आकाशातून अवतरलेला देवदूत!  अर्थात प्राणरक्षक भारतीय सेना!

ट्रॉलीमधील प्रवासी कसेबसे एका कोप-यात मिळेल त्या आधाराला घट्ट धरून मृत्यूच्या भयाण चेह-याकडे केविलवाण्या नजरेने बघत तर कधी डोळे करकचून घट्ट मिटून बसलेले. चार वर्षाच्या बालकाने तर आयुष्य अजून पुरते पाहिलेलेही नव्हते! आणि आता ते त्याला पाहायला मिळण्याची शक्यता अगदीच धूसर! डोंगरावरल्या केबलचालकांची भितीने गाळण उडालेली...वॉकीटॉकी सेटच्या बॅटरीज संपत आलेल्या..मदतीसाठी संपर्क साधणे दुरापास्त झालेले! पण त्यादिवशी देवदूतांनी यमदूतांशी उभा दावा मांडला...हे देवदूत होते भारतीय पायदळ आणि भारतीय वायूसेनेमधले मृत्यूंजय सैनिक!

    अवघ्या पाच दिवसापूर्वी जन्मलेल्या आपल्या लेकाच्या कपाळाचं दीर्घ चुंबन घेऊन आणि ओली बाळंतीण असलेल्या आपल्या पत्नीला घट्ट आलिंगण देऊन, खरेतर सुट्टीवर आलेले गोवा निवासी मेजर इवान जोसेफ क्रेस्टो, सुट्टी अर्धवट सोडून श्रीलंकेत लढणा-या आपल्या शांतिसेनेमधल्या सहकार्यांच्या मदतीला धावून गेले होते. श्रीलंकेत भारताने तिथल्या सिंहली-तमिळ संघर्षात मध्यस्थी करण्यासाठी भारतीय शांति सेना पाठवली होती. यात  लढणा-या मेजर जोसेफ यांच्या युनिटमधील अनेक सहकारी हुतात्मा झाल्याने, इतर साथीदारांच्या मदतीला जाण्यास मेजरसाहेबांनी सर्वोच्च प्राधान्य दिले होते!  

   हा देखणा नवजवान खरे तर वकील व्हायचा, परंतू भारतीय नौसेनेमध्ये अधिकारी असलेल्या त्याच्या डॅडींनी त्याला त्याच्या थोरल्या भावापाठोपाठ राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (नॅशनल डिफेन्स अकॅडमी-एन.डी.ए.खडकवासला,पुणे) मध्ये प्रवेश घ्यायला प्रेरित केले आणि भारतीय सेनेला एक अष्टपैलू हिरा मिळाला! कमिशन्ड ऑफिसर म्हणून साहेब फर्स्ट पॅराशूट रेजिमेंट(कमांडो) मध्ये दाखल झाले, तिथल्या सर्व अभ्यासक्रमात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होताना साहेबांनी बेस्ट यंग ऑफिसर म्हणून पारितोषिक पटकावले! अनुभवी कॉम्बॅट फ्री-फॉलर (विमानातून उडी घेऊन जमिनीवर उतरून लढणारा लढवय्या) म्हणून साहेब प्रसिद्ध झाले. रशियामध्ये जाऊन अतिविशेष प्रशिक्षण प्राप्त केलेल्या जोसेफसाहेबांनी राष्ट्रीय स्काय-डायविंग अजिंक्यपद स्पर्धेत चमक दाखवली.अफ्रिकेतील टांझानिया येथे प्रशिक्षक म्हणून सेवा देण्याची आंतरराष्ट्रीय संधीही त्यांना मिळाली.

आफ्रिका,युरोप, कॅनडा,अमेरिका येथे जाऊनही त्यांनी आपल्या क्षेत्रातील अत्युच्च ज्ञान मिळवले. डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजमधील अभ्यासक्रम पुरा करून साहेब मिलिटरी ऑपरेशन्स डिरेक्टोरेट मध्ये रूजू झाले आणि नंतर त्यांनी २१ पॅरा (स्पेशल फोर्सेस)ची कमान हाती घेतली. कारगिल संघर्षात कारगिल मधील सर्वच सर्व सेक्टर्समध्ये साहेबांच्या युनिटने अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. साहेबांना नॉर्थ-ईस्ट मधील घुसखोरी विरोधी अभियान, कश्मिर खो-यातील अतिरेकी विरोधी कारवायांचा खूप अनुभव होताच. अशा या पक्क्या सैनिक-अधिका-याच्या हातून एक थरारक आणि एकमेवाद्वितीय रेस्क्यू मिशन पार पडायचे होते....या मिशन मध्ये आर्मी आणि एअरफोर्स या दोन्ही शक्तींना आपली ताकद,परस्पर समन्वय क्षमता आणि मृत्यूलाही चकवा देण्याची जिगर दाखवण्याची संधी मिळणार होती...!

   देखण्या हिमाचल प्रदेशातील पारवानू येथील शिवालिक पर्वतारांगांतले टिंबर ट्रेल रिसॉर्ट पर्यटकांचे पसंतीचे स्थळ. केबलच्या साहाय्याने खेचल्या जाणा-या केबल-कार मध्ये बसून दोन हजार फूट ते पाच हजार फूट उंचीवरून वेगाने पावणे तीन किलोमीटर प्रवासाचा अनुभव देणारी राईड हा तर केवळ रोमांचकारी अनुभव!

    १३ ऑक्टोबर,१९९२. अशाच एका केबल कार-ट्रॉली मध्ये सुमारे अकरा प्रवासी स्वार झालेले..त्यात चार वर्षांचे एक बालक, आणि पाच विवाहित युगुलं होती. पलीकडच्या डोंगरमाथ्यावर पोहोचण्यास काही फूट अंतर राहिलेले...आणि एवढ्यात कारची एक केबल मोठा आवाज करीत तुटली...आणि ही केबलकार उर्वरीत केबलवरून मागे मागे सरकू लागली...कार ऑपरेटरने जीवाच्या भीतीने उडी मारली खरी पण तो बिचारा खडकावर आपटून दरीत कोसळला. ट्रॉली अतिवेगाने मागे घसरली,तिची चाके उलट्या म्हणजे आकाशाच्या दिशेला झाली आणि कानाचे पडदे खरवडून काढणारा आवाज करीत ती दरीच्या मध्यावर येऊन हवेत लटकत थांबली.....ट्रॉलीपासून जमिनीचे अंतर तेराशे फूट..खाली कौशल्या नदीचा प्रवाह उत्साहाने खळाळतो आहे...अकरा जीवांचा जीवनप्रवाह आता कायमचा सुकणार! खाली कोसळल्यास मृत्यू ठरलेला...यमदूत बहुदा आधीच दरीत येऊन थांबलेले असावेत...आता फक्त यमराजांच्या आदेशाची प्रतिक्षा! सूर्य माथ्यावर येऊन पुढे निघला होता पण त्याची पावले आता मंदावली होती.

   ट्रॉलीमधील प्रवासी कसेबसे एका कोप-यात मिळेल त्या आधाराला घट्ट धरून मृत्यूच्या भयाण चेह-याकडे केविलवाण्या नजरेने बघत तर कधी डोळे करकचून घट्ट मिटून बसलेले. चार वर्षाच्या बालकाने तर आयुष्य अजून पुरते पाहिलेलेही नव्हते! आणि आता ते त्याला पाहायला मिळण्याची शक्यता अगदीच धूसर! डोंगरावरल्या केबलचालकांची भितीने गाळण उडालेली...वॉकीटॉकी सेटच्या बॅटरीज संपत आलेल्या..मदतीसाठी संपर्क साधणे दुरापास्त झालेले! पण त्यादिवशी देवदूतांनी यमदूतांशी उभा दावा मांडला...हे देवदूत होते भारतीय पायदळ आणि भारतीय वायूसेनेमधले मृत्यूंजय सैनिक! यांची प्रत्येक कृती म्हणजे महामृत्यूंजय मंत्राचे एक एक आवर्तनच जणू!

    सायंकाळी उशीरा सैन्यदलाला ही खबर मिळाली आणि काही मिनिटांतच मेजर इवान जोसेफ क्रॅस्टो यांच्या नेतृत्वात हिमाचल मधील नहान येथे असलेल्या फर्स्ट पॅरा कमांडोजची एक तुकडी आणि उत्तरप्रदेशातील सरसवा येथे तैनात असलेल्या हेलिकॉप्टर युनिटमधील हेलिकॉप्टर्स मोहिमेवर निघाली सुद्धा! चंडीमंदिर येथे कार्यरत असलेल्या आर्मी इंजिनीयर्सच्या युनिटने तोपर्यंत घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा अंदाज घेण्याचे काम सुरूही केले होते.

   १४ ऑक्टोबर! मुख्य हेलिकॉप्टरचे सारथ्य ग्रुप कॅप्टन फली एच.मेजर करीत होते. (पुढे हे आडनावाने मेजर असलेले साहेब वायूसेनेचे प्रमुख होऊन निवृत्त झाले) सर्व टीमने घटनास्थळाचे,त्या ट्रॉलीचे काळजीपूर्वक हवाई- निरीक्षण केले. ती ट्रॉली थोडीशी जरी मागे खेचण्याचा प्रयत्न केला तर, तिची चाके एकदम नादुरूस्त झाल्याने, खाली दरीत कोसळण्याची शंभर टक्के शक्यता दिसली. हेलिकॉप्टर जमिनीवर येताच मेजर क्रेस्टो साहेब आणि ग्रुप कॅप्टन फली साहेब यांनी एक धाडसी योजना आखली!   मेजर क्रेस्टो साहेब हेलिकॉप्टर मधून दोरीच्या साहाय्याने ट्रॉलीच्या टपावर उतरतील..टपावरी इमर्जनसी झडप उघडून ट्रॉलीतील एका एका प्रवाशाला वर खेचतील आणि त्याला दोरी बांधलेल्या खुर्चीत बसवून हेलिकॉप्टरमध्ये खेचून घेतले जाईल....किती सोपे वाटते ना हे वाचायला?

   पण वेगवान वारे,थंडी,भयावह उंची, घाबरलेले प्रवासी, हे नाट्य पहात असलेला लोकांचा समुह, त्यावेळच्या प्रसिद्धी माध्यमांचे कॅमेरे, सरत चाललेला दिवसाचा उजेड याचा उल्लेख करायलाच हवा! यात सैनिकांच्या मनातील भीतीचा उल्लेख नाही. कारण ती मूळातच नसते! मात्र या धाडसात जिवितहानी होण्याची शक्यता खूप म्हणजे खूप जास्त होती!

 हेलिकॉप्टर हवेत झेपावले...ग्रुप कॅप्टन फली मेजर साहेबांनी आपले उड्डाण-कौशल्य आणि आपले प्रदीर्घ प्रशिक्षण आणि अनुभव पणाला लावला. वा-याशी झुंजत हेलिकॉप्टर ट्रॉलीच्या वर स्थिर करण्यात आले! मेजर क्रेस्टो साहेबांना दोरीने खाली सोडण्यात आले. दोरी वर ओढून घेण्यात आली. ट्रॉली हेलकावे खाते आहे. जराशी लापरवाही म्हणजे क्रेस्टो साहेब खाली कोसळतील अशी स्थिती. क्रेस्टो साहेबांचे Buddy (बडी) म्हणजे साहाय्यक कमांडो हवालदार कृष्णन कुमार हेलिकॉप्टरमध्ये दोरीवर बांधल्या गेलेल्या प्रवाशाला वर घेण्यासाठी आणि वैमानिकाला त्यानुसार सुचना देण्यासाठी बसलेले, सोबत आणखी एक कमांडो नाईक जोगा सिंग आहेत....क्रेस्टोसाहेबांना बदली म्हणून. सैन्य कोणतीही शक्यता नाकारत नाही आणि शक्यतेला तोंड देण्याच्या शंभर टक्के तयारीत असते!

ट्रॉलीच्या ग्रीसने माखलेल्या घसरड्या छतावर क्रेस्टो साहेब अलगद उतरले. हेलिकॉप्टरच्या पंख्यांमुळे निर्माण झालेल्या हवेच्या झोताने आधीच हलत असलेली ट्रॉली हेलकावे खात आहे. साहेबांनी कसेबसे छताच्या कडांना हातांनी धरून ठेवले आहे. कडा ग्रीसने माखलेल्या आहेत...हात कधीही निसटू शकतो..खाली दरी! साहेबांनी ट्रॉलीच्या छताची एक्सेप हॅच उघडली. आतले जीव प्राण कंठाशी आणून आत एका कोप-यात बसलेले! साहेबांनी त्यांना धीराचे शब्द सांगितले...योजना समजावून सांगितली. त्या लोकांना जीव वाचवण्यासाठी सर्व मान्य होते! कमांडो कृष्णन कुमार यांनी खुर्ची-दोर खाली सोडला...वा-याच्या झोताने दोर केबलला गुंडाळला गेला...आता सर्वच धोकादायक स्थितीत  आले...ट्रॉली तर कोसळणारच होती आणि हेलिकॉप्टरही! बहाद्दर कुमार यांनी धोका पत्करून पुढे लटकून तो दोर केबल मधून सोडवला...संकट टळले होते..हेलिकॉप्टर जीवाच्या आकांताने स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होते...हेलिकॉप्टरही आता सैनिकाच्या भूमिकेत होते!

  क्रेस्टो साहेबांनी एकेका प्रवाशाला वर खेचून घेतले,त्याला दोराने बांधले आणि पायलटसाहेबांनी दोरी खेचून त्याला हेलिकॉप्टरमध्ये घेतले....आणि त्याला जमिनीवर सुखरूप उतरवून देऊन पुन्हा ट्रॉलीकडे उड्डाण केले... या येण्या-जाण्याला सॉर्टी म्हणतात. चार प्रौढ आणि एका बालकाची सुटका झाली! आणि अंधार पडला!

  हेलिकॉप्टरला परतावे लागणार...क्रेस्टो साहेब म्हणाले मी थांबतो ट्रॉलीमध्ये प्रवाशांसोबत..तुम्ही उजाडल्यावर या! साहेब ट्रॉलीमध्ये उतरले! हा दुसरा दिवस होता बरं! प्रवाशांना ट्रॉलीमध्येच देहधर्म उरकावा लागला होता..त्याचा उग्र दर्प ट्रॉलीत पसरलेला! तरीही साहेब तिथे रात्रभर थांबले..डोळे उघडे ठेवून! प्रवाशांशी बोलत,त्यांना धीर देत-देत आणि खरं वाटणार नाही पण...गाणी म्हणत! त्या रात्री ता-यांनीही क्रेस्टो साहेबांचे गाणे धडधडत्या काळजांनी ऐकले असेल! त्या माणसांना तर साक्षात आभाळातील देवच आभाळातच भेटला होता. त्यांनीही संयमाचे दर्शन घडवले... पायलट आणि कमांडोंच्या पापण्या मिटल्या होत्या रात्री पण त्यात झोप नव्हती, कर्तव्य दाटले होते! पाच जीव आणि जीवापेक्षा मौल्यवान क्रेस्टो साहेब वर लटकत्या कबरीमध्ये होते! रात्रीच्या भयाण वा-याने ट्रॉलीला माफ नव्हते केले..पण सर्वांची पुण्याई...ट्रॉली हेलकावे खात पण टिकून राहिली...तिच्यासोबत आता सहा जीव हेलकावे खात होते...त्यातील क्रेस्टो साहेबांची मृत्यूशी खास सलगी होती...ते एखाद्या योगी पुरूषासारखे शांत होते!

   १५ ऑक्टोबर! एकदाचे उजाडले....हेलिकॉप्टर परत आले!

फली साहेब त्याच सफाईदारपणे सारथ्य करत होते..कालचा अनुभव होताच..कमांडो दोर खेचत होते..क्रेस्टो साहेब प्रवाशांना एक-एक करून बांधून हेलिकॉप्टरमध्ये पाठवत होते...माणूस आणि यंत्र यांमध्ये आणि माणसांमध्ये अचूक परस्पर समन्वय होता...चुकीला जागाच नव्हती! भारतीय सेना आणि वायूसेना यांची प्रतिष्ठाही पणाला लागलेली होती..हाती घेतलेले ऑपरेशन अयशस्वी होऊन चालणार नव्हते..आणि तशी शक्यताही नव्हती! सर्व प्रवासी जमिनीच्या सुरक्षित पटलावर उतरले! ग्रुप कॅप्टन फली साहेबांनी आता अंतिम सॉर्टी सुरू केली...ट्रॉलीवर शेवटी राहिलेल्या क्रेस्टो साहेबांना खाली आणायचे होते...मेजर इवान जोसेफ क्रेस्टो नावाचा देवदूत यमदूतांकडे थेट पहात पहात म्हणाला This is The Indian Army and The Indian Air Force!

Mission Accomplished No Casualties! Jai Hind!

(या मोहिमेत मेजर क्रेस्टो साहेब, ग्रुप कॅप्टन फली मेजर साहेब,विंग कमांडर सुभाष चंदर साहेब, पलाईट लेपटनंट पी.उपाध्याय साहेब,कृष्णन कुमार साहेब, जोगा सिंग साहेब यांनी व संपूर्ण भारतीय सेना आणि वायूसेनेने सहभाग घेतला!)  

(काही संदर्भात चूक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपलब्ध माहितीवर आधारित स्वलेखन - संभाजी बबन गायके 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भारतातील शिल्पधन