दुर्गेचे नववं रूपः सिद्धिदात्री माता देवी

दुर्गा कवच
प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम्‌।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीतिच।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम्‌।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः

शारदीय नवरात्रात प्रत्येक दिवसाचे महत्व आहे.अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या नऊ तिथीची नऊ देवतांची नऊ रूपं  आहेत. मानवी शरीरात सहाचक्र आहेत त्या प्रत्येक चक्राशी संबधित अशी देवता आहे. मानवी शरीरातील हे चक्र दिव्य शक्ती आहे. ती शरीरात, चैतन्य, उर्जा निर्माण करते. ह्या चक्राच्या साधनेने अध्यात्मिक उर्ध्वगती प्राप्त होते.

दुर्गा आणि महिषासुर यांच्यात झालेल्या नऊ दिवसाच्या युद्धाशी नवरात्र सण संबंधित आहे. शैलपूत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा. स्कंदमाता,कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री अशा नऊ देवी अवतारांनानवदुर्गा असे म्हणतात. नवरात्राच्या नऊ रात्री तीन भागात विभागल्या आहेत पहिले तीन दिवस दुर्गेचे, पुढचे तीन दिवस लक्ष्मीचे आणि शेवटचे तीन दिवस सरस्वतीचे मानले आहेत. या देवता अनुक्रमे धैर्य, संपत्ती आणि ज्ञान या दैवीशक्तीचे प्रतिनिधित्व करतात.

सिद्धिदात्री  माता देवी महादेवीच्या नवदुर्गा (नऊ रूपे) देवीपैकी नववी देवी आहे. तिच्या नावातच  ‘सिद्धी' म्हणजे अलौकिक शक्ती आणि  ‘दात्री' म्हणजे दाता किवां देणारी. अलौकिक शक्ती प्रदान करणारी देवी. या देवीचे स्थान सहस्त्रार चक्राच्या बारा इंच वरती तेजःपुंज तेजोवलयात आहे.

वैदिक शास्त्रानुसार भगवान शिवाने ‘सिद्धीदात्री' देवीची उपासना करून  सर्व सिद्धी प्राप्त केल्या.

सिद्धिधात्री देवी ‘पार्वती'देवी'चे मूळ रूप किंवा आदिम रूप आहे. सिद्धिदात्री देवीकडे अणिमा, महिमा, गरिमा, लघिमा, प्राप्ती, प्राकांब्य, इशित्व आणि वशित्व नावाच्या आठ अलौकिक शक्ती किंवा सिद्धी आहेत. ‘अनिमा' म्हणजे एखाद्याचे शरीर अणूच्या आकारात कमी करणे; ‘महिमा' म्हणजे एखाद्याच्या शरीराचा अनंत आकारात विस्तार करणे; ‘गरिमा' म्हणजे अनंत जड होणे; ‘लघिमा' म्हणजे वजनरहित होणे; ‘प्राप्ती' म्हणजे सर्वव्यापी असणे; ‘प्राकांब्य' म्हणजे एखादी इच्छा साध्य करणे; ‘इशित्व' म्हणजे निरपेक्ष प्रभुत्व असणे; आणि ‘वशित्व' म्हणजे वश करण्याची शक्ती. भगवान शिवाला ‘सिद्धिदात्री' देवीने आठही शक्ती देऊन वरदान दिले. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी 'सिद्धिदात्री'ची आहे. त्यामुळे त्यांना ‘अर्धनारीश्वर' या नावानेही ओळखले जाते.

सिद्धीदात्री देवी  चतुर्भुज आहे. देवीने चार हातांनी चक्र (चकती), शंख (शंख), गदा आणि कमळ धारण केलेले आहे. ही देवी अज्ञान दूर करते आणि ती ब्रह्म जाणण्यासाठी ज्ञान प्रदान करते. सिद्ध, गंधर्व,यक्ष,देव (देव) आणि असुर (राक्षस) तिची पूजा करतात. तिचे वाहन सिंह आहे .कमळावर ही देवी आसनस्थ आहे. संपूर्ण सृष्टीवर,ब्रह्मांडावर तिचे सामर्थ्य आहे.

‘सिद्धिदात्री' देवी शतावरी वनस्पतीची संबंधित आहे. शतावरी वनस्पती ही दिव्य औषधी आरोग्यासाठी शेकडो फायदे देणारी वनस्पती आहे. स्मरणशक्ती वाढवणारी आहे.  शरीरातील कफ, पित्त, वात यांचे संतुलन करून प्रतिकार शक्ती वाढविणारी तसेच बालपणापासून वृद्धावस्थे पर्यंत सर्व विकारांवर शतावरी वरदान आहे. सिद्धीदात्री देवीला प्रसाद म्हणून तिळापासून बनवलेले पदार्थ नेवैद्य म्हणून  दाखवतात. - सौ. पूर्णिमा आनंद शेंडे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

 विजयादशमी : सीमोल्लंघन,शमीपूजन, अपराजितापूजन व शस्त्रपूजनही