीत आहे, हे निर्विवाद सत्य होय! वाचकास याची जाणीवही होईल, जेव्हां पुस्तक हाती लागेल.

क्षणभंगुर जीवन हे...! या आणि अशा प्रेम काव्यातून कवी
वाटेवरच्या वाटसृला
मी नेहमी विचारायचो
ती दिसली का हो...
नकार मिळताच गप्प बासायचो...
तळ हातावरची मेहेंदी
या कवितेत कवी खूप भावूक झाला आहे..ते वाचतांना ध्यानी येते.
श्रुंगार नखरा नटखट तुझा
ठाऊक आहे मला तू
माझ्यासाठी गोड आहेस
लपविते तळाहाताच्या मेंहंदीत मला तू
सगळं कसं प्रेमळ झालंय.

कोरोना काळातील झालेली जगण्याची घालमेल, तो जगभरातील काळाकुट्ट माहोल!  तरीही माणूस अजून कसा जागृत होत नाही? का माणुसकी लयाला जात आहे? देश, त्याचे संरक्षक भारतीय जवानांना आदर व्यक्त करत जगाला युद्ध नको बुद्ध हवा आहे ह्याची जाण करुन देणारा संदेश देत कवी आपल्या कवितेतून व्यक्त होत आहे. आदर वाटतो अशा विचार करणाऱ्या युवकाचा!

आणखीन काही कविता आहेत ज्याचा वाचकांनी आनंद घ्यावा अशा आहेत. नक्कीच आवडतील. शेवटी त्यांचे काही निवडक फोटो पुस्तकाच्या अंतिम दोन पानांवर छापले गेले आहेत, त्यामुळे पुस्तक कवीला उंची देऊन जाते. सर्व जुन्या जाणकारांविषयी कवी आदर व्यक्त करतो आणि निवडक शब्दांत त्यांना विमनस्क होतो. हे विशेष!

जी प्रत कवी नरेंद्र पवार यांनी मला दिली आहे ती पुस्तकाची दुसरी आवृत्ती आहे. यावरून वाचकांच्या ध्यानी आलेच असेल, कवी नरेंद्र किती पॉप्युलर ते! कवी नरेंद्र यांच्या काव्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून माझं मन हे पुस्तक विकत घेऊन अवश्य वाचावे असे मी सुचवू इच्छितो. कवितेचा जो हा आपला प्रवास आहे तो अविरत असाच सुरु रहावा आणि मराठी काव्य विश्वातील अनेक नामवतांचे लिखाणाचा अभ्यास करत रहावा. खूप खूप शुभेच्छा! -इक्बाल शर्फ मुकादम 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मराठी भाषेचा अभिजात दर्जा  व आपली जबाबदारी