महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
धम्मचक्र प्रवर्तन दिन
६९ व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा! !१४ ऑक्टोबर १९५६ हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला तो हा अविस्मरणीय दिवस. याच विजयादशमीच्या दिवसी परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखाे अनुयायांसह महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथे बुद्ध धम्म स्वीकारला. १९३५ साली भर सभेतील भाषणात केलेली गगनभेदी हिंदू धर्माचा त्याग करण्याची केलेली घोषणा प्रत्यक्षात आली. इ. स. पू. २६६च्या अश्विन शुद्ध दशमीला सम्राट अशोक राजानेही शांतीप्रिय, विज्ञानवादी बौद्ध धम्म स्वीकारला होता.
सम्राट अशोक यांनी शस्त्रांचा त्याग करून समता आणि शांतीचा मार्ग स्वीकारला. कलिंगच्या युद्धात झालेल्या मानवी संहारामुळे सम्राट अशोक दुःखी झाले. तलवारीच्या सहाय्याने मानवांची हत्या करून विजय मिळवण्यापेक्षा धम्माच्या सहाय्याने लोकांची मने जिंकणे श्रेयस्कर असा विचार करुन त्यांनी तलवार म्यान केली, तो दिवस म्हणजे अशोक विजयादशमीचा दिवस. तेंव्हापासूनच भारतात अशोक विजयादशमीच्या दिवशी दसरा हा उत्सव साजरा केला जातो. कारण त्या दिवशी मैत्री, करुणा, व प्रज्ञेने क्रुरतेवर विजय मिळवला होता. याच कारणाने परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अशोक विजयादशमीचा दिवस आपल्या धम्मदीक्षेसाठी निवडला.
भारतीय व अत्यंत प्राचीन आणि लोप पावत चाललेला बुद्ध धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथील प्रस्थापित व्यवस्थेचा बळी गेलेल्या समाजाला दिला. ही जगातील सर्वात मोठी रक्तविरहित धम्मक्रांती घडवून आणली. त्या नंतर अवघ्या ५३ दिवसांमध्ये बोधिसत्व ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. त्यांना फक्त दोनच बुद्ध धम्म सोहळे त्यांना घेता आले. दुर्दैवाने रेस कोर्स, मुंबईतील नियोजित सोहळा पार पाडण्यासाठी त्यांना आयुष्य लाभले नाही. यामुळे त्यांनी पाहिलेले बौद्धमय भारत करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकले नाही. पण तरीही हा बुद्ध धम्म या ६८ वर्षाच्या काळात मोठ्या प्रमाणात सर्वदूर वाढला व वाढत आहे. आजही या विजयादशमीच्या निमित्ताने लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर एकत्र येऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. हा दिवस म्हणजे बौद्ध धर्मातील नवीन अध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आणि सामाजिक बदलाचे प्रतीक म्हणावे लागेल. बुद्ध धम्म सर्वार्थाने वाढत आहे. बुद्ध धम्मातील अनुयायी सुशिक्षित आहेत, तसेच नोकरवर्ग व शासन व्यवस्थेमध्ये हा समाज मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेला आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील बौद्ध समाजाची लोकसंख्या अंदाजे ७० लाख एवढी वाढली आहे. विशेष म्हणजे यातील धर्मांतर केलेली ९९ % लोकसंख्या आहे. भारतातील हा आकडा फार मोठा आहे.आज इतर धर्मातील काही लोकांना वाटते की, बुद्ध धर्मातील लोकांची प्रगती आरक्षणामुळे झाली आहे. पण हे खरे नाही. कारण त्यांनी बुद्ध धर्माचे अनुसरण केले व शिक्षणाला प्राधान्य दिल्याने ही प्रगती दिसत आहे.. आज जर पाहिले तर ब्राह्मण समाजाएवढे बुद्ध बांधव शिक्षण क्षेत्रासह इतर क्षेत्रातही दिसतात. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक या उच्च पदापासून पंचायत राजचा कणा असलेल्या ग्रामसेवक तलाठी या पदावर बुद्ध धम्मातील अनुयायी दिसतात. ही रातोरात झालेली प्रगती नाही. यासाठी शिक्षणाबरोबर समाजातील रूढी, परंपरा, अंद्धश्रद्धा, देवदेवता इत्यादींना आपल्या आयुष्यातून कायमचे विसर्जित करून विज्ञानावर आधारलेला धम्म आपलासा केल्यामुळे हे शक्य झाले आहे. पण हळूहळू काही या समाजातील लोक दुटप्पीपणा करतांना दिसायला लागले आहेत. संकटाचा सामना न करता पळवाट शोधून आपली जीवनपद्धती बदलू लागले आहेत. हौसेसाठी किंवा मौजमजा करण्यासाठी ते बुद्ध धम्मातील आचारण विसरत चालले आहे. अशाने बुद्ध धम्म वाढायला बाधा येण्याचा धोका ओळखून आचारण करावे एवढी अशा व्यक्त करावी वाटते. आज हे धर्मांतर एवढे ऐतिहासिक ठरलेले आहे. कारण याची नोंद जगातील अनेक देशांमध्ये याची दखल घेतलेली आहे. - डॉ. प्रा. श्रीकृष्ण दि. तुपारे, आ. प्र. वि. महाविद्यालय, नागोठणे