महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
आडिवरेची कुलस्वामिनी श्री महाकाली
कोकणातील सिंधू सागराजवळ कातळाच्या चढ-उतारावर राजापूर पासून पश्चिमेकडे सुमारे २६ कि. मी.वर आडिवरे हे गाव आहे. ता.राजापूर व जि .रत्नागिरी़ .राजापूर- रत्नागिरी या सागरी किनारी मार्गावरील आडिवरे हे छोटेसे गाव असले तरी ऐतिहासिक व पौराणिक दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे. एसटी थांब्याजवळच पुरातन दगडी कौलारू व भरपूर प्रांगण असलेले, उत्तर व पश्चिम द्वार असलेले कुलस्वामिनी महाकालीचे मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे.
या देवालयाची जमीन फरसबंदी व आवाराची तटबंदी रेखीव व चिरेबंदी आहे. मध्यवस्तीत असलेली व दोन एकराच्या वास्तुत स्थिरावलेली ही पुरातन देखणी वास्तू म्हणजे बाहेरून काही कौलारू घरे एकत्र असलेली वस्ती वाटते, पण प्रत्यक्षात तेथे वेगवेगळ्या देवतांची मंदिरे आहेत. समोरच्या दोन बाजूस असलेल्या दगडी दीपमाळा मंदिराची शोभा वाढवतात.
मंदिर स्वरूप : सुमारे १२०० वर्षापुर्वी आद्य शंकराचार्यांनी महालक्ष्मीची स्थापना केली ,त्यानंतर महासरस्वती व महाकाली स्थापन केल्याचे कळते. सर्वात शेवटी रवळनाथाची स्थापना झाली. या देवीस कौल लावले जातात. मंदिराच्या गुरूवा शी त्या कामी मदत होते. सोम, मंगळ, अमावस्या, पौर्णिमा संक्रांतीचे तीन दिवस, होळीचे पंधरा दिवस, कौल लावले जात नसल्याचे कळते. पण नवरात्र, अंगारकी चतुर्थी, माघी चतुर्थी, शुद्ध एकादशी या दिवशी कौल चढविले जातात. भक्ताना काही देवीकडे विचारायचे असल्यास गुरुवातर्फे कौल मागतात. कौलद्वारे इच्छापूर्ती झाल्यास पुजारी मार्फत निगडीचे पानासह परत देवीसमोर कौल पूर्ती केली जाते. कौलसंबंधी भक्तांची भयंकर श्रद्धा असते. नवरात्रात प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नवचंडी होम केले जातात. देवस्थानच्या आवारातच कायमस्वरूपी भव्य रंगमंच आहे. मंदिराच्या पश्चिमेकडील द्वारी देवस्थान कार्यालय व भक्तांसाठी वास्तव्य करण्यासाठी खोल्या आहेत. तेथे नाममात्र दरात राहण्याची सोय होऊ शकते.
मंदिर इतिहास : शिलाहार राजवंशापासून या देवस्थानला इतिहास आहे. इ.स. .१११३-११९३ त्यावेळी दिलेल्या दान पत्रात अटवीरेचा अपभ्रंश आडीवरेचा उल्लेख आहे. पुढे अपभ्रंशाने अटवीरचे नाव आडिवरे झाले असावे. वास्तुच्या मधोमध असलेली प्रमुख श्री महाकालीची चतुर्भुज मूर्ती काळ्या दगडाची दक्षिणाभिमुखी आहे . प्रत्येक पौर्णिमा-अमावस्येला नारळाचे दूध व तेलाने देवीला माखन करून गरम पाण्याने स्नान घातले जाते.
आख्यायिका : आडिवरे पासून २ किमी.अंतरावर समुद्रकिनारी वेत्ये नावाची वाडी आहे. तेथे राहणाऱ्या जाधव नावाच्या भक्ताच्या स्वप्नात देवी आली. येथे व्यवस्था करण्यास सांगितले. दृष्टांतानुसार जाधव यांना बाडल येथे महाकालीची मूर्ती सापडली. त्यावेळी आदिवरे गावडे घराण्याच्या ताब्यात असल्याने जाधव यांनी देवीची गोष्ट तावडे यांना सांगितली. तावडे यांनी सध्या असलेल्या जागेवर म्हणजे वाडा पेठ येथे रीतसर देवीची प्रतिस्थापना केली.
ऐतिहासिक महत्व : पन्हाळगडच्या वेढ्यात शत्रूला तोफा पुरवणा-या इंग्रजांना कायमची जरब बसावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आडीवर-याच्या महाकालीचे दर्शन घेतले असा उल्लेख सापडतो. त्याचप्रमाणे आर्ग्याचा सवतासुभा नष्ट करण्यासाठी विठगवणे येथील देसाई यांच्या देसाईच्या मदतीने सरदार घुलप यानी विजयदुर्ग काबीज केला. त्या आनंद प्रसंगी घोलप यांनी देवीला सुवर्णाचे मुखवटे अर्पण केल्याचे समजते .त्याचप्रमाणे १९८४ साली कोकण दौऱ्याच्या वेळी शृंगेरी पीठाचे शंकराचार्य श्री भारतीनाथ यांनी आडिवरे येथील शक्तीपीठात स्वहस्ते पूजा केली. पुण्यातील काही भक्तांनी बारा किलो चांदीची असलेली मोराच्या आकाराची पालखी देवीस अर्पण केली. पूर्वी देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी १४ वाड्यांचा १४ खोतांचे एक मंडळ होते. आता ही मंडळी विश्वस्त आहेत.
जावे कसे ? आडीव-यास बस मार्गाने दोन प्रकारे जाता येते. मुंबई गोवा रस्त्यावर एन एच १७ राजापुर येथून पश्चिमेकडील फाट्याने २६ की.मी.अंतरावर आडिवरे गाव आहे. हल्ली पूर्णगड- गावखडी पुलाने जोडलेले असल्याने रत्नागिरी-पावस-पुर्णगडगावखडी-आडिवरे ५० की.मी़ समुद्रकिनाऱ्याने जाणारी बस सेवा आहे. ठराविक वेळा पाहून प्रवासाचा कार्यक्रम आखावा. स्वतःचे खाजगी वाहन असेल तर उत्तमच. त्यावेळी आसपासची ठिकाणे सोयीने पाहता येतात. - रामकृष्ण विनायक अभ्यंकर