महात्मा गांधीजींचे अलौकिकत्व

  विदेशातून भारतात जे नेते येतात ते गांधी स्मारकाचे दर्शन घेतल्या शिवाय परत जात नाहीत. गांधी तत्त्वज्ञानाचा प्रभाव आजही जगभर विविध रूपांमध्ये दिसतो. आजही जनता व त्यांचे नेते आपले वैयक्तिक व सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी गांधी विचारधारेचा उपयोग करत आंदोलन करतात व आपले प्रश्न सोडवतात.  नेल्सन मंडेला, मार्टिन ल्युथर किंग, बराक ओबामा, दलाई लामा यासारख्या अनेक जगमान्य नेत्यांनी गांधी विचारधारेचा प्रभाव फक्त मान्यच केला नाही तर तो जीवनात अंगीकारलेला सुद्धा दिसून येतो.

         गांधीजी इतरांना काही सांगतांना आधी ते स्वतः त्याचं आचरण करीत मगच सांगत. म्हणूनच ते म्हणत ‘माझं जीवन हाच माझा संदेश'. एकदा त्यांच्या आश्रमातील एक महिला त्यांच्याकडे तिच्या मुलाची अती गुळ खाण्याबद्दलची तक्रार घेऊन येते. ती गांधीजींना म्हणते तुम्ही याला सांगा गुळ खाऊ नको. गांधीजी तिला तीन महिन्यांनी यायला सांगतात. ती आग्रह करते, पण गांधीजी पुन्हा तिला सांगतात तीन महिन्यांनी ये. शेवटी ती तीन महिन्यांनी परत मुलाला घेऊन येते. तेव्हा गांधीजी त्याला गुळ न खाण्याबद्दल समजावून सांगतात. तो गांधीजींना आश्वासन देतो, की मी गुळ खाणार नाही. तेव्हा ती महिला गांधीजींना म्हणते, "बघा मी म्हणत होते ना, तुम्ही याला सांगा तो तुमच ऐकेल” त्यावर गांधीजी तिला म्हणतात... "त्यावेळी मी स्वतः सुद्धा गुळ जास्त खात होतो. गेल्या तीन महिन्यापासून मी स्वतः गुळ खाणे बंद केले आणि मग मी त्याला सांगू शकलो”.

          दुसरे एक उदाहरण द्यावेसे वाटते. जालियनवाला बाग हत्याकांडात मरण पावलेल्या शेकडो हुतात्म्यांचे स्मारक जनतेच्या पैशांनी व्हावे अशी इच्छा गांधीजींनी व्यक्त केली. धन संकलनासाठी एक कार्यक्रम आयोजित केला गेला. त्या कार्यक्रमात अनेकांनी मोठ-मोठी भाषणे केली; पण पैसे देण्याबद्दल कोणीच बोलत नव्हतं. सगळ्यात शेवटचं भाषण गांधीजींचं होतं. गांधीजी उभे राहिले आणि एकच वाक्य बोलले. स्मारकाच्या उभारणीसाठी तुम्ही पैसे देणार नसाल तर मी साबरमती आश्रमाचा लिलाव करून हे स्मारक बांधेल”. त्यांच्या या वाक्याने प्रेरित होऊन स्मारकासाठी लागणारे पैसे तात्काळ उभे राहिले.

            भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधी हे देशातील सर्वात लोकप्रिय नेते होते. ते सहज पंतप्रधान होऊ शकले असते. पण स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ते नौआखालीत हिंदू-मुस्लिम दंगे शांत करण्यात व्यस्त होते. स्वातंत्र्याचा जो उत्सव दिल्लीत व देशात सुरू होता, त्यात ते सहभागी नव्हते. आज अशी मिळणारी सत्ता किती नेते सोडू शकतील? हाच एक विचार ते महात्मा का आहेत हे सांगून जातो. त्यांच्यासोबतचे सर्वच नेते स्वयंप्रकाशित होते. या सर्वच महापुरुषांनी गांधीजींचे नेतृत्व स्वीकारले व मान्य केले.

 गांधीजींनाही  त्यांच्यामुळे आपली लोकप्रियता कमी होईल अशी भीती वाटली नाही; किंबहुना त्यांनी त्यांना कधी मागे ओढण्याचा प्रयत्नही केला नाही. स्वातंत्र्य चळवळीसाठीगांधीजींचे योगदान या महापुरुषांनी ओळखले. म्हणूनच नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्यांना ‘राष्ट्रपिता' संबोधले, तर गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना ‘महात्मा' या उपाधीने अलंकृत केले.

                १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटाचे निर्माते रिचर्ड ॲटनबरो यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. जगात अनेक देशात क्रांती होऊन ते देश स्वतंत्र झालेत. क्रांतीनंतर तिथेही प्रजासत्ताक सत्ता स्थापन झाली. ती क्रांती करणारे सुद्धा महान नेते होते. जॉर्ज वॉशिंग्टन, लेनिन यासारखी जागतिक प्रभाव असणारी अनेकांची नावे सांगता येतील पण तुम्हीं महात्मा गांधीं वरच चित्रपट का केला? तेव्हा त्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, "जगात अनेक देशांमध्ये झालेल्या क्रांती या सशस्त्र मार्गाने झालेल्या आहेत व त्या नेत्यांनी क्रांती करण्यासाठी शस्त्राचाच वापर केला. पण त्या सर्वांमध्ये महात्मा गांधीच ही एकमेव व्यक्ती अशी होती की ज्या व्यक्तीने शस्त्राचा वापर न करता अहिंसेच्या मार्गाने क्रांती घडवून आणली. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण ते स्वतः सत्ताधीश झाले नाहीत. जगात हे फक्त याच माणसाबद्दल घडून आलेले दिसते. इतकी निरपेक्ष भावना असणारा नेता जगाच्या पाठीवर शोधूनही सापडणार नाही.” अखंड खंडप्राय देश त्यांच्या नेतृत्वाखाली ते सांगतील तसा वागत होता. गांधीजी हे एक असं व्यक्तिमत्व होतं की त्यांनी जनतेला आवाहन केल्यावर जनता रस्त्यावर उतरत होती. ते जनतेला तुरुंगात जायला सांगतात तेव्हा जनता तुरुंगात जायला तयार होते आणि चले जाव आंदोलनात करेंगे या मरेंगेची हाक दिल्यावर तीच जनता स्वातंत्र्यासाठी फासावर जायला सुद्धा तयार होते. गांधीजींचे असे अनोखे आगळवेगळे व्यक्तिमत्व होते की जे भविष्यात कित्येक शतके अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत व दिशादर्शक ठरतील यात शंका नाही.

-प्रा. श्री प्रशांत पुंडलिक शिरुडे, के. रा. कोतकर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय डोंबिवली 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

दसरा सण मोठा...