दसरा सण मोठा...

उत्सव आहे विजयाचा
दिवस आहे सोने लुटण्याचा
दसरा सण आहे हसरा
फक्त आनंद वाटण्याचा

हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दसरा होय. या सणाचे खूप महत्त्व आहे. हा सण अश्विन शुद्ध दशमीला येतो. अश्विन महिन्याच्या प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्र असते त्यानंतर दहावा दिवस म्हणजे दसरा. या सणास विजयादशमी पण म्हटले जाते. या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करतात. या दिवशी घोड्याला सजवतात व गावाच्या सीमेबाहेर रपेट करून येतात यालाच सीमोल्लंघन असे म्हणतात.

भारतामध्ये विजयादशमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. सगळे लोक दसऱ्याच्या दिवसाला खूप पवित्र आणि शुभ मानतात. दसरा हा वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक आहे. नऊ दिवस चाललेल्या नवरात्रीच्या उत्सवाचा समाप्तीचा दिवस म्हणजे दसरा. या दिवशी प्रभू रामचंद्राने रावणाचा वध करून अयोध्येला परतल्यावर आनंदोत्सव साजरा केला. देवी दुर्गेने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध करून देवीचा विजय साजरा केला. या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते.

दसऱ्याला आपट्याची पाने सोने म्हणून वाटण्याची महाराष्ट्रात पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. ज्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे. ही पाने वाटून लोकांना समृद्धी आणि कल्याणाचा आशीर्वाद दिला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे मोहिमेवर जाऊन धनसंपदा लुटून आणत असत. या प्रथेमागे कौत्स्य ऋषी आणि गुरुदक्षिणेच्या कथेचा संदर्भ देखील आहे. जिथे एका विद्वानाला आर्थिक मदत करण्यासाठी आपट्याच्या पानांचे सोन्यात रूपांतर केले होते. आपट्याची पाने एकमेकांना देऊन त्यांचे आयुष्य सोन्यासारखे समृद्ध व्हावे अशी त्यामागची भावना आहे.

दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. विशेष म्हणजे या सणात चतुर्वर्ण एकत्र आलेले दिसून येते. म्हणजेच ब्राह्मणांचे सरस्वती पूजन विद्यारंभ, क्षत्रियांचे शस्त्रपूजन सीमोल्लंघन, वैश्यांची शेती हे सर्व एकत्रितपणे येतात. दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा केली जाते, जी समृद्धी आणि यशाचे प्रतीक मानली जाते. तसेच नवीन व्यवसायाला सुरुवात केली जाते. हा सण सामाजिक तसेच वैयक्तिक जीवनातील चांगल्या बदलांचे प्रतीक मानला जातो. वाईटाचे प्रतीक असलेला रावणाचा मोठा पुतळा तयार करून आणि वाईटाचा चांगल्यावर विजय साजरा करण्यासाठी रावणदहन केले जाते.

आपट्याची पाने हे सोन्याचे प्रतीक असल्यामुळे संपत्ती, ज्ञान, भक्तीची वाढ होते. तसेच प्रभू रामचंद्र विजय मिळवून परत अयोध्येत आले तेव्हा लोकांनी आपट्याच्या पानांचा वर्षाव केला होता. ही पाने आपल्याला इष्ट देवांचे दर्शन घडवून आणतात. आणि शत्रूंचा विनाश करतात अशी श्रद्धा आहे. ही पाने एकमेकांना दिल्याने समाजात एकता आणि बंधुभाव वाढतो. दसऱ्याच्या दिवशी श्री महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली यांची पूजा केली जाते. म्हणजेच धनाची, ज्ञानाची आणि भक्तीची पूजा केली जाते. धनाची पूजा म्हणजे माता लक्ष्मीची, ज्ञानाची पूजा म्हणजे वही, पाटी, पुस्तके, यंत्र इत्यादी आणि शक्तीची पूजा म्हणजे शस्त्रास्त्राचे पूजन म्हणजे महाकालीची पूजा करतात. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या घटातील उगवलेले धान्याचे रोप हे धन मानतात. काही महिला ते केसात माळतात. तसेच घराला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावले जाते. तसेच शेतकऱ्यांकडे नवीन पीक घरी आलेले असल्यामुळे त्याची पूजा करतात. अधर्माकडून धर्माकडे विजय मिळवणारा आनंदाचा दिवस म्हणजे दसरा अशा रीतीने साजरा केला जातो.

दुःख सारे विसरून
प्रत्येक क्षण करु हसरा
रोजचा दिवस फुलेल
होळीला सुंदर आनंदाचा दसरा
-लीना बल्लाळ 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 गडावरचा नवरात्रौत्सव