एकमेकांपासून तुटत जाताना...

अनेकांनी मोठ्या जिद्दीने विविध संकटांचा सामना करुन आपले संसार फुलवले, शेजारधर्म जपला, मैत्र सांभाळले, गरीबीत असतानाही नातेवाईकांची, पै-पाहुण्यांची यथोचित उठबस केली..ती सारी माणसे आज गेली कुठे? पैसा, करिअर, श्रीमंती, स्टेटस, आत्मकेंद्रीतता आज कोणत्या थराला जाऊन पोहचली आहे? मी, माझी मुलंबाळं, माझा फ्लॅट, माझा टीव्ही, माझी इस्टेट, माझी गाडी  आणि माझ्या घरातून दिसतो तेवढाच भारत अशी मतलबी मानसिकता जोपासण्याचं हे फळ आहे?

   मानसी अनेक दिवसांच्या बोलावण्यावरुन तिच्या नणंदेकडे गेली होती. त्या नणंदेचे यजमान गमावल्याला अनेक वर्षे होऊन गेली होती.  तिच्या सर्व मुलामुलींचे विवाहही पार पडले होते व जो तो आपापल्या संसारात व्यस्त होता. एका मुलाकडे ती नणंद राहात होती. त्याच्याही विवाहाला बरीच वर्ष झाली होती. नणंदेच्या मांडीवर दोन नातवंडे खेळत होती. यथावकाश घरचा सारा कारभार सूनेच्या हाती गेला होता. नणंद उसासे टाकत आपला भूतकाळ आठवत असे. खरे तर तिच्याकडे मुवकामाला जाणे मानसीला पसंद नव्हते. कारण या नणंदेची सून कोणत्याही पाहुण्याकडे पाहुन असा काही कटाक्ष टाकत असे की पुन्हा कुणी त्या घरी कधीच जाऊ नये. पण धाकट्या नणंदेने खूपच आग्रह केला व जवळपास जबरदस्तीनेच तिने मानसीला तिकडे नेले होते.

   त्या घरी गेल्यावर लगेचच या दोघींच्या लक्षात आले की ही सून त्यांच्या पाहुणचारात टंगळमंगळ करीत आहे. धड बोलत नाही, कुणाची विचारपूस करीत नाही. एवढेच नव्हे तर नणंदेचा मुलगा..या दोघींचा भाचाही जेवढ्यास तेवढे बोलून बाजूला होत आहे. आतल्या खोलीत दरवाजा बंद करुन कामाच्या नावाखाली बसून किंवा झोपून टाईमपास करत आहे. मानसीला तिथे फारकाळ थांबवेना. पण इलाज नव्हता. कारण त्या दोघीही आपले शहर सोडुन  परराज्यात पाहुण्या आल्या होत्या व परतीचे तिकीट तीन दिवसांनंतरचे होते. या दोघींनीही तेवढे तर आयुष्य नवकीच पाहिले होते की कोणतीही व्यक्ती पाहुण्यांप्रति आपल्या वर्तनातून कशा प्रकारे नाराजी व्यक्त  करत आहे ते ध्यानात यावे. मग त्यांनी त्या नणंदेला गोडीत घेतले. भांड्यांची आदळआपट करुन कसाबसा स्वयंपाक उरकून नणंदेची सून तिच्या खोलीत आरामासाठी गेली की मग नणंद या आपल्या सूनेची एकेक ष्टोरी सांगत असे. त्या सूनेला आपल्या माहेरचे सोडुन इतर कुणी पाहुणे आल्याचे खपत नसे. मग पुन्हा कुणी येऊ नये म्हणून ती सासूशी पाहुण्यांसमोर भांडण उकरुन काढी. कोणत्याही कारणावरुन मुलाची धुलाई करी. जेवण रांधण्यास व रांधले असेल तर वाढण्यास भरपूर वेळ घालवी. एखाद्याची भूकच मरुन जाईल असे तोंड करुन जेवायला वाढी. पाहुण्या म्हणून गेलेल्या या दोघी चांगल्या, सधन आर्थिक परिस्थितीतल्या, नीटनेटके राहणे व चांगलेचुंगले खाणे यांच्या सवयी असलेल्या. त्यांनी जे ओळखायचं ते ओळखलं. ...आणि पुन्हा कधी त्या घराची पायरीही चढल्या नाहीत.

   स्मिता आणि जयवंत हे एक सुशिक्षित, सुजाण जोडपे. दोघेही नोकरीला असताना स्मिताच्या पालकांनी यांची मुले सांभाळली, मुलेही चांगली निघाली. उच्चशिक्षित झाली, स्वतःचे व्यवसाय सुरु केले, त्यात सुस्थापित झाले. या साऱ्यात त्यांच्या घरी जाणारे-येणारे घटले. कारण दोघेही नोकरीला असल्याने मधल्या वेळेत भेटणार कुणाला? आणि संध्याकाळी थकून भागून आलेल्या या दोघांना त्रास द्यायला कुणाला आवडत नसे व शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी त्यांना त्यांची उर्वरीत कामे करु द्यावीत, एकमेकांसोबत वेळ घालवू देता यावा म्हणून अनेकांनी मग त्यांच्या घरी जाणे बंदच केले.  स्मिता व जयवंत हे दोघेही लहानपासूनच त्यांच्या शालेय, महाविद्यालयीन जीवनात मैत्रीप्रिय म्हणून फेमस होते. त्या दोघांनाही आपापल्या नातेवाईकांकडे-मित्र-मैत्रीणींकडे जाणे, त्यांच्याकडे मुक्काम ठोकणे, एकत्रित भोजन करणे, सहलींना जाणे खूप आवडे. पण जसजसे शिक्षण होत गेले, विविध कोर्सेस, छंद, करिअर, नोकरी यावर लक्ष केंद्रीत करणे वाढले तसे त्यांचे इतरांसमवेतचे सहजीवन कमीकमी होत गेले. हळुहळू तर ते बंदच होत गेले. नोकरी, मुलं, त्यांचं शिक्षण, त्यांची प्रगती, त्यांचं करिअर मग त्यांची लग्नं, त्यांंची मुलंबाळं आणि मुलांचं करिअर चांगलं व्हावं म्हणून ती मुलंबाळं सांभाळणं एवढंच त्यांचं विश्व उरलं. हे जोडपं कुणाकडे जाईना, मग इतरांनीही यांच्याकडे येणं टाकलं. आता आयुष्याच्या संध्याकाळी या जोडप्याची मुलं आणखी मोठ्या महानगरात आणखी मोठ्या प्रशस्त जागेत राहायला गेली आहेत आणि नातवंडं तर शिक्षण आणि नोकरीनिमित्त अमेरिकेत जाऊन तिथलेच जोडीदार निवडत आपापले विवाह उरकून तिथेच स्थायिक झाली आहेत. आता या क्षणाला मात्र एकाकी पडलेल्या स्मिता आणि जयवंतला आपले नातेवाईक, आपले बालपणापासूनचे-शाळा-महाविद्यालयातले मित्र आठवताहेत. पण त्यांच्यातल्याही अनेकांनी हे जग केंव्हाच सोडलंय आणि काहीजण आता विविध आजार-दुखणीखुपणी घेऊन ‘वरच्या'चे बोलावणे कधी येतेय यासाठी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत.

   वीणाच्या पतीला हे जग सोडुन आता दहा वर्षाहुन अधिक काळ झाला होता. वीणाच्या मुली विवाह होऊन चांगल्या घरी आपले आयुष्य व्यतीत करीत होत्या. मुलींची मुलेही व्यवस्थित शिकून मार्गी लागली होती. मात्र वीणाच्या मुलग्यांचे काही ठीक नव्हते. मोठ्या मुलाशी सूनेचे पटत नसल्याने ती कायमची माहेरी निघून गेली होती; तर धाकट्याच्या पत्नीला वीणाच नकोशी होती. पैशा-अडक्याची कमतरता नव्हती. मुलगे हवे ते आणून देत. पण शेवटी उतारवयात साथीला, सेवेला ‘आपलं'च माणूस लागतं. आणि आपल्या माणसांचे चांगले बोल, त्यांची साथ त्यांचा सहवास गरजेचा असतो. त्याचीच इथे कमतरता होती. धाकट्याच्या पत्नीने त्याच्याकडे हट्ट करुन वेगळा पलॅट घ्यायला लावला व ती तिथे राहायला गेली होती. मात्र धाकट्याचा  मुलगा, मुलीचा मुलगा आणि दोन मुलगे यांच्या जेवणखाणाचे वीणालाच करावे लागे. वय झालेली, दृष्टी कमजोर झालेली, हालचाली मंदावलेली वीणा कसेबसे दिवस ढकलीत होती. सूनांच्या प्रतापामुळे नातेवाईक, शेजारी, मित्रपरिवार तुटला होता. तो परत जोडणे आता वीणाच्या वाढत्या वयामुळे शक्य नव्हते. एकेकाळी संघर्षमय स्थितीतून आज आर्थिकदृष्ट्या संपन्न  परिस्थितीला पोहचल्यावरही ‘चणे आहेत पण दात नाहीत' अशी गत वीणाची झाली होती. कुणाला सांगायची काही सोय नव्हती. कारण सूनांच्या वर्तणूकीमुळे अनेकांनी त्या घरी जाणे थांबवले होते.

   ही व या प्रकारची अनेक उदाहरणे आजमितीस आपल्या अवतीभवती घडताना दिसून येत आहेत. अनेक व्यवतींनी मोठ्या जिद्दीने विविध संकटांचा सामना करुन आपले संसार फुलवले, अनेकांनी शेजारधर्म जपले, मैत्र सांभाळले, गरीबीत असतानाही नातेवाईकांचा मोठा बारदाना जपला. पै-पाहुण्यांची यथोचित उठबस केली..ती सारी माणसे आज गेली कुठे? पैसा, करिअर, श्रीमंती, स्टेटस, आत्मकेंद्रीतता आज कोणत्या थराला जाऊन पोहचली आहे? मी, माझी मुलंबाळं, माझा पलॅट, माझा टीव्ही, माझी इस्टेट, माझी गाडी  आणि माझ्या घरातून दिसतो तेवढाच भारत अशी मतलबी मानसिकता जोपासण्याचं हे फळ आहे? आपली माणसंही आता नकोशी झालीत?  ‘तळहाताचा पाळणा' करुन नातवंडे सांभाळणारे आजी-आजोबा, भाच्या-पुतण्यांचे लाड-कोडकौतुक करणारे मामा-मामी, काका-काकू त्यांच्या उतारवयात या नातलगांकडून उपेक्षित का बनू लागलेत ? एकटी-दुकटी मुलं जन्माला घालण्याच्या भरात आत्या, मावशी या नातेवाईकच नव्हे, तर जणू संस्थारुपी शक्तींचे जवळपास उच्चाटण झाले आहे की काय? करोनाने लॉकडाऊन काळात एकमेकांकडे जाणेयेणे थांबवायला भाग पाडले होते. संपर्क, सहवास, साथ, सहजीवन यांच्यावरच घाला घातला होता. करोना मंदावला, जवळपास गेलाच; पण तो असले कसले साईड इफेवट्‌स सोडुन गेला?  शिक्षण, करिअर, उज्ज्वल भवितव्याची स्वप्नं ही आता माणसांना एकमेकांपासून तोडु लागलीत...की हे आधीपासूनच सुरु असलेले स्लो पॉयझनिंग होते...ज्याची कटु फळे आता अनुभवायला मिळत आहेत? सगळेच अगदी इतके नकारात्मक, नैराश्य आणणारे, भेसूर, भयाण तापदायकच घडत आहे अशातला भाग नाही. पण जे काही घडताना पाहायला मिळत आहे ते तितके आशादायक, दिलासा देणारे, उतारवयाबद्दल उभारी देणारेही नाही..हेही लक्षात येईल. बघा तुम्ही डोळे उघडे ठेवत विचार करुन! सर्वांना निकोप, निरोगी, हवेहवेसे नातेसंबंध, मैत्रीसंबंध मनापासून जोपासण्यासाठी सदिच्छा व ३ ऑक्टोबर रोजी असणाऱ्या मराठी भाषा अभिजात दर्जा गौरव दिनानिमित्त तसेच लवकरच येणाऱ्या दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. 

--राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक : दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पुस्तक परिक्षण