महापालिकेच्या रुग्णांना नकार. रेफर रुग्णाला दारात अडवलं... फोर्टिसच्या बेपर्वाईला मनसेची चपराक
नऊ थरांची दहीहंडी फोडणारा गोविंदा!
भारताचे नंदनवन म्हणवल्या जाणा-या जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरमध्ये त्याचा जन्म ८ ऑक्टोबर,१९५२ रोजी झाला...ठिकाण होते दहाव्या शतकातील पुरुश्यार शिवमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले पुरुश्यार गाव...इथला झेलम नदीवरील हब्बा कडाल नावाचा लाकडी पूल प्रसिद्ध. यांचे कुलनाम राझदान..अर्थात लढवय्ये आणि जहागीरदार..जमीनदार लोक...शिवाय पंडित! जन्मवेळ श्रीकृष्णासारखीच रात्रीची..दहा वाजून दहा मिनिटे..धनिष्ठा नक्षत्र. मंगळाशी संबंधित असलेल्या या नक्षत्रावर जन्मलेली माणसं शिस्तबद्ध आणि प्रचंड धाडसी असतात, असं म्हणतात...याचा प्रत्यय या मुलाच्या, अर्थात सुनील कुमार राझदान यांच्या जन्मानंतर बरोबर बेचाळीस वर्षांनी आला! सुनील कुमार राझदान यांचे आजोबा दुस-या महायुद्धात ब्रिटीश सेनेतून लढले. आणि सुनील कुमार यांच्या वडिलांनीही भारतीय सेनेत तोफखाना रेजिमेंटमध्ये सेवा बजावली. त्यांची शेवटची नेमणूक श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा येथे होती.
आरंभी अभ्यासापेक्षा गोट्या खेळण्यात अतिशय रुची असलेल्या सुनील कुमार यांना एकदा वडिलांनी गोट्या खेळण्यात वेळ घालवतो म्हणून श्रीमुखात भडकावली. यामुळे ते अतिशय अपमानित झाले..कारण परिसरात ते बाल राजकुमार म्हणून ओळखले जात असत.. त्यांनी थेट यमुनातीरावरचे चामुंडा देवीचे मंदिर गाठले आणि देवभूमीचा गुण म्हणावा...सुनील कुमार हे अध्यात्मिक वृत्तीत रममाण झाले. याच मंदिराच्या परिसरात सैनिकी अधिका-यांचा गोल्फ क्लब होता. येथे खेळायला आलेल्या अधिका-यांशी तारूण्यात पदार्पण करीत असलेल्या सुनील कुमार यांचा परिचय आणि संभाषण होत असे. अध्यात्मासोबत त्यांनी गणित विषयाच्या अभ्यासाचा प्रचंड ध्यास घेतला होता...हेच गणित त्यांना पुढे उपयोगी पडणार होते! गणितात पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करताना त्यांचा बराच वेळ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाई. त्याच ग्रंथालयात त्यांचा एक सहपाठी सी.डी.एस. अर्थात कम्बाईन्ड डिफेन्स सर्विसेस परीक्षेचा अर्ज भरत बसला होता. या परीक्षेतून इंडियन मिलिटरी अकादमी, इंडियन नेवल अकादमी, इंडियन एअर फोर्स अकादमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीसाठी प्रशिक्षणार्थी अधिकारी निवडले जातात. त्या सहपाठी विद्यार्थ्याने सुनीलकुमार यांना म्हटले.."तुझ्या क्षमतेच्या बाहेरची आहे ही गोष्ट...तू पंडित, अभ्यासू कीडा! तू पाहूही नकोस हा अर्ज. तू प्रोफेसर हो गणिताचा!”
यावर अपमानित झालेले सुनील कुमार दिल्लीला पोहचले..काहीसा रागानेच सीडीएस परीक्षेचा फॉर्म भरला..अभ्यास केला...सहपाठी त्यावर्षी अनुत्तीर्ण झाला आणि सुनीलकुमार ऑफिसर्स ट्रेनिंगमधून लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षित होऊन देशसेवेत रुजू झाले..त्यांना हिणवणारा तो विद्यार्थी एक वर्षाने उशीरा उत्तीर्ण झाला आणि यांना ज्युनिअर ठरला! वर्ष होते १९७२ आणि वय होते अवघे २२ वर्षे. पॅरा एस.एफ. अर्थात पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेस हा भारतीय सैन्याचा एक अत्यंत खडतर काम असलेला विख्यात विभाग आहे. इथे सामान्य लोकांच्या कल्पनेतही येणार नाही, असे कठीण प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच सैनिकाला मरून रंगाची बेरेट अर्थात विशिष्ट प्रकारची कॅप परिधान करता येते.. ही कॅप मिळवणे खरंच कर्मकठीण मानले जाते! पण अभावितपणे ही कॅप डोक्यावर घालून सुनीलकुमार साहेब या विभागात रुजू होण्यासाठी आग्रा येथील पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेसच्या तळावर गेले आणि मोठ्या रुबाबात तेथील कॅप्टन एस.एम.कुंजरू साहेबांसमोर उभे राहिले...सुनीलकुमार यांच्या डोक्यावर असलेली ती बेरेट पाहून अडज्यूटंट साहेबांच्या तळपायाची आग अगदी मस्तकात गेली. साहेब काही बोलले नाहीत...त्यांनी सुनीलकुमार या सेकंड लेपटनंट तरुणाचा उपरोधाने ‘सर असा उल्लेख केला आणि बजावले.."ही बेरेट कमवावी लागते!” त्यांनी सुनीलकुमार साहेबांची एक परीक्षा आयोजित केली...काही नाही...वीस-पंचवीस किलोचा सिमेंटचा ठोकळा, युद्धासाठी सैनिकाकडे असावे लागते ते साहित्य, रायफल इत्यादी पाठीवर घेऊन वीस किलोमीटर जायचे आणि तेवढेच अंतर परत यायचे...मे-जून महिन्यातले दुपारचे कडक ऊन, दुपारची वेळ...अंगावर डांगरी नावाचा पोशाख...दहा मिनिटांत एक किलोमीटर अंतर चाललेच पाहिजे ही अट. सुनीलकुमार यांनी मोठ्या आत्मविश्वासाने वाटचाल सुरु केली खरी...पण काहीच वेळात पिशवीचे बंद खांद्यांना काचू लागले...तेथील कातडी सोलवटून निघाली...रक्ताने बनियन भिजून गेला...पण थांबायचे नव्हते...पायांत गोळे येऊ लागले होतेच...उस्ताद सायकलवर मागे होतेच...त्यांनी केवळ थोडे ग्लुकोजचे पाणी प्यायला दिले मध्ये...एकदाच! एक क्षण सुनीलकुमार यांना वाटले..उगाच पडलो या फंदात...सरावात घाम गाळला तर युद्धात रक्त गाळावे लागणार नाही...असे म्हटले जाते...इथे तर रक्तच गळत होते.. पण दुस-याच क्षणी त्यांनी केलेला अध्यात्मिक अभ्यास त्यांना आठवला...अष्टावक्र गीता..त्यातील तत्वज्ञान स्मरले...शरीर आणि मन वेगळे करता येते...या वेदना शरीराच्या...मन वेगळे त्यापासून. गुरु गोबिंदसिंग साहेबांचे शब्द त्यांना पाठ होते...देशासाठी मस्तक अर्पण करण्याची वेळ आली तर...विलंब करू नये! आईचे शब्द आठवले...सर्व उपकार फेडता येतात..पण पृथ्वीचे, मातृभूमीचे उपकार फेडता येत नाहीत....आणि हा साधक ती चार तासांची शर्यत साडेतीन तासात पूर्ण करूनच थांबला...चेह-यावर वेदना नावालाही नव्हती!...अंगावर प्रचंड जखमा झालेल्या होत्या...त्या पाहून कमांडर साहेबांनी सुनील कुमार यांना थेट रुग्णालयात धाडले...खांद्यावर टाके पडले...साहेबांनी दोन दिवसांची सुट्टी दिली...आणि सन्मानाची मरून बेरेटसुद्धा! ही सुनीलकुमार साहेबांची पहिली कमाई....या प्रसंगाने साहेबांना प्रचंड आत्मविश्वास आणि सहकारी अधिका-यांचा सन्मान, आदर मिळवून दिला!
देशाच्या विविध भागांत विविध जबाबदा-या सांभाळत सुनीलकुमार साहेब सर्वार्थाने एक सैन्याधिकारी म्हणून घडत गेले! त्यांनी मणिपूरमध्ये जीवाचा धोका पत्करून अतिरेकीविरोधी कारवाईत शौर्य गाजवले. कैलास पर्वत मोहिमेमध्ये धाडसाने सहभागी झाल्याबद्दल वरिष्ठ अधिका-यांनी सुनील कुमार यांना सन्मानित केले होते. एका मोहिमेत सहकारी सैनिक बर्फाच्या वादळात गाडले गेल्याचे वृत्त कानी येताच त्यांची सुटका करण्याच्या मोहिमेवर निघायचा आदेश सुनील कुमार यांनी वरिष्ठ अधिका-यांना मागितला. परंतु तशा वातावरणात पर्वतावर जाणे धोक्याचे आहे, असे त्यांना सांगण्यात आले. परंतु सुनील कुमार साहेबांनी आग्रह धरला...वेदिक गणिताचे कसब पणाला लावून दिशा शोधल्या, पावले मोजली..बर्फात मार्ग शोधला, बर्फात गाडल्या गेलेल्यांचा ठावठिकाणा अचूक शोधला आणि कित्येक जीव वाचवले! दूर अंतराच्या धावण्याच्या स्पर्धेत सुनीलकुमार नेहमीच अव्वल असत...त्यांना सहकारी ग्रे हाउंड (प्रचंड वेगाने धावणारी एक श्वान प्रजाती) नावाने हाक मारीत. पिस्टल शुटिंग (नेमबाजी) मध्ये सुनीलकुमार अव्वल होतेच. दूरपर्यंत ते अचूक नेम साधीत असत. नेमबाजीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा चेटवुड चषक त्यांनी जिंकला होता. योगाभ्यास होताच...पाण्याखाली श्वास रोखून राहणे याचा त्यांनी मोठा सराव केला होता. त्या ठिकाणी पी.टी.प्रशिक्षकाने सुनीलकुमार यांना ओळखले...हाच तो तरुण जो चामुंडा मंदिरात असायचा, दिवसभर अभ्यासात मग्न असायचा, आणि गोल्फ क्लबमधील सैनिक-अधिकारी लोकांशी संवाद साधायचा! खरे तर सुनील कुमार साहेब नौदल विभागासाठी निवडले गेले होते. ऐरा गैरा..नत्थू खैराचे हे कामच नव्हते...१३५ जणांच्या समुहातून सुनील कुमार यांची एकट्याची निवड झाली होती! मुष्टियुद्ध आणि पोहण्यात, पळण्यात ते अत्यंत तरबेज होते. पण दैवाने त्यांना पायदळ विभागात धाडले! काही तांत्रिक कारणांमुळे साहेबांची तुकडी एक महिना उशिराने प्रशिक्षण सत्रात रुजू झाली होती.
प्रारंभिक सेवा लेहमध्ये झाल्यानंतर सुनील कुमार साहेबांना त्यांच्या जन्मभूमीत सेवा करण्याची संधी प्राप्त झाली...काश्मीर! साहेबांना काश्मीरमधील एक नव्हे तर तीन तीन लोकभाषा अवगत होत्या, तिथल्या चालीरीती ठाऊक होत्या..त्यांनी थोडेसे जरी वेषांतर केले की ते तिथले स्थानिक नागरिक भासत असत. स्थानिक जनतेत स्थानिक वेश परिधान करून ते मिसळून जात..त्यामुळे अनेक गुप्तवार्ता त्यांना आपसूक समजत असत..त्याचा उपयोग अतिरेकीविरोधी मोहिमांमध्ये खूप होत असे. एका नेमणुकीत त्यांना काश्मिरातील दोन नद्यांच्या संगमाजवळ राहणायची संधी मिळाली...साहेब त्या संगमावर जाऊन ध्यान करण्याची संधी साधत असत. अशाच एका रात्री त्यांना स्वप्न पडले...अर्जनसागर येथे तुमची आणि गुरुंची भेट होईल..त्यावेळी नेमका पितृश्राद्ध महिना सुरु होता..ते तिथे पोहोचले. सरोवरात स्नान करून मंदिरात पोहोचले. तिथले पुजारी बाहेर आले. म्हणाले...कुणी साधक गुरुदीक्षा घेण्यासाठी येणार आहेत..असे मी स्वप्न पाहिले...तुम्ही तेच आहात का? आणि त्यांनी गुरुदीक्षा दिली...असे हे योद्धा साधक...सुनील कुमार राझदान...त्यांच्या संपूर्ण आयुष्यास एक मोठे वळण देणारी घटना पुढे घडायची होती....
राष्ट्रीय रायफल्समध्ये कर्तव्यावर असताना वेषांतर आणि नामांतर करून साहेब आणि त्यांचे पाच सहा सहकारी तेथील स्थानिक नागरीकांच्या भूमिकेत वावरत होते. ६ ऑक्टोबर १९९४ तारीख होती...काझीगुंडमधील एका चहाच्या टपरीवर साहेब आणि त्यांचे सहकारी चहा पीत बसले होते. स्थानिक आरोग्य केंद्रात काम करणा-या एका व्यक्तीची आणि सुनील कुमार साहेबांची उत्तम जानपहचान होती...सुनीलकुमार हे अस्सल कश्मीरी मुसलमान आहेत अशी त्या माणसाची खात्रीच होती. त्याने एक भयावह बातमी दिली...तेथून सुमारे २५ किलोमीटर्स दूर असलेल्या त्याच्या डोंगरी गावात हिजबुल मुजाहिद्दीन, हिक्मतेयार या अतिरेकी संघटनांच्या अतिरेक्यांनी त्या गावातील अर्थात दमाल हाजीपूर गावातील तब्बल चौदा तरुण महिलांचे गेल्या महिनाभरापासून अपहरण केले आहे...त्या महिलांचे लैंगिक शोषण सुरु आहे...बंदुकीच्या धाकावर...विरोध केल्यास आई-वडिलांना ठार मारू अशा धमक्या देत हा बलात्कार सुरु होता. या महिलांना या अतिरेक्यांसाठी स्वयंपाकही करावा लागत होता..आणि सुनीलकुमार साहेबांना ही बातमी देणा-या माणसाची मुलगीसुद्धा या दुर्दैवी महिलांपैकी एक होती! त्या गावात तब्बल ९ नरकासुर वावरत होते. त्यांचे निर्दालन करायला भगवान श्रीकृष्ण हवे होते. जे सुनीलकुमार साहेबांच्या रूपाने अवतरले जणू! सुनील कुमार साहेबांच्या हृदयात प्रचंड कालवाकालव झाली. नवरात्रीचे दिवस सुरु होते. साहेबांचा कडक उपवास सुरु होता. त्यांनी वरिष्ठ अधिका-यांच्या कानावर ही बाब त्वरीत घातली. घटनास्थळ साहेबांच्या जबाबदारीच्या क्षेत्राच्या बाहेरचे असल्याने मुख्यालयातून परवानगी घेणे गरजेचे होते, अतिरेक्यांची नेमकी संख्या माहीत नव्हती. साहेबांनी ७ ऑक्टोबर रोजी सेक्टर कमांडर साहेबांपुढे योजना मांडली..आणि रीतसर परवानगी घेऊनच मोहीम आखली गेली. मोहीम सुरु करण्याचा दिवस अर्थात ८ ऑक्टोबर हा योगायोगाने साहेबांचा वाढदिवसच होता. अतिरेक्यांवर छापा घालण्यासाठी २ अधिकारी, २४ जे.सी.ओ. आणि इतर कमांडोज हेसुद्धा पथकात सामील झाले. हा जंगली, डोंगरभाग...उंच उंच कडे...बर्फ. गुप्तता राखण्यासाठी साहेबांनी आणखीन लांबचा रस्ता निवडला. वीर भल्या पहाटे कामगिरीवर निघाले...त्या गावाजवळ पोहोचायला सायंकाळ झाली...सुमारे १७ तास सैनिक चालत होते. अंधार पडू लागला. आरोग्य कर्मचा-याने सांगितलेल्या ठिकाणाजवळ साहेब पोहोचले...पण निश्चित काही समजेना. तेवढ्यात एक मेंढपाळ डोंगर उतरून खाली येत होता. साहेबांनी त्यांच्या खास काश्मिरी बोलीभाषेत त्याच्याशी संवाद साधला...मेंढपाळ लगबगीने, भीतीने पुढे निघून गेला...पण जाताना त्याने थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिली....तिथून २ किलोमीटर्स उंचीवरील एका मोक्याच्या जागी काही घरे आहेत...त्यातील एका घरात काही लोक आहेत! या चार मजली घराला मोठे कुंपण आहे...चौथ्या मजल्यावर एक रायफलधारी पहारेकरी कायम उभा असतो...इत्यादी इत्यादी!
चालून चालून सैनिक थकले होते..भुकेले होते. साहेबांनी स्वयंपाक करण्याच्या सुचना दिल्या. साहेबांनी खिचडीवर त्या दिवशीचा उपवास सोडला. उद्या सकाळी लवकर त्या घराकडे जाऊ असा विचार होत असतानाच साहेब उठले. आता थांबून चालणार नाही! जे काही करायचे ते आजच, आत्ताच! त्यांचा निर्धार पाहून सैनिकांना स्फुरण चढले! ते २ किलोमीटर्स चालून जायला पथकाला दोन २ लागले...अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकावी लागत होती. अंधार दाटून आला होता. आभाळात चांदण्या चमकत होत्या तोच काय तो उजेड. त्या घराजवळ आणखी काही घरे होती. भटकी कुत्री होतीच. त्यांना शांत करण्यासाठी सैनिकांनी एक निराळेच हत्यार नेले होते..मांसाचे तुकडे! ही कुत्री शांत राहिली तरच ते कुत्रे टिपता येणार होती! पथकाने अंदाज लावून त्या ठिकाणाला वेढा घातला. सुमारे १० सैनिक बाहेरच्या वर्तुळात, ६ जवान आतल्या वर्तुळात आणि साहेबांसोबत ४ खंदे वीर. पण नेमके घर कोणते? कारण कुठून काही आवाज येत नव्हता. उंच टेकाडावरील एका घरामध्ये मिणमिणता कंदील दिसला..आणि एक वास येऊ लागला..तुपाचा वास! त्या भागातील गरीब नागरिक मोहरीच्या तेलात स्वयंपाक करीत..मग हा तुपाचा वास जेथून येतोय..ती स्थानिक प्रजा नक्कीच नसणार..पाकिस्तानी अतिरेकीच असणार..रात्रीची दहा वाजून दहा मिनिटे झाली होती. साहेबांचा वाढदिवस आणि जन्माची हीच वेळ आणि ८ तारीख म्हणजे जणू जन्माष्टमीच! काश्मिरातील घरांची रचना लक्षात घेऊन भारतीय सैनिकांना त्या घरांत कशी कारवाई करायची याचे प्रशिक्षण दिले जाते. ६ पैकी २ सैनिक बाहेर थांबले.२ जवान दुस-या बाजूने पहिल्या मजल्यावर गेले...आणि दोघे साहेबांसोबत थेट आत जाणार होते. सर्वांनी काळ्या कापडाने चेहरे झाकले होते..फक्त डोळे तेवढे झाकले नव्हते! रायफली सज्ज करीत साहेब आणि चार जवान घराच्या रोखाने निघाले. महिलांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला. साधी कुजबूज ती. साहेब तळमजल्यावरील स्वयंपाक घराच्या खिडकीशी पोहोचले. इथपर्यंत भारतीय सेना पोहोचेल हे अतिरेक्यांच्या स्वप्नातही नव्हते. त्यामुळे ते पहिल्या मजल्यावर निवांत बैठक करीत होते. स्वयंपाकघरात एक महिला अतिरेक्यांसाठी ऑम्लेट बनवीत होती. साहेब खिडकीतून आत शिरले. त्या महिलेला त्यांनी हळूच काही विचारले. तिला वाटले हासुद्धा अतिरेकीच आहे! तिने काहीशा रागातच म्हटले..”तुम्हीच काम सांगता आणि तुम्हीच विचारता काय करतेस?” साहेबांना तिला खास भाषेत समजवावे लागले..साहेबांनी त्या महिलेला काझीगुंडमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा-याचा संदर्भ दिला. तेंव्हा कुठे ती आणि इतर महिला बाहेर पळू लागल्या. सैनिकांनी एकेकीला खिडकीतून बाहेर घेतले. त्यातल्या एका १४ वर्षांच्या पोरीने मात्र पळून जाताना अतिरेक्यांच्या नावाने ठेवणीतल्या शिव्यांची लाखोली वाहिली..का नाही? त्या सर्व भगिनी महिनाभराहून अधिक काळ बलात्कार सहन करीत होत्या!
ही शिवीगाळ आणि त्या महिलांच्या पायांतील आभूषणांचा आवाज येताच अतिरेकी सावध झाले. तोवर २ सैनिक पहिल्या मजल्याच्या वरच्या पायरीवर पोहोचले...अंधार होताच..बैठकीच्या खोलीच्या बाहेर लाकडी स्टूलवर पहा-यासाठी बसलेल्या एका साडे सहा फूट उंचीच्या रायफलधारी अतिरेक्याने अंधारात या दोघांचे लालबुंद डोळे पाहिले..तो आधीच उंच..बसल्या जागेवरून त्याने वर उडी मारली..त्याचे डोके लाकडी छताला लागले..त्याला वाटले पिशाच्च आले! तो जिन्न जिन्न म्हणून किंचाळू लागला. आपल्याही सैनिकांनी एवढा प्रचंड उंच माणूस पाहिल्यावर तेही गडबडले आणि मागे सरकले..काय झाले हे पाहण्यासाठी साहेबांच्या सोबत असलेले दोघे जवान खोलीबाहेर पडले..साहेब त्या खोलीत एकटेच उरले ..दोन अतिरेकी पहिल्या मजल्यावरून जिन्याने खाली उतरून आले. त्यांच्या हातात रायफल्स होत्याच. ते दोघे व्हरांड्यामध्ये आले. सुनीलकुमार साहेबांनी खोलीतील एकमेव कंदील मालवला. त्यांच्याजवळ असलेल्या एका अतिरेक्यावर झेप घेऊन त्याची रायफल डाव्या हाताने हिसकावून घेतली, त्याच्याशेजारी उभ्या असलेल्या दुस-याची रायफलसुद्धा काढून घेतली..त्याच रायफलच्या दस्त्याने त्यांच्या डोक्यांवर प्रहार केले. ते खाली पडताच त्यांना धडाधड गोळ्या घातल्या आणि ते दोन्ही राक्षस यमसदनी धाडून दिले. पण आणखी किती अतिरेकी असतील याचा अंदाज नव्हता! आतून गोळीबाराचा आवाज ऐकून आपल्या सैनिकांना वाटले की साहेबांनाच गोळ्या लागल्या आणि त्यातच त्यांचे प्राण गेले त्यांनी बाहेरून त्या घरावर तुफान गोळीबार आरंभला. वरच्या मजल्यावरून अतिरेकी प्रत्युत्तर देऊ लागले होते. साहेबांनी बाहेर मेसेज दिला. गोळीबार थांबला! तेवढ्यात आणखी एक अतिरेकी जिना उतरून येताना दिसला..त्याचे पाय दिसले..साहेबांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. तसा तो धडपडत खाली येऊन पडला. साहेबांकडे त्यांची स्वतःची एक आणि त्या दोघा अतिरेक्यांच्या दोन अशा तीन रायफल्स होत्या. या तिस-या अतिरेक्याची रायफल काढून घेण्यासाठी साहेब पुढे सरसावले..तो अतिरेकी मेला नव्हता तोवर...मेल्याचे सोंग घेतलेल्या त्या अतिरेक्याने त्याच्या हाताजवळ आणि आधीच लोड असलेली रायफल झाडली...ती नेमकी साहेबांच्या पोटात मध्यभागी..नऊ-दहा गोळ्यांचा फवारा आतडी फाडून पाठीचा कणा तोडत घुसल्या..साहेबांनी तशाही स्थितीमध्ये अतिशय त्वेषाने त्याला पुन्हा गोळ्या घातल्या...साहेबांची आतडी बाहेर पडू लागली...रक्त सांडू लागले..साहेबांनी डोक्याचा पटका काढला..आतडी आत ढकलली...आणि त्यांवर तो काळा पटका करकचून बांधला..दोन्ही हातांवर सरपटत साहेब त्या खोलीच्या बाहेर पडले..नंतर आतून गोळीबार सुरु राहिला.पहाटे ३ पर्यंत. बाहेरील सैनिक साहेबांच्या सोबत आले...तोवर मुख्यालयात संदेश पाठवून आणखी कुमक मागवली गेली..पण त्यांना येण्यास प्रचंड वेळ लागणार होताच..तोपर्यंत या अतिरेक्यांना रोखून धरणे अत्यावश्यक होते. साहेब लाकडाच्या एका ढिगा-यामागे लपले! तिथून हल्ल्याचे नेतृत्व करू लागले. पोटातून रक्त वाहत होतेच. बांधलेल्या पटक्यामुळे रक्ताचा वेग कमी झाला होता. वेदना? वेदनेपासून शरीर वेगळे केले होते साहेबांनी. साथीदार सैनिकांनी साहेबांना तिथून हलवण्याचा प्रयत्न केला..पण साहेबांनी स्पष्ट नकार दिला! प्रसंगावधान राखून त्यांनी एक आदेश दिला..गावात येण्याच्या आधी त्यांनी रस्त्यावरच्या एका औषधांच्या दुकानदाराशी संवाद साधला होता..त्या दुकानात ग्लुकोज, सलाईन त्यांनी पाहिले होते. सैनिकांना सांगून त्यांनी सलाईन मागवून घेतले...सैनिकांच्या साहाय्याने, सिगारेट लायटरच्या उजेडात साहेबांनी स्वतःला सलाईन लावून घेतले. पण जागा सोडली नाही काहीही करून स्वतःचा जीव वाचवण्याचे सैन्यात दिले गेलेले प्रशिक्षण साहेबांनी प्रत्यक्ष आचरणात आणले होते! पहाटे ४ वाजता आतून तीन अतिरेकी पळून जाण्याच्या इराद्याने बाहेर पडू लागले..साहेबांनी काश्मिरी लहेजामध्ये त्यांना उद्देशून जोराने आवाज दिला..”उधरसे मत जाव...इंडियन आर्मीवाले हैं वहां...इस तरफ आ जावो भाईयों!” अतिरेक्यांना वाटले त्यांचेच स्थानिक साहाय्यक लोक आहेत...ते तिघे भाई आपल्या या भाईकडे अलगद आले...भाईंनी त्यांना ताब्यात घेतले..हातपाय, तोंड बांधून ठेवले! साहेबांची शौर्यगाथा कित्येक तास सुरु होती. सकाळी १० वाजता जादाची कुमक पोहोचल्यावर आतले आणखी ३ अतिरेकी ठार केले गेले. ९ पैकी ६ ठार आणि ३ ताब्यात आले होते. सुनीलकुमार साहेबांना रुग्णालयात नेण्याची तयारी सुरु झाली. तोवर घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले होते. त्यात ज्यांच्या घरातल्या महिलांची सुटका करण्यात आली होती, त्या महिलांचे नातेवाईक होते. एका बाईच्या देखतच अतिरेक्यांनी तिच्या मुलीवर आणि सुनेवर अत्याचार केले होते! पकडल्या गेलेल्या ३ अतिरेक्यांचा हिशेब या महिलेने आणि इतरांनी पूर्ण केला! नरकासूर वधात श्रीकृष्ण भगवंताला एका महिलेची, रुक्मिणीचे साहाय्य झाले होते, त्याचीच ही एका अर्थी पुनरावृत्ती म्हणावी की काय? या लष्करी कारवाईमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि लष्कर-ए-हिक्मतेयार या अतिरेकी संघटनेचे एकूण ९ धोकादायक अतिरेकी ठार मारले गेले आणि १४ महिलांची सुटका करण्यात आली! अतिरेक्यांच्या या लपण्याच्या ठिकाणावरून दोन यु.एम.जी. (युनिवर्सल मशीन गन्स), ७ ए.के.४७ रायफल्स, एक पोते भरून काडतुसे, १० किलो स्फोटके इ ऐवज जप्त केला गेला! ही मृत्यूची दहीहंडी श्रीकृष्णाच्या भूमिकेत शिरून सुनीलकुमार राझदान साहेबांनी जणू नऊ थर लावून फोडली! यात एकाही गोविंदाला साधे खरचटलेसुद्धा नाही. पण नेतृत्व करणारा कान्हा मात्र कायमचा जायबंदी झाला होता! साहेबांना हेलिपोर्ट करून त्वरीत सेनेच्या रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांचे सुमारे ९ फूट लांबीचे आतडे कापून काढण्यात आले. एल वन ते एल फोर मणके तुटून गेल्याने साहेब आयुष्यात पुन्हा कधीही चालू, फिरू शकणार नाहीत ..असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले! आयुष्याच्या मध्यावरच लष्करी अधिकारी कारकीर्द संपुष्टात येणार होती...घरी दोन मुलगे, पत्नी...भविष्य अंधारमय झाले! एकाकी वाटू लागले...पण अंधारात कुणीतरी उजेड घेऊन येण्याची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता..स्वतः उजेड होणे गरजेचे होते! निम्मे शरीर निकामी झाले..पण बुद्धी, मन शाबूत होते!
श्रीनगरमध्ये, दिल्लीत रुग्णालयात तब्बल ९ महिने मुकाम झाला...पुढे पुण्यात उपचारांसाठी पाठवण्यात आले! उपचारांचा खर्च सेना करीत होतीच...पण आर्थिक घडी विस्कटून गेली..मुलांचे शिक्षण सुरु होते. ज्या मुलीची सुटका साहेबांनी केली होती..त्या मुलीचे आई-वडील तिला घेऊन साहेबांना भेटण्यासाठी श्रीनगरवरून खास पुण्याला आले होते..कामावर नाही म्हणजे साहेबांना पगार दिला जात नसेल...म्हणून त्यांनी पैसेही देऊ केले होते...पण साहेबांनी ते नाकारले! हा देश माझा आहे, याचे रक्षण मी नाही करणार तर कोण करेल? मी माझे कर्तव्य केले..आता सेना माझी काळजी घेईल. देशाने सुनीलकुमार राझदान यांनी केलेल्या या अविस्मरणीय कामगिरीसाठी त्यांना कीर्ती चक्र पुरस्कार प्रदान केला! साहेबांच्या आजारपणाच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती मंजू राझदान यांनी साहेबांची अखंड सेवा केली. मुलगा ईशान या धकाधकीतसुद्धा अभ्यास करून सेनेत अधिकारी झाला. दुसरा चिरंजीव पार्थ डॉक्टर झाला आहे! व्हीलचेअरमध्ये बसावे लागत असले तरी साहेब त्यांची बहुतेक सर्व कामे स्वतःच करतात! पिस्टल नेमबाजी करतात, त्यांना दोरीच्या सहाय्याने हेलिकॉप्टरमधून खाली यायचं आहे...हे प्रत्यक्ष युद्धात करता येईल..असं त्यांना वाटतं! ३ मोठ्या शस्त्रक्रिया साहेबांनी पचवल्या..तारुण्यात दिल्ली-आग्रा अंतर बुलेटवरून अवघ्या दोन तासांत कापायची सवय असलेल्या साहेबांनी पुढे व्हीलचेअरमध्ये वावरण्याचा सराव केला...आणि साहेब सेनेतील सेवेत परतले! ब्रिगेडीअर म्हणून त्यांना बढती मिळाली! गणिताचे प्रचंड ज्ञान, अतिरेकीविरोधी कारवायांचे नियोजन आणि अंमलबजावणीचा अनुभव असल्याने अचूक मार्गदर्शन करण्याची उच्च क्षमता आणि जागरूक बुद्धी यांच्या जोरावर सुनीलकुमार राझदान साहेबांनी मोठ्या उत्साहाने सैन्यसेवा जारी ठेवली. साध्या कॅलक्युलेटरमधील सोलर पॉवरवर चालून फायर होऊ शकेल, अशी रायफल साहेबांनी बनवली होती. असिस्टंट चीफ ऑफ इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नेमणूक झाली. भारतीय सेनेतील व्हीलचेअरमध्ये बसून कार्य करणारे पहिले मेजर जनरल म्हणून ते ख्याती पावले. काश्मिरी युवकांनी सेनेत भरती व्हावे, म्हणून मेजर जनरल सुनीलकुमार उर्फ एस.के.राझदान साहेबांनी खूप यशस्वी प्रयत्न केले..काश्मीरमधील स्थानिक प्रश्नांची त्यांना अधिक जाण आहे. त्यांनी काश्मिरी तरुणांवर विश्वास दाखवला..भरती कार्यक्रम राबवले.३०० जागांसाठी ३०००तरुण स्पर्धा करीत. यातच सर्व आले. बंगळूरू येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांनी काश्मिरी तरुणांना खूप प्रभावी मार्गदर्शन केले..देश सुरक्षित तर आपले अस्तित्व राहील, असे ते म्हणतात. त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या लेपटनंट फैय्याज नावाच्या तरुणाने अतिरेकीविरोधी कारवाईत बलिदान देऊन साहेबांचा विश्वास सार्थ ठरवला!
दिल्लीत मुक्कामी असताना त्यांच्या बंगल्याबाहेरील रस्त्यावर एक काश्मिरी माणूस शाली विकत होता..त्याला जेंव्हा समजले की नौगावचे नायक इथे राहतात, तेंव्हा त्याने मोठ्या आदराने त्याच्याकडची सर्वांत महागडी शाल साहेबांच्या खांद्यावर पांघरीत तो म्हणाला...साहब आपने हमारी इज्जत बचा ली!” हुतात्मा सैनिकांच्या पत्नी, मुले यांच्या कल्याणासाठी साहेब झटत असतात. विशिष्ट सेवा मेडल त्यांच्या पोशाखावर शोभत असते. साहेब विविध ठिकाणी व्याख्याने देतात..विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी साहेब प्रेरणेचा मोठा स्त्रोत बनले आहेत!
काश्मिरात जन्मून मथुरेत वाढलेल्या आणि पुन्हा काश्मिरात येऊन मोठी देशसेवा बजावलेल्या या ज्येष्ठ योद्ध्यास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिवशी खूप खूप शुभेच्छा आणि सादर वंदन...सल्यूट मेजर जनरल साब! जय हिंद! -संभाजी बबन गायके